Dadar Jowar Agrowon
ॲग्रो गाईड

Dadar Jowar : दादर ज्वारीसह कडब्याला परराज्यापर्यंत उठाव

रब्बी दादर ज्वारीसाठी खानदेश प्रसिद्ध आहे. जळगाव, धुळे व नंदूरबार येथील बाजारपेठा त्यासाठी प्रसिद्ध आहेत. दादरला यंदा विक्रमी ४९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कडब्याचे दरही प्रति शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत पोचले.

Chandrakant Jadhav

Jowar Rate : कोरडवाहू दादर ज्वारीसाठी (Dadar Jowar) संपूर्ण खानदेश प्रसिद्ध आहे. दिवाळीनंतर ही पेरणी (Jowar Sowing) करण्याचा प्रघात आहे. कारण या काळात चांगला वाफसा असतो. शेतकरी पारंपरिक वाणांनाच (Jowar Variety) पसंती देतात.

कृषी विभागाच्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात मागील तीन हंगामात सरासरी १८ हजार, धुळे चार हजार तर नंदुरबारात अडीच हजार हेक्टरवर या दादरचे क्षेत्र होते.

जळगावमधील आसोदे, भादलीची दादर राज्यभर प्रसिद्ध आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत पेरणी होते.

अलीकडे सिंचनाच्या सुविधा झाल्याने क्षेत्र कमी झाले. शेतकरी सुधारित, संशोधित वाणांकडे वळले. तरीही ३५ ते ४० वर्षे खानदेशातील शेतकऱ्यांनी दादरची परंपरा टिकवली आहे. दादर ज्वारी जवळपास रासायनिक अवशेषमुक्तच असते.

दादरच्या बाजारपेठा

मार्चमध्ये सर्वत्र कापणी सुरू होते. साहजिकच मार्च, एप्रिल या महिन्यांत बाजारात आवक अधिक होते. काही शेतकरी साठवणूक करून मे व जूनमध्येही विक्री करतात.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा व अमळनेर, धुळ्यात शिरपूर व दोंडाईचा (ता.शिंदखेडा) तर नंदुरबारात शहादा व नंदुरबार या बाजार समिती दादर ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. थेट किंवा शिवार खरेदी अपवादानेच होते.

सरासरी आवक (प्रति दिन)

-२०२०- मार्च- एप्रिल- जळगाव व अमळनेर बाजार समितीत मिळून ३००० ते ३२०० क्विंटल.

-२०२१- मार्च- एप्रिल- जळगाव, अमळनेर व चोपडा बाजार समितीत मिळून ४००० ते ४५०० क्विं. -२०२२- ५००० ते ५२०० क्विं.

मार्च ते मे काळातील दर रू. प्रति क्विंटल

मागील चार वर्षांत दर वेगवेगळे राहिले. कोव्हिड काळात ते काहीसे दबावात होते.

२०२०- १३०० ते १८००, सरासरी १५००.

२०२१- १५०० ते १९००, सरासरी १८००

२०२२- १८०० ते २४००, सरासरी २२००

-यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जळगाव, अमळनेर आदी भागात- कमाल ४९०० रु,

किमान ४२०० तर सरासरी ४००० रु.

-दुसऱ्या पंधवड्यात सरासरी ३२०० रु.

चोपडा, जळगाव व अमळनेरात मार्च, एप्रिल व मे महिन्यात दररोज लिलाव होतात. ज्वारीची खानदेशातून पाठवणूक गुजरात, मध्य प्रदेश, दाक्षिणात्य भागासह मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी भागात होते.

परराज्यासह महानगरांमधील खरेदीदार जळगाव, धुळ्यातील अडतदार, खरेदीदार, एजंट मंडळींकडे आगाऊ नोंदणी करून ठेवतात.

कडबा सकस पण नेहमी तुटवडा

दादर ज्वारीचा कडबा पशुधनासाठी सर्वाधिक उपयुक्त, सकस मानतात. थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात दूध उत्पादक तो अधिक प्रमाणात खाऊ घालतात.

कारण प्रतिकार शक्ती आणि दूध उत्पादन क्षमता टिकून राहते. अधिक पशुधन असलेले शेतकरी कडब्याची कुट्टी तयार करून तिची साठवणूक एप्रिल व मेमध्ये करतात. दादरच्या कडब्याची उंची १० ते १२ फूट वा त्याहूनही अधिक असते.

थेट खरेदी, दरही वधारलेलेच

पेरणीक्षेत्र घटत चालल्याने कडब्याची मागणी मोठी किंवा टिकून आहे. त्याचा दरवर्षी तुटवडा जाणवतो.त्यामुळे त्याची थेट किंवा शिवारातून खरेदीही होते. बाजार समितीत त्याची आवक होत नाही.

दादरचा कडबा सर्वात महाग असतो. २०२० मध्ये दर प्रति शेकडा २८०० रुपये, २०२१ मध्ये ३०००, २०२२ मध्ये ३००० ते ३२०० व यंदा ते ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत पोचले.

काहीं शेतकऱ्यांकडील कडब्याला ६००० रुपयांपर्यंतही दर मिळाले. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम विदर्भ, नाशिक भागातील पशुपालक जळगाव, धुळे, नंदुरबारमधून थेट खरेदी करतात.

शेतकरी अनुभव

आसोदे येथील जयवंत आत्माराम चौधरी यांना ३५ वर्षांपासून दादरचा अनुभव आहे. खरिपातील उडीद काढणीनंतर दिवाळीत वाफसा आल्यानंतर साडेचार एकर काळ्या कसदार जमिनीत ते पेरणी करतात.

एकरी सात किलो पारंपरिक बियाणे वापरतात. सिंचन, रासायनिक खते, फवारणी या बाबी अत्यंत कमी असतात. एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन हाती येते. पाऊसमान व हवामान बिघडल्यास उत्पादनाचेही गणित बिघडते.

कापणी व कणसे शेतात एका ठिकाणी गोळा करण्यासाठी प्रति एकर पाच हजार रुपये खर्च यंदा येत आहे. मागील वर्षी हाच खर्च साडेचार हजारांपर्यंत होता. मळणीस यंदा प्रति क्विंटल ७५ रुपये खर्च येत आहे.

ज्वारीस मागील तीन वर्षे सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल तर यंदा सर्वाधिक ३८०० रुपये दर जळगाव बाजार समितीत मिळाला. एकरात १७५ पेंढ्या चारा आला. प्रतिशेकडा ५८०० रुपये दर कडब्यास मिळाला. धान्य व कडबा अशा दोन्हींच्या विक्रीमुळे चांगले उत्पन्न हाती आले.

सतीश पाटील- ८६६८२५६२७०, देवेंद्र पाटील- ७०२०९३२७५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT