mealybugs Management Agrowon
ॲग्रो गाईड

द्राक्ष बागेतील पिठ्या ढेकूण किडीचे व्यवस्थापन

मिलीबगच्या प्रसारात मुंग्यांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणामध्ये मुंग्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक ठरते.किडीकडून स्रवलेल्या चिकट द्रव पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. पानांवरील अशा वाढीमुळे प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. द्राक्षवेलींच्या वाढीवर परिणाम होतो.

Team Agrowon

डॉ. दीपेंद्र सिंह यादव, संतोष आजबे, गोकूळ शंखपाळ

द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या विविध रसशोषक किडींपैकी मुख्य पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीचा प्रादुर्भाव होताना दिसतो.

ओळख व जीवनक्रम :

-मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असते व मादीला पंख नसतात.

-नर हे कोषावस्थेच्या आधी आणि कोषावस्थेत विशेषतः गुलाबी रंगाचे असतात.

-मादी कापसासारख्या पुंजक्‍यांत अंडी घालते, त्याला अंडी थैली असे म्हणतात. अशा अंडी थैल्या वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, खोडाभोवती दिसून येतात.

-मिलीबगची पिले व प्रौढ या दोन्ही अवस्था द्राक्षवेलीच्या नवीन फुटलेल्या पालवीवर, मुख्य खोड व ओलांड्यावर विशेषत: खरड छाटणीनंतर व फळछाटणीनंतर रस शोषून घेतात. प्रादुर्भावामुळे पाने विकृत, विखुरलेली, आकसलेली आणि गुच्छदार होतात. परिणामी, द्राक्ष वेलीची वाढ खुंटते. मण्यांमध्ये पाणी भरण्याच्या स्थितीमध्ये ही कीड खोडापासून ओलांडे फांद्या व द्राक्षांच्या मण्यांवरती स्थलांतरित होते. त्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट द्रवामुळे द्राक्षघड चिकट बनतात. झाडांभोवती मुंग्या गोळा होतात.

-मिलीबगच्या प्रसारात मुंग्यांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणामध्ये मुंग्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक ठरते.

-किडीकडून स्रवलेल्या चिकट द्रव पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. पानांवरील अशा वाढीमुळे प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. द्राक्षवेलींच्या वाढीवर परिणाम होतो.

नियंत्रणासाठी उपाययोजना

मिलीबग नियंत्रणासाठी वर्षभर नियमितपणे काही उपाययोजना कराव्या लागतात.

खरड छाटणीनंतर करावयाचे नियोजन

  • एप्रिल छाटणीनंतर, बुप्रोफेझिन (२५% एससी) १.२५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे खोड आणि ओलांडे धुऊन घ्यावे.

  • एप्रिल छाटणीनंतर मिलिबग नियंत्रणासाठी खोड व ओलांड्यावरील साल काढू नये. या कालावधीत साल काढल्यास एप्रिल आणि मेमधील अधिक तापमानामुळे बागेमध्ये ‘डेड वूड फॉर्मेशन’ होऊ शकते. अशा झाडांवर खोड किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यानंतर कमी होत जाणारे तापमान आणि ढगाळ वातावरणामध्ये या किडीची वाढ जास्त प्रमाणात होते. खोडकीड नियंत्रणासाठी साल काढण्याची योग्य वेळ ही मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या पंधरवडा (पावसाआधी) ही आहे.

  • सबकेननंतर व शेंडा खुडणीनंतर येणाऱ्या मिलिबगच्या प्रादुर्भावामुळे नवीन फुटींमध्ये आकसलेली आणि गुच्छदार पाने तयार होतात. त्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशके इमिडाक्लोप्रिड (१७.८% एसएल) ०.४ मिलि किंवा स्पायरोटेट्रामेट (१५.३१% ओडी) ०.७ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

  • द्राक्ष बागेतील तणांवरही मिलीबगचा प्रादुर्भाव दिसत असला तरी तणांवर येणारी फेनाकोकस सोलेनोप्सिस ही प्रजाती द्राक्षावरील येणाऱ्या प्रजातीच्या तुलनेत वेगळी असते. हा मिलीबग द्राक्ष बागेस जास्त नुकसानकारक नसतो. हे तण काढल्यास यावरील मिलीबग काही खायला न मिळाल्यामुळे खोड, ओलांडे आणि आधारासाठी उभ्या केलेल्या खांबावरती येऊ शकतो. मात्र कोणत्याही फवारणीची गरज नाही. त्याचे प्रमाण थोड्या कालांतराने नैसर्गिकरीत्या कमी होते. तरीही आवश्यकता भासल्यास बुप्रोफेझिन (२५% एससी) १.२५ मिलि प्रति लिटर पाणी अधिक कोणतेही ट्रायसिलॉक्सेन पॉलिमर-आधारित सरफॅक्टंट ०.३ मिलि प्रति लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८% एसएल) ०.४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

  • मिलीबग नियंत्रणासाठी पावसाळ्यात कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. पावसाळ्यात मिलिबगच्या वाढीबरोबरच त्यांच्या परभक्षी कीटकांची वाढ होत असते. हे परभक्षी कीटक मिलीबगला भक्ष्य करून नियंत्रण मिळवतात. मिलीबगच्या उत्पत्तीवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण मिळते. अशा मित्रकिडीच्या संवर्धनासाठी जैविक कीडनियंत्रण पद्धतीचा वापर करावा.

  • त्यासाठी बिव्हेरिया बॅसियाना २ ते २.५ मिलि अधिक मेटारायझिम ॲनासोप्ली २ ते २.५ मिलि अधिक व्हर्टिसिलियम

  • लेकॅनी २ ते २.५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची खोड आणि ओलांडे धुऊन काढावेत. जूनपासून सप्टेंबरपर्यंत महिन्यातून एकदा या प्रमाणे चार वेळा व्यवस्थित खोड, ओलांडे धुवावेत.

फळछाटणीनंतर करावयाचे नियोजन

  • फळ छाटणीनंतर सैल झालेली साल काढून घ्यावी. साल काढल्यानंतर खोड व ओलांडे बुप्रोफेझिन (२५% एससी) १.२५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन धुऊन काढावी.

  • यानंतर दर १० दिवसांनी बागेत निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त वेलींना चिन्हांकित करून ‘स्पॉट ॲप्लिकेशन’ करताना पुन्हा एकदा बुप्रोफेझिनने खोड आणि ओलांडे धुऊन घ्यावेत.

  • नवीन फुटींवर मिलीबगचा प्रादुर्भाव झाल्यास विकृत पाने तयार होतात. त्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. उदा. इमिडाक्लोप्रिड (१७.८% एसएल) ०.४ मिलि किंवा स्पायरोटेट्रामेट (१५.३१% ओडी) ०.७ मिलि प्रति लिटर पाणी.

  • मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत पुन्हा एकदा बुप्रोफेझिन (२५% एससी) १.२५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे खोड आणि ओलांडे धुऊन घ्यावेत.

  • घडांची विरळणी करत असताना ओलांड्याला स्पर्श करणारे व अडचणीमधील घड काढून घ्यावेत. अशा घडांवर मिलीबगचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.

  • पीएचआय च्या समस्येमुळे कीटकनाशकांचा वापर शक्य नसल्याच्या स्थितीत पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव असलेल्या वेलींवरच (खुणा करून) नियंत्रणासाठी, कोणत्याही ट्रायसिलॉक्सेन पॉलिइथर-आधारित सरफॅक्टंट ०.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे १० ते १२ लिटर द्रावण प्रति वेल या प्रमाणे उच्च दाबाने धुऊन काढावे. त्यानंतर खुणा केलेल्या द्राक्षवेली पुन्हा पाण्याने धुऊन काढाव्यात. सरफॅक्टंटचा वापर संपूर्ण द्राक्ष बागेत न करता, केवळ मिलीबग प्रादुर्भावग्रस्त द्राक्षवेलींवरच करावा. पुढील फवारणी दहा दिवसांच्या अंतराने करावी.

निष्कर्ष :-

-पावसाळ्यामध्ये मिलीबगच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी, आळवणी अथवा खोड व ओलांडे धुण्यास वापर करू नये.

-फळछाटणीनंतर कीड नियोजनासाठी बागेमध्ये दर १० दिवसांच्या अंतराने पाहणी करावी. प्रादुर्भावग्रस्त वेलीपुरतीच फवारणी (स्पॉट ॲप्लिकेशन) करावी.

-सलग ४-५ वर्षे या पद्धतीने नियोजन केल्यास मिलीबग खूप प्रमाणात कमी होईल.

डॉ. दीपेंद्र सिंह यादव, ९२७२१२२८५८

(वरिष्ठ संशोधक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT