Amul vs Nandini Milk
Amul vs Nandini Milk Agrowon
ॲग्रो गाईड

Amul & Nandini Milk : स्पर्धा नंदिनी आणि अमूलची

डॉ. नागेश टेकाळे

डॉ. नागेश टेकाळे

आज काल वादविवाद, भांडणे साध्या क्षुल्लक कारणावरून सुद्धा होतात आणि नंतर ती पेटतात. त्यामध्ये तेल ओतून भडका निर्माण करणाऱ्याही काही व्यक्ती असतात. अशावेळी एकाच रक्ताच्या दोघांमधील भांडण एवढे विकोपाला जाईल यावर कुणाचाही विश्वास बसत नाही पण हे सत्य आहे.

आता आपल्या नंदिनी आणि अमूल या बहीण भावाचेच उदाहरण घ्या ना. दोघेही डेअरी समाजामधील. बहीण कर्नाटकात १९८५ पासून सुखाने नांदत आहे आणि विशेष म्हणजे अनेक घरात लोकं झोपेतून उठण्याच्या आधीच ती पोहोचलेली असते.

अमूलचेही तसेच. १९४६ च्या अखेरीस जन्मलेल्या अमूलने अवघा गुजरात पार करून आता शेजारच्या महाराष्ट्रात सन्मानाने प्रवेश केला आहे. एवढेच काय भारतात सर्वत्र त्याचाच संचार आज ‘अमूल दूध पिता है इंडिया’ या घोष वाक्यावर सुरू आहे.

डेअरी कुटुंबामधील सर्व बहिण-भावंडे आपआपल्या राज्यामधील घरात सुखाने नांदत असताना आता अचानक अमूलला कर्नाटकामधील बेंगळुरु स्थित आपली बहीण नंदिनीला भेटण्याची इच्छा झाली आहे.

तशी त्याची तयारी मागील डिसेंबरपासूनच सुरू होती पण अचानक कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि हीच खरी सुसंधी म्हणून अमूलने कर्नाटक वारीसाठी त्याची बॅग भरली आहे. यामागचे मुख्य कारण आहे या दोघांच्या दुधामधील किमतीत असलेली प्रचंड मोठी तफावत!

सध्या नंदिनी दूध स्थानिक पातळीवर ३९ रुपये प्रतिलिटर आहे तर अमूल ५४ रुपये. अमूलचे फूल क्रिम दूध ६६ रुपये प्रतिलिटर तर नंदिनीचे दूध ५० रुपये एका लिटरला पडते. नंदिनी दह्याची किंमत प्रतिकिलो ४७ रुपये तर अमूलचे दही तब्बल ६७ रुपये किलो आहे.

आज नंदिनी दूध, दही आणि इतर उत्पादने कर्नाटकात जास्त उपयोगात येतात ती याच किमतीमधील तफावतीमुळे आणि याचमुळे कर्नाटक को ऑपरेटिट मिल्क प्रोड्यूसर फेडरेशनच्या स्पर्धेत तेथे कोणीही नाही आणि असला तरी तेथे टिकू शकत नाही.

नंदिनीचे दूध आज भारतामध्ये सर्वांत स्वस्त दराने विकले जाते असे केएमएफ ( कर्नाटक मिल्क फेडरेशन) चे अध्यक्ष अभिमानाने सांगतात. हे दूध एवढे स्वस्त का? यामागची पार्श्वभूमी आपणास माहीत असणे गरजेचे आहे.

२००८ सप्टेंबर मध्ये त्यावेळच्या कर्नाटक शासनाने प्रत्येक शेतकरी जो केएमएफला दूध घालतो त्यास दोन रुपये प्रतिलिटर अनुदान प्रोत्साहन म्हणून दिले होते. मे, २०१३ मध्ये आलेल्या नवीन सरकारने हेच अनुदान दुप्पट म्हणजे ५ रुपये केले.

नोव्हेंबर, २०१९ मध्ये पुन्हा नवीन सरकार आले आणि पुन्हा या अनुदानात वाढ होऊन ते प्रतिलिटर ६ रुपये झाले, या प्रोत्साहित अनुदानामुळे कर्नाटक शासनास त्याची झोळी १२०० कोटी रुपयांनी रिकामी करावी लागली.

आज परिस्थिती अशी आहे की काहींना वाटते अमूल नंदिनीला गिळंकृत करणार तर सध्याचे सरकार म्हणत आहे की तब्बल २२ हजार कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या नंदिनीस अमूल बेंगळुरुमध्ये वाजत गाजत आले तरी असे काहीही होणार नाही.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने जाहीर केले की ५ एप्रिल पासून आम्ही बेंगळुरू शहरात अमूल दूध आणि दही इ कॉमर्सद्वारे विकणार याला प्रत्युत्तर म्हणून ६ एप्रिल रोजी बेंगळुरुच्या हॉटेल असोशियनने शहरामधील त्यांच्या सर्व सदस्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये अमूल न घेता स्थानिक नंदिनी दूधच वापरावयाचे आवाहन केले.

अजून एक कळीचा मुद्दा म्हणजे कर्नाटक सरकारने सेंद्रिय शेती आणि त्यास जोडून दुग्ध व्यवसायास दिलेले प्रोत्साहन. आज या राज्यामधील लाखो शेतकरी पारंपरिक सेंद्रिय शेती करत असताना त्यास जोड धंदा म्हणून दूध उत्पादन घेऊन तो केएमएफला गाव पातळीवर हमीभावापेक्षा सहा रुपये प्रतिलिटर जास्त शासकीय अनुदान घेऊन दूध घालत आहेत.

याच दुग्ध व्यवसायातून त्यांना त्यांच्या सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे शेणखत सुद्धा मिळते. आज या सर्व शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर चांगलाच उंचावलेला आहे. प्रश्न हा आहे की अमूलचा हा प्रवेश या शेतकऱ्यांना मारक तर ठरणार नाही? केएमएफ अमूलच्या ताब्यात जाण्याची शक्यता नाहीच.

मात्र, गेले तर शेतकऱ्यांना प्रतिलिटर सहा रुपये मिळणाऱ्या अनुदानाचे काय होणार? नंदिनीची किंमत अमूल स्वीकारणार का? या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. सध्याचे शासन म्हणत आहे, स्पर्धा ही हवीच, आम्ही अमूलच्या स्पर्धेत नंदिनीस पूर्ण ताकदीने उतरवू कारण कर्नाटकाप्रमाणे इतर राज्यात म्हणजे तामिळनाडू, महाराष्ट्रात सुद्धा नंदिनीचे दूध विकले जाते.

या पार्श्वभूमीवर अमूलचे संचालक जयेन मेहता म्हणतात, अमूल दूध ही जशी शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांकरिता चालवलेली शाश्वत यशस्वी आर्थिक उलाढाल आहे तसेच नंदिनी सुद्धा.

अमूल ही सर्व दूध उत्पादक संघाचे स्वागत तर करतेच त्याचबरोबर त्यांच्या उत्पादनांमध्ये निरोगी स्पर्धा सुद्धा आहे. ग्राहक हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या पसंतीस पडण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो.

इतरांनीही आमच्या बरोबर चालावे, यात नंदिनीला मागे ढकलण्याचा प्रश्नच नाही. ते पुढे म्हणतात, अमूलसाठी कर्नाटक नवीन नाही, आम्ही उत्तर कर्नाटकमध्ये म्हणजे बेळगाव, धारवाड भागात २०१५ पासून आहोत. नंदिनी सुद्धा तेथे आहेच फक्त बेंगळुरुमध्येच आमचा आजपर्यंत प्रवेश नव्हता, तो आता झाला आहे. यामध्ये नंदिनीशी कुठेही स्पर्धा करायचा प्रश्नच येत नाही.

कर्नाटक शासनाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर सहा रुपये दिलेल्या हमीभावामुळे जास्तीच्या अनुदानामुळे केएमएफ चे दुधाचे संकलन २००८ मध्ये ३० लाख लिटर प्रतिदिवस पासून २०१५ मध्ये ५८ लाखाच्या वर गेले होते तर २०२२ मध्ये ते ८४ लाखाच्याही पुढे होते,

अमूलचे हेच संकलन २०२२ मध्ये २६४ लाखाच्या आसपास होते. हे दोन्ही संघाच्या एकत्रित संकलनाचा हिस्सा भारताच्या एकूण दूध संकलनाच्या ६० टक्के एवढा आहे. आता प्रश्न आहे किमतीचा.

नंदिनी दुधाचे प्रतिलिटर दर, तिचे ग्राहक यांना अमूलचा धक्का बसणे सध्या तरी शक्य नाही आणि जोपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिलिटर अनुदान सुरू आहे, तोपर्यंत अमूल नंदिनीच्या जवळपास फिरकू शकत नाही.

भारतातच नव्हे तर जगभरात विस्तार असलेल्या अमूलचे अचानक बेंगळुरुमध्ये येणे ही फार मोठी घटना नाही.

जोपर्यंत कर्नाटकामधील बावीस हजार लहान मोठ्या खेड्यात पसरलेले २४ लाख दूध उत्पादक आणि त्यांचे चौदा हजार दूध संघ त्याचबरोबर या सर्वांचे ८४ लाख लिटर प्रति दिवस संकलन सुरू आहे आणि जोपर्यंत शासनाचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यासाठी सुरू आहे तो पर्यंत तरी नंदिनी दुधाला अमूलची अजिबात भीती असू नये.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dried Fish Rate : कोकणात मागणीमुळे सुक्या मासळीचे दर वधारले

Oilseeds Research Award : ‘पंदेकृवि’च्या तेलबिया संशोधन केंद्राला पुरस्कार

Crop Damage : मराठवाड्यात नऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Jamun Production : जांभळाच्या उत्पादनात घट

India Monsoon : मॉन्सूनची वेळेत वर्दी

SCROLL FOR NEXT