Fish Farming Agrowon
ॲग्रो गाईड

शेतकरी नियोजन: मत्स्यशेती

पाणथळ चोपण जमिनीच्या वापराच्या दृष्टीने नीरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांनी सुरू केलेल्या मत्स्य व कोळंबीपालनात यश, अपयश दोन्ही बाबीला सामोरे जावे लागले. मात्र, त्यातही न डगमगता राज्यातील पहिला परवानाधारक गिफ्ट तिलापिया माशांचा फार्म त्यांनी उभारला.

Team Agrowon

शेतकरीः पंडित चव्हाण

व्यवसायः गिफ्ट तिलापिया संगोपन

गावः निरा, ता. पुरंदर, जि. पुणे

तळ्यांची संख्याः ७

पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथे आमची वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. शेतजमिनीच्या परिसरातून नीरा नदी आणि दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे चांगले उत्पादन येत नाही. त्यामुळे माझ्या मनात मत्स्यशेतीचा विचार आला.मी नोकरी करत असताना रोहू, मृगळ आणि कटला या मत्स्य जातींचे पालन सुरू केले. पहिल्या वर्षी एक टन मत्स्य उत्पादन मिळाले. त्यातून खर्च वजा जाता २० हजार रुपये मिळाले. ज्या जमिनीतून काही उत्पन्न मिळत नव्हते, त्यातून उत्पन्न सुरू झाले. त्यामुळे मत्स्य पालनात आवड निर्माण होऊन हळूहळू मत्स्यशेतीमध्ये वाढ करत गेलो. संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने मत्स्यशेती करण्यावर भर दिला जातो.

अपयशातून सुरुवातः

- साल १९९६ मध्ये कोळंबी बाबत अभ्यास केला. त्यातून १९९८ रोजी सुमारे सहा लाख रुपये खर्चून गोड्या पाण्यातील कोळंबी उत्पादनाचा अत्याधुनिक प्लान्ट उभा केला.

- या प्लान्टमध्ये अगदी प्रयोगशाळेपासून सर्व गोष्टींचा समावेश होता. प्रत्येक गोष्टी एमपीडा संस्थेच्या निकषाप्रमाणे करण्यात आल्या.

- कोळंबीच्या व्यवसायासाठी विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून कोळंबी आणली जात असे. मात्र, कोळंबी बीज आणण्यासाठी लागणारा वेळ आणि अन्य कारणांमुळे मरतुकीचे प्रमाण वाढत होते. कोळंबी बीज आणण्यासाठी विमान वाहतुकीचा पर्यायदेखील वापरून बघितला. तरीदेखील अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत.

- कोळंबी वाहतुकीदरम्यान आणि तळ्यामध्ये सोडल्यानंतर आवश्यक तापमान राखणे शक्य झाले नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. म्हणून कोळंबी व्यवसाय बंद करण्याचे ठरविले.

गिफ्ट तिलापिया संगोपनातून मिळाले यशः

- गिफ्ट तिलापिया संगोपन सुरु करण्यापूर्वी स्थानिक तिलापिया संगोपन करीत होतो. त्यातून तिलापिया मत्स्य संगोपनाचे बारकावे समजून आले.

- पुढे जानेवारी २०१६ मध्ये विजयवाडा येथे गिफ्ट तिलापिया प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. त्यावेळी गिफ्ट तिलापिया संगोपनासाठी आवश्यक परवाने घेणे अनिवार्य होते. आणि हे परवाने मिळणे सहज शक्य नव्हते. त्यासाठी पुणे विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त विजय शिखरे यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि मदत मिळाली. आवश्यक परवाने मिळाल्यानंतर पहिली बॅच ७ एप्रिल २०१६ रोजी सुरू केली.

- पहिल्या बॅच साठी एका एकराच्या तळ्यामध्ये सुरुवातीला २० हजार पिल्ले तळ्यात सोडली. पहिल्या बॅचमधील मत्स्य काढणी ३१ ऑक्टोबर ते जानेवारी २०१७ या काळात केली. त्यातून जवळपास १० टन मत्स्य उत्पादन मिळाले.

- एक मासा साधारणतः अर्ध्या किलोपेक्षा जास्त वजनाचा मिळाला.या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे १ किलो माशाच्या वाढीसाठी फक्त १ किलो एवढेच सरासरी खाद्य पुरेसे होते. उपलब्ध सर्व माशांची विक्री स्थानिक बाजारपेठेमध्ये केली.

- सध्या तीन एकरांमधील तीन तळ्यांमध्ये गिफ्ट तिलापिया संगोपन करत आहे.

व्यवस्थापनातील बाबीः

- तलावाची खोली साधारण ८ फूट असून त्यात ४.५ ते ५ फूट पाणीपातळी ठेवली जाते.

- तलावाभोवती निकषानुसार कुंपण व बर्ड फेन्सिंग केले आहे.

- पाणी आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या पाइपवर जाळ्या लावल्या आहेत. त्यामुळे तलाव बाह्य सजीवांपासून अलिप्त झाला.

- बीज सोडण्यापूर्णी तळ्याची नांगरणी करून खतांच्या मात्रा दिल्या जातात.

- बीज आणण्यापूर्वी तलावात एक मोठ्या हाप्याची नर्सरी तयार केली जाते. त्यात विजयवाडा येथून आणलेले मत्स्यबीज सोडले जाते. एक ग्रॅममध्ये सुमारे १० बीज येतात. एकरी २० हजार प्रमाणे नर्सरी केली जाते.

- माशांची संख्या आणि आकारमानानुसार योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते.

- तलावातील पाण्याची रोज सकाळी तपासणी केली जाते. पाण्याचा सामू, विरघळलेला ऑक्सिजन, नायट्रेट व अमोनिया यांचे प्रमाण मोजला जाते.

- मासे अपेक्षित वजनाचे झाल्यानंतर तलावात योग्य तेवढा हवेचा पुरवठा करावा लागतो.

मागील महिन्याभरातील कामकाजः

- शेततळे पूर्णपणे कोरडे करून घेतले.

- गिफ्ट तिलापियाचे बीज साधारणतः १० ग्रॅम वजनाचे झाल्यानंतर नर्सरी हाफ्यातून, संगोपन तळ्यात मोजून सोडली.

- रोज सकाळी सहा वाजता पाण्याची गुणवत्ता तपासली. आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या.

- माशांच्या सरासरी ८ टक्के वजनानुसार १.८ मिमि आकाराचे तरंगते मत्स्यखाद्य दिवसातून चार वेळा विभागून दिले.

आगामी नियोजनः

- सध्या तळ्यातील मासे २०० ग्रॅमपर्यंत वजनाचे झाले आहेत.

- महिन्याच्या सुरूवातीलास माशांचे सरासरी वजन घेऊन एफसीआर काढून पुढील १० दिवसांचे खाद्य मात्रा ठरविली जाईल.

- पाण्यात प्राणी प्लवंगाच्या योग्य घनतेसाठी एफआरबीचा वापर चालू केला. जेणेकरून माशांना तळ्यामध्येच नैसर्गिक खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

- येत्या काळात पावसामुळे ढगाळ वातावरणा राहील. त्यामुळे तळ्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता असते. त्यासाठी एकरी दोन याप्रमाणे जेट एरिऐटर्स बसवून घेतले जातील.

- तळ्याचा पृष्ठभाग खराब होऊ नये, यासाठी झीओलाईटचा पहिला डोस २० जून रोजी दिला जाईल.

विक्री नियोजनः

- माशांची विक्री स्थानिक बाजारपेठेसह बाहेरील व्यापाऱ्यांना होलसेल दराने देखील केली जाते.

- होलसेल विक्रीवेळी जिवंत मासे अत्याधुनिक पाण्याच्या टाक्यांमधून पाठविले जातात. खरेदीदार तळ्यावर येऊन माश्यांचे वजन करून खरेदी करतात.

- होलसेल मध्ये प्रतिकिलो साधारण १२० ते १४० रुपये इतका दर मिळतो.

- स्थानिक मार्केटमध्ये प्रतिकिलो साधारण १८० ते २०० रुपये दर मिळतो.

- पंडित चव्हाण, ९९६०२ ६८२१४

(शब्दांकनः संदीप नवले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT