सुधारित जवस वाणांची लागवड करा
सुधारित जवस वाणांची लागवड करा 
ॲग्रो गाईड

सुधारित जवस वाणांची लागवड करा

जितेंद्र दुर्गे, सविता कणसे

जवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास उत्पादनामध्ये दीडपट ते दुप्पट वाढ होते. पिकाच्या संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे. जवसाच्या तेलात ५८ % ओमेगा-३ मेदाम्ले व अँटी ऑक्सिडंट्स असून, ते उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, ट्रायग्लीसराईडचे रक्तातील उच्च प्रमाण यांना नियंत्रित ठेवण्याचे काम करते. संधिवातावर हे तेल उपयुक्त सिद्ध झालेले आहे. मधुमेही रुग्णांसाठी जवस उत्तम पर्याय आहे. जवस तेलाच्या सेवनाने कर्करोगास प्रतिकारशक्ती निर्माण होते. या आरोग्यासाठीच्या फायद्यामुळे अलिकडे जवस पिकाची लागवड वाढत आहे. जवसाच्या दाण्यांपासून खायचे तेल, वाळलेल्या झाडाच्या खोडापासून उच्चप्रतीच्या धाग्याची निर्मिती केली जाते. जवसाच्या झाडापासून मिळणारा धागा मजबूत व टिकाऊ असतो.

  • वेळेवर जवस पेरणीसाठी ऑक्टोंबरचा दुसरा पंधरवडा तर ओलिताची सोय असल्यास उशिरा पेरणीच्या स्थितीत लागवड १० नोव्हेंबर पर्यंत करता येते.
  • पेरणीसाठी प्रति एकर साधारणतः दहा किलो बियाणे लागते.
  • पेरणीचे दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. , तर दोन झाडातील अंतर १० सें.मी. एवढे अंतर राखले जाते. बियाणे बारीक असल्याने १ भाग बियाणे : २ भाग बारीक रेती मिसळून पाभरीने पेरणी करावी.
  • जवस दाण्यांसाठी प्रति एकर १,६०,००० पर्यंत करावी. धाग्यांसाठी जवसाची पेरणी करताना दोन झाडातील अंतर कमी करून प्रति एकर २,००,००० पर्यंत झाडांची संख्या राखावी.
  • पाभरीने पेरणी करताना पेरणीची खोली साधारणतः ३-४ सें.मी. राखावी.
  •  मर व करपा या रोगांसाठी जवसाचे पीक संवेदनशील असते. त्यामुळे प्रति किलो बियाण्याला थायरम ३ ग्रॅम व कार्बेन्डाझिम २ ग्रॅम याप्रमाणे बुरशीनाशकांची प्रक्रिया पेरणीपूर्वी करावी. वरील रोगांसोबतच जवस पिकावर प्रामुख्याने गादमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
  • जवसाचे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. त्यामुळे भारी जमिनींमध्ये कोरडवाहू परिस्थितीत या पिकाची लागवड करता येते. -मध्यम ते भारी जमिनीत जवस पिकाची लागवड करावयाची असल्यास संरक्षित सिंचनाची सुविधा असणे आवश्यक ठरते.
  • वाण ः

  • कोरडवाहू परिस्थितीत लागवड करण्यासाठी किरण, शीतल, श्वेता, पुसा-३ या वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे. बागायती पिकासाठी जवाहर-२३, एनएल-११२,एनएल - ९७, एनएल-१६५, पीके एनएल-२६० या वाणांची शिफारस केलेली आहे.
  • दाण्यांसाठी तसेच उत्तम प्रतीच्या धाग्यांसाठी सौरव, जीवन या वाणांची शिफारस आहे.
  • देशी वाणांऐवजी सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात शाश्वत वाढ शक्य होते.
  • शेतकऱ्यांनी वाणाची निवड करताना आपल्या परिसरात उपलब्ध वाणाची निवड करावी.
  • खत व्यवस्थापन ः कोरडवाहू पिकासाठी १० किलो नत्र + २० किलो स्फुरद + १० किलो पालाश प्रति एकर अशी शिफारस आहे. म्हणजेच साधारणतः अर्धा बॅग युरिया, सव्वा बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. यासोबतच साधारणतः ५-६ किलो झिंक सल्फेट प्रति एकर द्यावे. रासायनिक खतांची मात्रा, शक्यतोवर शेणखतात मिसळून पेरणीसोबतच द्यावी.     बागायती जवस पिकासाठी २४ किलो नत्र, १२ किलो स्फुरद व १२ किलो पालाश प्रति एकर देण्याची शिफारस आहे. याकरिता पेरणीच्या वेळी साधारणतः अर्धा बॅग युरिया, दिड बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व अर्धा बॅग पोटॅश व ५ किलो गंधक प्रति एकर देण्याची शिफारस आहे. उरलेली नत्राची अर्धी मात्रा (१२ किलो नत्र) म्हणजेच साधारणत: अर्धा बॅग युरिया पेरणीनंतर दीड महिन्यांनी ओलितासोबत अथवा जमिनीत ओल असताना द्यावी. पाणी व तण व्यवस्थापन ः

  • जवस पिकास संवेदनशील अवस्थेत ओलित दिल्यास उत्पादनात दीडपट ते दुप्पट वाढ होते. त्याकरिता पीक फुलोऱ्यात येताना (पेरणीपासून साधारणतः ४५ दिवसांनी) व बोंड धरण्याच्यावेळी (पेरणीपासून
  • साधारणतः ६५ दिवसांनी) याप्रमाणे पाण्याच्या दोन संरक्षित पाळ्या द्याव्यात.
  • जवसाचे पीक व त्यामधील तणे यांच्या दरम्यान तीव्र स्पर्धेचा कालावधी सुरवातीचे ३० दिवस आहे. त्यामुळे पीक ३० दिवसाचे होईपर्यंत गरजेनुसार एक किंवा दोन वेळा निंदण देऊन शेत तणमुक्त ठेवावे. तणांचे अवशेष दोन ओळींमधील जागेत टाकावे.
  • जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक (कृषी विद्या), श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती, महाराष्ट्र

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

    Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

    Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

    Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

    Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

    SCROLL FOR NEXT