Turmeric Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric : हळदीवरील करपा, कंदकुज रोगांचे नियंत्रण

हळद पीक सध्या शाकीय वाढीच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसांपासून जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण तर मध्येच पाऊस अशी स्थिती आहे. ही बदलती हवामान स्थिती विविध रोगांच्या वाढीस पोषक ठरते.

टीम ॲग्रोवन

हळद पीक (Turmeric) सध्या शाकीय वाढीच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसांपासून जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण तर मध्येच पाऊस अशी स्थिती आहे. ही बदलती हवामान स्थिती (Changing Climate Conditions) विविध रोगांच्या वाढीस पोषक ठरते. योग्यवेळी रोग नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. त्यासाठी रोगाचा प्रादुर्भाव (Disease On Turmeric) ओळखून वेळीच उपाययोजनांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.

१) कंदकुज (गड्डाकुज) ः

रोगकारक बुरशी ः

- ओलीकुज ः पिथियम व फायटोप्थोरा या बुरशींमुळे

- कंदाची शुष्क कुज ः फ्युजॅरियम, रायझोक्टोनिया आणि स्क्लेरोशिअम बुरशी.

अनुकूल घटक ः

- भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन.

- जास्त आर्द्रता तसेच ढगाळ उबदार हवामानात रोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढतो.

लक्षणे ः

- रोगाची लक्षणे कंदाच्या कोवळ्या फुटव्यांवर लगेच दिसून येतात.

- सुरळीतील पानांचे शेंडे वरील बाजूने व कडेने पिवळे पडून १ ते दीड सेंमी खोलीपर्यंत वाळून जातात. संपूर्ण पान वाळते.

- खोडाच्या गड्ड्या लगतच्या बुंध्याचा रंग तपकिरी काळपट होतो. त्याठिकाणच्या माती बाजूला करून पाहिल्यास गड्डा काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.

- प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज उपटून येतो.

- जमिनीतून कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येते.

- प्रादुर्भावग्रस्त शेत लांबूनही पाहिल्यास वैशिष्ट्यपूर्ण अशा पिवळ्या निस्तेज पानांमुळे ओळखून येते.

व्यवस्थापन ः

- प्रादुर्भावग्रस्त कंद उपटून नष्ट करावेत. तसेच त्याशेजारील रोपांच्या वाफ्यात बुरशीनाशकांची आळवणी करावी.

- पावसाचे पाणी शेतात साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतामध्ये उताराला आडवे चर घेऊन पाण्याचा निचरा करावा.

- आंतरमशागतीची कामे करताना गड्ड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

रासायनिक नियंत्रण ः

- ट्रायकोडर्मा प्लस (भुकटी) २ ते २.५ किलो प्रति एकरी २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून शेतामध्ये पसरावी.

आळवणी (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)

- कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ग्रॅम किंवा

- मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम किंवा

- कॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यू.पी.) ५ ग्रॅम

जास्त तीव्रतेमध्ये, (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

मेटॅलॅक्सिल-एम (४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यू.पी.) संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम किंवा

हेक्झाकोनॅझोल (५ ई. सी.) ०.५ ते १.० मिलि

फवारणी द्रावणात स्टिकर १ मिलि मिसळावे.

(आळवणी करताना जमीन वाफसा स्थितीत असावी. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)

--------------

२) करपा/लिफ स्पॉट ः

रोगकारकर बुरशी ः कोलेटोट्रीकम कॅपसिसी

अनुकूल घटक ः

- साधारणपणे २१ ते २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० टक्के आर्द्रता

- अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊस, पाण्याचा कमी निचरा होणारी जमीन.

लक्षणे ः

- पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात.

- पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात.

- रोगाची तीव्रता वाढल्यास, ठिपके वाढून संपूर्ण पान करपते. पान तांबूस-तपकिरी रंगाचे दिसते. कालांतराने पान वाळून गळून पडते.

३) पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) ः

रोगकारक बुरशी ः टॅफ्रिना मॅक्युलन्स

अनुकूल घटक ः

- तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस, आर्द्रता ८० टक्के.

- अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊस,

- जुलै ते नोव्हेंबर या काळात अधिक तीव्रता.

लक्षणे ः

हा बुरशीजन्य रोग असून या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तीन प्रकारचे ठिपके पडतात.

१) पहिल्या प्रकारात म्हणजेच रोगाच्या प्राथमिक अवस्थेत पानाच्या वरील पृष्ठभागावर असंख्य लहान गोलाकार दाण्यासारखे ठिपके तयार होतात. ठिपक्यांच्या मध्यभागी बुरशीची काळी फळे रचलेली दिसतात. सुरुवातीला ठिपक्यांच्या सभोवती पिवळी कडा नसते. परंतु कालांतराने ठिपक्यांच्या सभोवती पिवळी कडा तयार होते. पान तांबूस रंगाचे होऊन वाळून जाते.

२) दुसऱ्या प्रकारांत पानाच्या वरच्या पृष्ठभागावर अंडाकृती किंवा गोलाकार काळ्या रंगाचे खोलगट ठिपके तयार होतात.

३) तिसऱ्या प्रकारात ठिपक्याचा मुख्य भाग पांढरा रंगाचा आणि २ ते ४ मिमी आकाराचा असतो. ठिपक्यातील पांढऱ्या भागावर बुरशीची काळी फळे इतस्ततः पसरलेली दिसतात. कालांतराने पानांच्या वरच्या पृष्ठभागाावर हिऱ्याच्या खड्ड्यांच्या आकाराचे तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ ते २ सेंमी व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात.

- रोगाची सुरुवात जमिनी लगतच्या पानांवर होऊन नंतर वरील पानांवर पसरतो.

- पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात. हे ठिपके फुलांवरदेखील आढळतात.

व्यवस्थापन ः

- रोगाचा प्राथमिक प्रसार रोगग्रस्त पाने, फुले याद्वारे होतो. त्यामुळे रोगग्रस्त पाने, फुले गोळा करून त्वरित जाळून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता राखावी.

नियंत्रण ः

करपा/लिफ स्पॉट आणि पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगांच्या नियंत्रणासाठी, (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ते २ ग्रॅम किंवा

कॉपर ऑक्झिक्लोरार्इड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम

रोगाची तीव्रता वाढल्यास,

प्रोपीकोनॅझोल (२५ ई. सी.) ०.५ ते १ मिलि किंवा

क्लोरोथॅलोनील (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम

--------------------

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

डॉ. सचिन महाजन, ९४२११ २८३३३

(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT