Medicinal Plant
Medicinal Plant Agrowon
ॲग्रो गाईड

मायाळू ः औषधी वनस्पती

टीम ॲग्रोवन

भारतभर सर्वत्र आढळणारा मायाळू (Basella Alba) हा खाद्यवेल बहुवर्षायू असून, बहुशाखीय आणि खूप मोठा वाढणारा आहे. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि उष्णकटीबंधीय देशातील हवामानात सहजपणे लावली जाणारी आणि भरभर वाढणारी ही वनस्पती आहे. मायाळूचा वेल (Basella Alba Climber) कुंडीत लावता येत असल्यामुळे अगदी छोट्या जागेत, गच्चीवर, बाल्कनीत किंवा अगदी खिडकीतही वाढवता येते. पाणी मात्र व्यवस्थित घालण्याची आवश्‍यकता असते. (Basella Alba Medicinal Plant)

१) बिया लावून किंवा अगदी छाटकलमाच्या साह्याने हा वेल लावता येतो. वेलाचे खोड आणि फांद्या आधारावर गुंडाळत वाढतात. खोड व फांद्या गुळगुळीत तांबड्या किंवा जांभळट लाल रंगाच्या, काहीशा मांसल असतात.

२) वेल वाढण्यासाठी मांडव तयार करता येतो किंवा नुसत्या दोऱ्या अगर तारा बांधून त्यावरही तो सहजपणे चढतो. एखाद्या फार दाट पर्णसंभार नसलेल्या (उदा. शेवगा) वृक्षावरही तो सोडता येतो.

३) पाने साधी एकांतरित म्हणजे एका पेरावर एकच पान अशी, मध्यम आकाराची, गोलसर, जाडसर, थोडीशी मांसल, हिरवीगार पण जांभळट लाल रंगाची छटा असलेली असतात.

४) ऑक्‍टोबर ते जानेवारी या काळात फुले येतात. छोट्या-छोट्या तुऱ्यांमध्ये जांभळट पांढऱ्या रंगाची फुले येतात. फळे मोठ्या वाटाण्या किंवा छोल्याएवढी जांभळट लाल, रसाळ असतात. पिकलेले फळ काळे होते. प्रत्येक फळात एकच बी असते. ती वाळल्यावर काळी होते आणि काळ्या मिरीसारखी दिसते.

५) हिरवीगार पाने असलेली आणि पांढरट रंगाची फुले येणारी एक उपजातही अस्तित्वात आहे.

वनस्पती वर्गीकरण ः

१) शास्त्रीयदृष्ट्या मायाळूचा समावेश पूर्वी चाकवत कुळात म्हणजे चिनोपोडिएसी फॅमिलीत करत असत. आता त्याची गणना त्याच्या स्वतंत्र कुळामध्ये -फॅमिली बॅसेल्लसीमध्ये केली जाते.

२) वनस्पतीशास्त्रीय नाव ः बॅसेल्ला अल्बा व्हरायटीरूब्रा

३) पोषणमूल्य ः "अ' जीवनसत्त्व आणि "क' जीवनसत्त्वाने समृद्ध.

४) मायाळूला काही भागात मायाळ, वेलबोंडी किंवा पोई, पुई असे म्हणतात. संस्कृतमध्ये उपोदकी आणि पोतकी अशी नावे आहेत. इतर काही भाषांतील नावे अशी ः हिंदी - पोई, गुजराती - पोथीनी भाजी, कन्नड - विळ्‌ळिवासळे, तमीळ - वेल्लपच्‌लै, तेलगू - अल्लूवच्चलि, कोकणी - धविवाली, इंग्रजी - इंडियन स्पायनॅच.

५) आयुर्वेदामध्ये मायाळूचे औषधी उपयोग सांगितले आहेत. "अंगावर पित्त उठते त्यावर पानांचा रस चोळतात त्याने खाज आणि आग कमी होते. त्यावर मायाळूची भाजीही खायला देतात. परम्यातही पानांचा रस प्यायला देतात.

६) त्रास न होता सारक म्हणून पोट साफ होण्यासाठी मायाळूच्या पानांचा रस गर्भारशी युवतींना त्याचप्रमाणे बालकांना देण्यासही योग्य आहे असेही धन्वंतरी निघण्टूमध्ये सांगितले आहे.

७) मायाळूच्या पानांची भाजी, सूप त्याचप्रमाणे भजी अप्रतिम होतात. लसणाची फोडणी दिलेली घट्ट भाजी, आलू-पालकसारखी आलू-मायाळूची भाजी किंवा दाणे, ताक वगैरे घालून केलेली अळूच्या भाजीसारखी पातळ भाजी फारच छान होते. सूप मस्तच होते. त्यामुळे तोंडाला चांगली चव येते.

८) मायाळूच्या वेलाचे सगळेच भाग खाण्यायोग्य आणि पौष्टिक असतात. रसाळ फळातील तांबडा-जांभळा रस लिंबाच्या सरबतात घातला तर त्याला सुंदर लालसर, गुलाबी किंवा जांभळट रंग येतो.

९) शिक्‍क्‍यांची जांभळी शाई बनवण्यासाठीही ही फळे वापरतात.

--------------------------

संपर्क ः श्री. द. महाजन,०२० - २४३३२७४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT