Poultry Diseases information
Poultry Diseases information  Agrowon
ॲग्रो गाईड

Poultry Disease : ई-कोलाय: कोंबड्यातील जिवाणूजन्य रोग

Team Agrowon

डाॅ. संतोष मोरेगावकर, डाॅ. म्हाळसकांत निकम, डाॅ. गोविंद गंगणे

Poultry Diseases information: ई-कोलाय (कोलियबॅसिलोसिस) (Ecoli) हा कोंबड्यामध्ये आढळून येणारा जिवाणूजन्य रोग (Bacterial Disease) आहे. व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये (Poultry) या रोगाचा सातत्याने प्रादुर्भाव आढळून येतो.

प्रामुख्याने पाण्याद्वारे व खाद्याद्वारे रोगाचा प्रसार होतो. या रोगाचे जंतू कोंबड्यांच्या संपर्कात येणाऱ्या पाणी, माती, धूळीमध्ये आढळून येतात.

परंतु त्यांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीची आवश्यकता असते.

या रोगाचा प्रादुर्भाव वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये रोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते.

ब्रॉयलर कुक्कुटपालनामध्ये दरवर्षी ई-कोलायच्या प्रादुर्भावामुळे ब्रूडिंग दरम्यान ४० ते ५० टक्के पक्ष्यांची मरतुक होते.

रोगाचा प्रादुर्भाव वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. मात्र हिवाळा आणि पावसाळी ऋतूमध्ये रोगाचा लागण होण्याची अधिक शक्यता असते.

या रोगाविरुद्ध प्रभावी लस अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यामातून रोग नियंत्रण करणे क्रमप्राप्त ठरते.

या रोगाचा प्रादुर्भाव कोंबड्यांसह इमू, बटेर (क्वेल), बदके इत्यादी पक्ष्यांमध्येही आढळून येतो. त्यांच्यामध्येही साधारणतः अशीच लक्षणे व शवविच्छेदनातील निरीक्षणे दिसतात.

नुकसान ः - वजन कमी होणे, मांसाचा दर्जा किंवा प्रत ढासळणे. - ब्रॉयलर पक्ष्यांचे अपेक्षित वजन मिळत नाही.

- कोंबड्यांतील मानमोडी, गंबोरो यांसारख्या रोगांना सहायक ठरतो. त्यामुळे अधिक आर्थिक नुकसान होते. - बाधित पक्ष्यांचे कच्चे मांस किंवा अंडी खाणाऱ्या व्यक्तीला रोगाचा बाधा होण्याची शक्यता असते.

- या रोगाचे जंतू डोळ्यांची बाधा, अंडी वाहक नलिकेचा दाह, कोलिसेप्टिसेमिया, कोलाय ग्रॅन्युलोमा, सेल्युलायटिस इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या पक्ष्यांमध्ये निर्माण करतात.

प्रसार ः

- शेडमधील किंवा परिसरातील दूषित हवामान किंवा धूळ याद्वारे प्रसार होतो. - दूषित पाण्याद्वारे रोगाचा झपाट्याने प्रसार होतो.

त्यासाठी पक्ष्यांना दिले जाणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळेतून नियमित तपासणी करावी. - बाधित पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे रोगाचे जंतू प्रसार करतात.

- कुक्कुटगृहातील उंदरांच्या विष्ठेद्वारे जास्त प्रमाणात रोगाचा प्रसार होतो. - खाद्य किंवा तूस यांद्वारे देखील रोगप्रसार होतो.

लक्षणे ः

- भूक मंदावणे, अपेक्षित वजन न मिळणे, वाढ खुंटणे. यामुळे मांस किंवा अंडी उत्पादनात घट येते.

- सुरुवातीला श्‍वसनासंबंधी लक्षणे, जसे की रात्रीच्या वेळी श्‍वासाची घरघर, तोंडाने श्‍वास घेणे ही लक्षणे दिसतात. यासाठी पक्ष्यांचे रात्रीच्या शांतवेळी निरीक्षण करावे.

- आजारी पक्ष्यांची पिसे विस्कटलेली दिसतात. - आजारी पक्षी शेडमध्ये कोपऱ्यात मलूल होऊन बसतात.

- पक्ष्यांना पांढरी, पातळ, रक्तमिश्रीत हगवण होते. - अचानक मरतुक होते. बऱ्याच वेळा ५० टक्क्यांपर्यंत मरतुक पोहोचते.

शवविच्छेदनातील निरीक्षणे ः

अचानक पक्ष्यांमध्ये मरतुक आल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करून मरतुक होण्यामागील कारणे समजतात. त्यासाठी शवविच्छेदन अत्यंत आवश्यक आहे.

- शरीरातील हवेच्या पिशव्या जाडसर, ढगाळ किंवा पांढरट झालेल्या दिसतात. - यकृत, ह्रदय अशा महत्त्वाच्या अवयवांवर पांढरट, अपारदर्शक जाड थर किंवा पडदा तयार होतो.

- यकृत, हृदय, प्लिहा या अवयवांवर सूज येते. त्यांचा आकार मोठा होतो. - आतड्यांचा आतील भाग गडद लाल किंवा रक्ताळलेला दिसतो. म्हणजेच बाधित पक्ष्यांना आतड्यांचा दाह होतो.

- पिलांच्या पोटातील पिवळ्या बलकाचे संपूर्ण शोषण न झाल्यामुळे त्याचा रंग बदलतो, घाण वास येतो. - फुफ्फुसांचा दाह होतो. फुफ्फुसाचा दाह झाला की नाही हे ओळखण्यासाठी कुक्कुटपालक शेडवर देखील ही चाचणी करू शकतात.

त्यासाठी मेलेल्या पक्ष्यांच्या दाह झालेल्या फुफ्फुसाचा भाग एका चंचुपात्रात किंवा पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात टाकावा. फुफ्फुसदाह झाला असल्यास तो भाग पाण्याच्या तळाला बुडतो. - डोळ्यांमधून पू येणे, डोळ्यांवर पांढरट पापुद्रा तयार होणे.

यामुळे पक्षी आंधळे होतात. - अंडीवाहक नलिका जाडसर होणे, त्यामध्ये पांढरट स्राव जमा होणे. हे लक्षण मुख्यतः अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये दिसून येते.

प्रतिबंधात्मक उपाय ः

- हवेतील अचानक व मोठ्या बदलांपासून पक्ष्यांचे संरक्षण करावे. त्यासाठी ब्रूडिंग व्यवस्थापन काटेकोरपणे करावे.

- कुक्कुटगृह हवेशीर राहील याकडे लक्ष द्यावे. - मुख्यतः उन्हाळ्यामध्ये पक्षिगृहातील वातावरण शुष्क किंवा कोरडे असते. अशावेळी शेडमध्ये पंखे लावले जातात. त्यामुळे शेडमधील घाण धुराळा हवेत पसरतो. त्यासाठी शेड कायम स्वच्छ ठेवावे.

- गुठळीयुक्त खाद्यामधून (पॅलेट फीड) या रोगाचा प्रसार कमी प्रमाणामध्ये होतो असे आढळून आले आहे.

- उंदराच्या विष्ठेमधून रोगकारक जंतूंचा प्रसार अधिक तीव्रतेने होतो. त्यासाठी शेडमध्ये उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

- उंदरांच्या लेंड्या खाद्यामधून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. - या रोगाचा प्रसार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रामधूनच होण्याची शक्यता असते. त्यासाठी चांगल्या अंडी उबवण केंद्रातील पक्ष्यांची निवड करावी.

- रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिले सात दिवस पिल्लांना प्रतिजैविकांच्या मात्रा द्याव्यात.

- पाण्याद्वारे रोगप्रसार टाळण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. प्रयोगशाळेतून किमान २ वेळा पाण्याची तपासणी करावी. शक्यतो बोअरवेलचे पाणी द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT