Grape Management
Grape Management Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Pest Management : द्राक्षावरील सिलोस्टर्ना स्कॅब्राटर खोडकिडीचे नियंत्रण

Team Agrowon

डॉ. दीपेंद्र सिंह यादव, ऋषिकेश भोसले, गोकूळ शंखपाळ

द्राक्ष विभागातील अनेक ठिकाणी सिलोस्टर्ना स्कॅब्राटर या खोडकिडीचा प्रादुर्भाव (Grape Stem Borer Outbreak) मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. नवीन आणि जुन्या अशा बागांमध्ये किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्यामुळे ही एक महत्त्वाची कीड म्हणून ओळखली जाते. मात्र नवीन बागेत प्रादुर्भाव झाल्यास द्राक्ष बागेचे आयुष्यमान कमी होऊन अधिक नुकसानकारक ठरते.

किडीचा जीवनक्रम ः

अंडी, अळी, कोष, भुंगा अशा चार अवस्थेमधून पूर्ण होतो. मादी कीटक द्राक्षवेलीच्या खोडावरील किंवा ओलांड्यावरील साल खरवडून भेगा व खाच तयार करतात. त्या खाचेमध्ये अंडी देतात.

खोडकिडीच्या अंड्यातून बाहेर पडलेली अळी खोडावरील ओल्या सालीवर खाण्यास सुरुवात करते. यात द्राक्षवेलीला जखम होऊन त्यातून द्रव उत्सर्जित होतो. नंतर अळी खोडाला छिद्र पाडून आत बोगदा करत जाते. अळी अवस्था ६-८ महिने खोडाच्या आत पोखरत राहते. त्या वेळी भुस्सा बाहेर टाकला जातो.

यानंतर मे-जून महिन्यामध्ये अळी कोषावस्थेत जाते.

या किडीचे प्रौढ साधारणतः जुलै ते सप्टेंबरदरम्यान बाहेर पडतात.

यातील अळी ही अवस्था द्राक्ष पिकासाठी हानिकारक असते. जीवनक्रमातील सर्व अवस्थांपैकी कमकुवत अवस्था जाणून घेऊन नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे आहे.

प्रादुर्भाव ओळखण्याची खूण ः खोड आणि ओलांडे यांना पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर दिसणे हे या खोडकिडीचे सर्वसाधारण लक्षण आहे.

परिणाम -

संपूर्ण द्राक्षवेलीमध्ये आतून पोखरल्यामुळे अन्नद्रव्य आणि पाणी घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. वेलींची पाने शिरामधून पिवळी पडतात व नंतर तांबूस होऊन वाळून जातात.

अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण द्राक्षवेल दगावू शकते. खोडकिडीने प्रादुर्भावित वेलीवरील द्राक्षघडांची गुणवत्ता व उत्पादन कमी होते. त्याचा मोठा आर्थिक फटका बसतो.

या किडीच्या बहुतांश अवस्था या वेलीच्या आत असतात. त्यामुळे कोणत्याही कीटकनाशकाने प्रभावी नियंत्रण मिळत नाही. त्यामुळे किडीसाठी वार्षिक उपाययोजना करण्याची गरज असते. या किडीच्या नियंत्रणासाठी ऑक्टोबर ते जानेवारी हा कालावधी फार महत्त्वाचा आहे.

उपाययोजना ः

१) खोडकिडीचे प्रौढ जुलै ते सप्टेंबर महिन्यांत बाहेर पडतात, त्यांना पकडून मारून टाकावे.

२) शेजारील प्रादुर्भावित बागेतून खोडकिडीचा शिरकाव टाळण्यासाठी बागेच्या चारही बाजूंनी शेडनेट लावल्यास फायदा होईल.

३) ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात अळी खोडावरील ओल्या सालीवर खाण्यास सुरुवात करते. यात झाडाला झालेल्या जखमेतून झाड द्रव उत्सर्जित होतो. बागेत सकाळी लवकर ६ ते ८ वाजेपर्यंत सर्वेक्षण केल्यास वेलीच्या भागावर हा ओलावा हे सहजपणे दिसू शकतो.

४) ओलावा दिसलेल्या ठिकाणी व्यवस्थित निरीक्षण केल्यास खोडकिडीने केलेली जखम भुश्शाने भरलेली दिसेल. त्याच वेळेस त्यातील खोडकिडीची अळी काढून मारून टाकावी.

५) याप्रकारे ८ दिवसांतून १ दिवस बागेत सकाळी लवकर फेरी मारून खोड अळ्या काढून मारून टाकाव्यात. या पद्धतीने नियोजन केल्यास बागेतील खोडकिडीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

६) आठवड्यातून फेरी मारत असताना नजर चुकीने राहिलेल्या वेलींवरील खोड अळी आत जाऊन खाण्यास सुरुवात करतात. त्या भुस्सा बाहेर टाकतात. पुढील फेरी मारताना ज्या वेलींखाली भुस्सा पडलेला दिसल्यास त्यांना चिन्हांकित करून ठेवावे.

७) या चिन्हांकित द्राक्षवेलीतील अळी लवकरात लवकर काढून टाकावी. खोड अळी काढण्यासाठी स्क्रू-ड्रायव्हरच्या व पकडीच्या मदतीने वेलींना खोड अळीच्या छिद्राजवळ दोन भागांत चिरावे. ज्या दिशेने खोड अळीने खाल्ले असले त्या बाजूस अंदाजाने चिरत जावे. खोड अळी वेळीच बाहेर काढून मारून टाकावी.

८) खोड अळी काढताना द्राक्षवेल जास्तीत जास्त मध्यापर्यंतच चिरली जाईल, याची दक्षता घ्यावी. अन्यथा, वेलीचे दोन भाग होऊन नुकसान होईल.

९) खोड अळी काढलेल्या वेलीच्या चिरलेल्या जागेवर सुतळीने घट्ट बांधून घ्यावे. त्यामुळे जखम भरून ती वेल पुन्हा व्यवस्थित जोडली जाईल. यावर शेणाचा लेप लावल्यास जखम भरण्यास आणखी फायदेशीर ठरेल. कालांतराने जखम भरून निघाल्यानंतर वेलीचे खोड फुगते व सुतळी आत शिरण्यास सुरुवात होते, अशा वेळी सुतळी काढून टाकावी.

१०) अशा खोड अळी काढलेल्या द्राक्षवेलींची योग्य काळजी घेतल्यास उत्पादनात कुठलाही फारसा फटका बसत नाही. त्या वेली पुढील वर्षी चांगले उत्पादन देतात. कमी वयाच्या द्राक्षवेलींच्या जखमा अधिक वेगाने व प्रभावीपणे भरून निघतात.

११) काही बागायतदारांना फळ हंगामात वेलींना जखमा करण्यास संकोच वाटू शकतो. त्यांनी मालकाढणीनंतर विश्रांतीच्या काळात वेली चिरून खोड अळी बाहेर काढून नष्ट करावी.

मात्र या काळामध्ये खोड अळी छिद्रापासून खूप लांबपर्यंत पोखरत गेलेली असू शकते. अळी बाहेर काढण्यासाठी थोडेसे अवघड होऊ शकते. तसेच त्यासाठी जास्त वेळ व कष्ट लागू शकतात.

१२) अशा प्रकारे द्राक्ष बागेतील या किडीची अळी अवस्थाच नष्ट केल्यामुळे पुढील उत्पत्तीला आळा बसतो. त्याचे चांगले नियंत्रण मिळू शकते.

डॉ. दीपेंद्र सिंह यादव, ९२७२१२२८५८ - (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT