Grunion fish Agrowon
ॲग्रो गाईड

Grunion Fish : ग्रुनियन माशांचे प्रजनन ः जीवशास्त्रातील अनोखी घटना

Team Agrowon

डॉ. व्यंकटराव घोरपडे

Fish Farming : अमेरिकेतील अभ्यास दौऱ्यामध्ये मला अमेरिकेत कॅलिफोर्निया, लॉसएंजलिस येथील समुद्रकिनारी रात्री दहा ते एक या कालावधीत ग्रुनियन मासे अंडी देण्यासाठी आलेले पाहावयास मिळाले. हा एक जीवशास्त्रातील अनोखी घटना आहे. ग्रुनियन मासा पुनरुत्पादनासाठी किनाऱ्यावर येतो. हवामान बदलाच्या काळात आपापल्या भागातील निसर्गचक्राचे संरक्षण आणि संवर्धन पर्यावरणाच्या समतोलासाठी महत्त्वाचे आहे.

आपण ऑलिव्ह रिडले कासवांबद्दल खूप काही ऐकले, वाचले आहे. दुर्मीळ असणारी ही प्रजाती ओडिशा, गोवा आणि कोकणात आढळते. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वांगणी, तांबळडेग आणि गोव्यातील मोरजी समुद्रकिनारी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ऑलिव्ह रिडले कासवाची मादी किनाऱ्यावर येऊन अंडी घालते. साधारणपणे ५५ ते ६० दिवसांत त्यातून कासवाची पिले बाहेर पडून पुन्हा समुद्रात जातात. या अंड्याची चोरी होऊ नये, अन्य पक्षी, श्‍वान, मांजरांनी अंडी, पिलांचे भक्षण करू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते.

अंडी घातलेल्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवून पिले बाहेर पडल्यानंतर वन विभागाच्या देखरेखीखाली समुद्रात सोडली जातात किंवा त्याचा समुद्रापर्यंतचा मार्ग विना अडथळा पार पडण्यासाठी मदत करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी अनेक निसर्ग प्रेमी मंडळी, ग्रामपंचायत, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अंडी घालण्यासाठी कासवाने खड्डा खोदणे, त्यामध्ये अंडी घालून परत तो खड्डा बुजवून समुद्रात निघून जाणे याबाबतच्या चित्रफिती तसेच पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष पाहिलेले असते.


हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे अशाच प्रकारे समुद्र किनाऱ्यावर येऊन अंडी घालणारे मासे म्हणजे ग्रुनियन मासे. अमेरिकेतील अभ्यास दौऱ्यामध्ये मला कॅलिफोर्निया, लॉसएंजलिस येथील समुद्रकिनारी रात्री दहा ते एक या कालावधीत ग्रुनियन मासे अंडी देण्यासाठी आलेले पाहावयास मिळाले. ही जीवशास्त्रातील एक अनोखी घटनाच आहे. ग्रुनियन नर, मादी मासे पुनरुत्पादनासाठी किनाऱ्यावर येतात, वाळूत अंडी घालतात. साधारणपणे १४ ते १५ दिवसांनंतर अंड्यातून पिले बाहेर पडतात आणि ती पुन्हा समुद्रात जातात.

ग्रुनियन माशांचे प्रजनन ः
ग्रुनियन मासे साधारणपणे पाच ते सहा इंच लांब, पातळ आकारमान आणि चमकणारे असतात. दात नसल्यामुळे समुद्रात तरंगणारे सूक्ष्मजीवांना खाऊन ते जगतात. मात्र त्यांना पक्षी, समुद्रातील सस्तन प्राणी, मोठे मासे, शार्क मासे खातात. साधारणपणे तीन ते चार वर्षे हा मासा जगतो. हे मासे पॅसिफिक महासागराच्या संपूर्ण किनारपट्टीवर आढळतात. सुमारे ९० टक्के मासे हे सॅनडियागो, लॉसएंजलिस आणि ऑरेंज काउंटी किनारपट्टीजवळ दिसतात. ज्या वेळी हे मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात तेव्हाच त्यांचे दर्शन घडते. पुन्हा ज्या वेळी समुद्रात जातात त्या वेळी कोणाच्याही नजरेस पडत नाहीत. असे मत्स्य अभ्यासक डॉ. कॅरेन मार्टिन सांगतात.


एप्रिल, मे आणि जून महिन्यांत मोठ्या प्रमाणात हे मासे किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. भरती आणि ओहोटी माशांसाठी महत्त्वाची आहे. जेव्हा पौर्णिमा आणि अमावास्येला भरती येते, मोठ्या लाटा येतात, त्या वेळी प्रत्येक लाटेबरोबर हे मासे किनाऱ्यावर येतात. पहिल्यांदा नर मासे येतात. नंतर मादी माशांसोबत नरदेखील किनाऱ्यावर येतात. एखाद्या नृत्य आविष्काराप्रमाणे मासे एकत्र असतात. त्याच वेळी मादी आपल्या शेपटीने वाळूत खड्डा खोदून घुसते. त्या ठिकाणी अंडी घालते. त्याच वेळी दोन ते तीन नर मासे मादी सभोवती असतात. ते मादीला आपल्या शरीराने गुंडाळून पुरुष बीज सोडून अंडी फलित करतात. साधारणपणे दोन ते तीन तासांतच हे सर्व संपते. नर फलनानंतर या ठिकाणी तीस सेकंद ते वीस मिनिटांपर्यंत जमिनीवर राहून परत पाण्यात परततात.

सुईच्या टोकाएवढी असणारी ही अंडी वाळूतच उबवली जातात. साधारण १३ ते १४ दिवसांनी पिले पुन्हा भरती येते, त्या वेळेस वाळूतून बाहेर पडतात. भरतीच्या लाटेमुळे वाळू उघडी पडते.
लाटेमुळे पाणी उपलब्ध झाल्यामुळे अंडी मोठ्या प्रमाणात वाळूमधून हलतात, त्यातून पिले बाहेर पडतात. ती पाण्याबरोबर पुन्हा समुद्रात वाहून जातात आणि एक प्रकारे जन्मफेरी पूर्ण होते.

पर्यटकांसाठी ‘ग्रुनियन रन’
समुद्रकिनारी ग्रुनियन माशांनी अंडी घालणे आणि त्यातून जन्मलेली पिले पुन्हा समुद्रात जाणे या घटनाक्रमाला ‘ग्रुनियन रन’ असे म्हणतात. साधारण फेब्रुवारी ते सप्टेंबरदरम्यान हे घडत असते. याचबरोबरीने एप्रिल, मे आणि जून महिन्यात अगदी मोठ्या प्रमाणात हे मासे किनाऱ्यावर येत असतात. त्या वेळी जगभरातील पर्यटक या समुद्र किनाऱ्यास भेट देतात.

कॅब्रिलो बीचवर एक मत्स्य व्यवसाय आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष अंडी मिश्रित वाळू पर्यटकांना काचेच्या डबीतून हलवायला देऊन लाटा, कंपने निर्माण झाल्यानंतर बाहेर पडणारी पिले पाहण्याची संधी मिळते. नंतर ही पिले परत समुद्राच्या पाण्यात सोडून दिली जातात. रात्रीच्या वेळी भरतीच्या मोठ्या लाटा येतात, तेव्हा किनाऱ्यावर ‘ग्रुनियन रन’ पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते.

त्या वेळी किनाऱ्यावर संबंधित मत्स्यालयातील कर्मचारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतात, माशांच्या प्रजननाबाबत माहिती देतात. पूर्ण शांततेत, कोणत्याही प्रकारचा प्रकाश किनाऱ्यावर न टाकता, पायाची कंपने जाणवू न देता बसून राहिल्यास साधारण ३० ते ४० मिनिटांमध्ये ग्रुनियन मासे किनाऱ्यावर येण्यास सुरुवात होते. चंद्रप्रकाश असेल तर ते चमकताना दिसतात. मोबाईल, बॅटरीचा उजेड पडला, की मात्र त्यांना पाण्यातून बाहेर येण्यास वेळ लागतो.


सध्याच्या काळातील हवामान बदल, महासागराच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. त्याचा काही प्रमाणात परिणाम ग्रुनियन माशांच्या प्रजननावर दिसतो आहे, याबाबत मत्स्य अभ्यासक डॉ. मार्टिन यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या निसर्गचक्राचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक झाले आहे.
----------------------------------------------------
(लेखक सेवानिवृत्त सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT