झेंडू लागवड तंत्रज्ञान  
ॲग्रो गाईड

झेंडू लागवड तंत्रज्ञान

डॉ. सतीश जाधव बळवंत पवार

झेंडू फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते. याचबरोबरीने बागेमधील रस्ते, लॉन यांच्या कडेला, कुंडीत तसेच हॅंगिंग पॉटमध्ये झेंडूची लागवड केली जाते. 

  • झेंडू फुलांच्या पाकळ्यापासून कॅरोटीनॉइड रसायन तयार करतात. हे कोंबडी खाद्यात मिसळतात, त्यामुळे अंड्याच्या बलकाचा दर्जा सुधारतो. या रंगद्रव्यामध्ये ल्युटेन नावाचे रसायन असते. याचा उपयोग नैसर्गिक रंगद्रव्य म्हणून खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधनामध्ये होतो. कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधामध्ये हे द्रव्य वापरतात. 
  • भाजीपाला व फळपिकांमध्ये सूत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडूचे मिश्रपीक घेतात. 
  • लागवड वर्षभर सर्व हंगामात करता येते. प्रामुख्याने पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर या जिल्ह्यात झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
  • जमीन : 

  • हे पीक विविध प्रकारच्या जमिनींमध्ये येत असले तरी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. 
  • हलकी ते मध्यम जमीन या पिकास पोषक आहे. सकस, भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली असली तरी उत्पादन कमी मिळते.
  • हवामान : 

  • उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात याची वर्षभर लागवड करता येते. फुलांच्या उत्पादनासाठी मध्यम हवामान लागते. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाची वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. थंड हवामानात हे पीक चांगले येते, दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते. जास्त पावसाचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.
  • जाती :  आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू आणि संकरित झेंडू हे प्रकार आहेत.

    आफ्रिकन झेंडू  :  आफ्रिकन झेंडूमध्ये अनेक प्रकार आहेत. झाडाची उंची, वाढीची सवय, फुलांचा रंग, आकार यामध्ये विविधता आढळते. फूल प्रकारानुसार  कार्नेशन आणि शेवंती हे प्रकार दिसतात. उंचीनुसार उंच, सेमी टॉल व डॉर्फ संकरित हे प्रकार पडतात.

  • कार्नेशन प्रकार : झाडे ७५ सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. त्यांना मोठ्या आकाराची (१० सें.मी. व्यास) फुले लागतात, फुले नारंगी, पिवळ्या रंगाची असतात.
  • शेवंती प्रकार : शेवंतीच्या फुलाप्रमाणे ही फुले दिसतात. यामध्ये उंच तसेच बुटकी झाडे आढळतात. 
  • संकरित झेंडू : 

  • उंच संकरित : झाडे ६० ते ७० सें.मी. उंच असतात. मोठी फुले (१२ सें.मी.पेक्षा जास्त व्यास) असतात. 
  • सेमी टॉल : या प्रकारात दाट व सारख्या आकाराची ५० सें.मी. उंचीपर्यंत वाढणारी झाडे आढळतात. फुलांचा १० सें.मी. व्यास असतो. फुले लिंबू तसेच फिक्कट नारंगी रंगाची असतात.
  • ड्वार्फ मध्यम संकरित ः या प्रकारात दाट वाढणारी, एकाचवेळी फुले देणारी, कमी उंचीची झाडे (१४ ते ५० सें.मी.) असतात.
  • आफ्रिकन झेंडूच्या भारतीय जाती
  • पुसा नारंगी गेंदा : 

  • क्रॉक जॉक आणि गोल्डन ज्युबिली या दोन जातीच्या संकरातून निर्माण झालेली ही जात आहे. उंची ८०-८५ सें.मी., १०० दिवस वाढीचा काळ आहे.
  • बी पेरल्यापासून १२५ ते १३५ दिवसात फुलावर येते. ४५ ते ६० दिवस फुलावर राहते. फुले मोठी नारंगी असतात.
  • लागवडीपासून ४५ दिवसांनी शेंडा खुडावा लागतो. 
  • बियाणे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरल्यास फेब्रुवारीमध्ये फुले तोडण्यास तयार होतात.
  • उत्पादन :  

  • २५ ते ३० टन प्रति हेक्‍टरी. 
  • या जातीच्या फुलात  ३२९ मि.लि./१०० ग्रॅम पाकळ्या या प्रमाणात कॅरीटीनॉइड असते. हेक्‍टरी १२०-१३० किलो बीजोत्पादन मिळते.
  • पुसा बसंती गेंदा : 

  • ऑक्‍टोबरमध्ये बी पेरणी, नोव्हेंबरमध्ये रोपांची पुनर्लागवड होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये फुलांची काढणी केली जाते.
  • गोल्डन यलो आणि सन जाइंट या दोन जातींच्या संकरातून तयार झालेली जात आहे.  झाड मध्यम उंचीचे (६० ते ६५ सेंमी) असते. या जातीचा १३० दिवस वाढीचा काळ आहे. 
  • बी पेरणीपासून १३५ ते १४५ दिवसात ही जात फुलावर येते. ४५ ते ५० दिवस फुलांचा काळ असतो. 
  • या जातीला मध्यम आकाराची पिवळसर रंगाची फुले लागतात. झाडाचा ४५ दिवसांनी शेंडा खुडावा लागतो. 
  • उत्पादन प्रति हेक्‍टरी ः  २० ते २५ टन.
  • झेंडूच्या इतर जाती :   

  • एफ-१ संकरित  
  • फ्रेंच झेंडू   : या प्रकारातील झेंडूची रोपे कमी उंचीची असतात. झुडुपासारखी वाढतात. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून, विविध रंगात फुले येतात. डॉर्फ डबल आणि डॉर्फ सिंगल असे फ्रेंच झेंडूचे दोन प्रकार आहेत.
  • फ्रेंच संकरित झेंडू :  रोपे मध्यम उंचीची, भरपूर फुले देणारी असतात.
  • मखमल :  हा प्रकार कमी उंचीचा, आकाराने लहान व दुरंगी फुले देणारा आहे. याचा बागेच्या कडेने ताटव्यासाठी तसेच कुंडीत लागवडीसाठी उपयोग होतो.  
  • गेंदा :  या जातीची फुले मध्यम आकाराची असून हारासाठी वापरतात. यामध्ये भगवा गेंदा व पिवळा गेंदा असे प्रकार आहेत.
  • डबल गेंदा :  कट फ्लॉवरसाठी हा प्रकार वापरतात. फुले मोठी, भगवा, पिवळ्या रंगाची असतात.  या जातीचे उत्पादन कमी असते.
  • रोपनिर्मिती : 

  • रोपांसाठी २ मीटर बाय २ मीटर आकाराच्या गादी वाफ्यावर, ओळीत ४ ते ५ सें.मी. अंतर ठेवून, १ सें.मी. खोलीवर बी विरळ पेरावे. पेरणीनंतर बी शेणखत व माती मिश्रणाने झाकून टाकावे. वाफ्याला झारीने पाणी द्यावे. हेक्‍टरी १ ते १.५ किलो बी लागते.
  • संकरित जातीचे बी महाग असते. त्यामुळे त्याची काळजीपूर्वक पेरणी करावी.
  • रोपे तयार करण्यासाठी प्लॅस्टिक ट्रे व कोकोपिट वापरावे.
  • निर्जंतुक केलेले कोकोपिट ट्रेमध्ये भरून प्रत्येक पेल्यात एक बी टोकून पाणी द्यावे. या पद्धतीने रोपे तयार केली तर २५० ग्रॅम बी पुरेसे होते.
  • तयार केलेल्या रोपांची पुनर्लागवड करावी. रोपे तयार करण्यास भरपूर मजूर लागतात. हे खर्चिक असले तरी लागवडीसाठी बी कमी लागते.
  • लागवड : 

  • जमीन  नांगरून कुळवून तयार करावी. जमीन तयार करताना प्रति हेक्‍टरी ४० टन शेणखत मिसळावे. 
  • जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार सपाट वाफ्यावर व सरी वरब्यांमध्ये लागवड करतात. बी पेरल्यापासून ३० ते ३५ दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. 
  • निरोगी, पाच पानावर आलेली, १५ ते २० सेंमी उंचीची रोपे निवडावीत.
  • लागवड शक्‍यतो सायंकाळी ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळे ३० मिनिटे कॅप्टन ०.२ टक्के प्रमाणातील द्रावणात बुडवून लागवड करावी. 
  • जमीन, हवामान आणि जातीनुसार ६० सें.मी. बाय ६० सें.मी., ६० सें.मी. बाय ३० सें.मी., ४० सें.मी. बाय ९० सें.मी. आणि ३० सें.मी. बाय ३०सें.मी. अंतरावर करावी. 
  • गादीवाफ्यावर लागवड : 

  • रोपांची उत्तम वाढ, फुलांचे जादा उत्पादन व चांगली प्रत मिळण्यासाठी रोपांची लागवड गादी वाफ्यावर करावी. 
  • जमिनीची पूर्व तयारी झाल्यावर ६० सें.मी. रुंद आणि ३० सें.मी. उंच व सोयीनुसार लांब गादी वाफे तयार करावेत. दोन गादी वाफ्यामध्ये ४० ते ४५ सें.मी. अंतर ठेवावे. गादी वाफ्यावर ४५ सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. 
  • ट्रेमधील रोपे कोकोपीटसहित हळुवार काढून कोकोपीटच्या गठ्यासहित वाफ्यावर लावावीत. लागवड केलेल्या दोन रांगांमध्ये ठिकाणी ठिबकची नळी ठेवावी.
  • ठिबक सिंचनामधून पाणी व विद्राव्य खतांची मात्रा द्यावी. लागवड करताना प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. बाजारभावाचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन करावे.
  • रोपांच्या ओळीमधील अंतर (सें.मी.) : 

  • पावसाळी हंगाम : उंच जात ६० बाय ३०, मध्यम जात ६० बाय ४५
  • हिवाळा हंगाम : उंच जात ६० बाय ४५, मध्यम उंच जात ४५ बाय ३०, बुटकी ३०  बाय ३०
  • उन्हाळी हंगाम : उंच जात ४५ बाय ४५, मध्यम जात ४५ बाय ३०
  • टीप :  या पद्धतीने पारंपरिक सरी वरंब्या पद्धतीने लागवड केल्यास एकरी २२,०००, तर गादी वाफा पद्धतीसाठी २६,६०० रोपे लागतात.

    खत व्यवस्थापन :

  • झेंडूच्या आफ्रिकन, फ्रेंच आणि संकरित जाती खताला उत्तम प्रतिसाद देतात.
  • जमिनीची मशागत करताना हेक्‍टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे.
  • माती परीक्षणानुसार १०० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश या खताची द्यावी. संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धी नत्राची मात्रा रोपांची पुनर्लागवड करताना किंवा पुनर्लागवडीनंतर एका आठवड्यांनी द्यावी. उर्वरित अर्धी नत्राची मात्रा ही रोपांच्या पुनर्लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावी. 
  • नत्राची मात्रा जास्त झाल्यास पिकाची शाखीय वाढ भरपूर होते. फुलांचे उत्पादन कमी मिळते. 
  • दर्जेदार उत्पादनासाठी शिफारशीनुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. ठिबक सिंचनाने शिफारशीनुसार विद्राव्य खते वापरावीत.
  • शेंडा खुडणे : 

  • आफ्रिकन झेंडू हा उंच वाढणारा झेंडू असून त्याची वाढ नियंत्रित ठेवून जास्तीत जास्त फुटवे येण्याच्या उद्देशाने शेंडा खुडला जातो. 
  • शेंडा खुडण्याने उंच सरळ वाढणाऱ्या रोपाची वाढ थांबते, भरपूर बगल फुटी फुटतात, त्यामुळे झाडाला झुडपासारखा आकार येतो.
  • शेंडा खुडण्यास फार वेळ झाला तर अपेक्षित परिणाम मिळत नाही.
  • आंतरमशागत : 

  • रोप लागवडीनंतर दोन आठवड्यांनी खुरपणी करावी. 
  • खुरपणी करताना रोपाला भर द्यावी, त्यामुळे रोपे फुलाच्या ओझ्यांनी कोलमडत नाहीत.
  • पाणी व्यवस्थापन : 

  • खरीप हंगामात पाऊस नसेल तर १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. 
  • रब्बी हंगामात ८ ते १० दिवसांनी, तर उन्हाळी हंगामात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. 
  • फुलांचे उत्पादन चालू झाल्यानंतर फुलांची काढणी पूर्ण होईपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. 
  • फुलांची काढणी : 

  • लागवड केल्यापासून ६० ते ६५ दिवसांत फुले काढणीस तयार होतात.
  • फुले पूर्ण उमलल्यानंतर काढणी करावी. उमललेली फुले देठाजवळ तोडून काढावीत. 
  • काढलेली फुले थंड ठिकाणी ठेवावीत, काढणी शक्‍यतो संध्याकाळी करावी.
  • स्थानिक बाजापेठेसाठी बांबूच्या करंड्या किंवा पोत्यात बांधून फुले पाठवावीत. 
  • हंगाम, जात, जमीन, हवामान यानुसार फुलांच्या उत्पादनात विविधता आढळते. 
  • उत्पादन (प्रतिहेक्‍टरी) : 

  • आफ्रिकन झेंडू ः१५ ते१८ टन 
  • फ्रेंच झेंडू ः १० ते १२ टन 
  • पीक संरक्षण : 

    कीड नियंत्रण  :  झेंडूवर पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.  नियंत्रण :  

  • प्रादुर्भाव दिसताच ॲसिफेट एक ग्रॅम किंवा डायमेथोएट एक मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
  • लाल कोळीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • रोग नियंत्रण :  मर :  हा बुरशीजन्य रोग आहे. उष्ण व दमट हवामानात याचा प्रादुर्भाव होतो. लक्षणे :  पाने पिवळी पडतात, मुळे कुजतात, परिणामी झाड वाळून जाते. आफ्रिकन झेंडू जातींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.   नियंत्रण : 

  • लागवडीसाठी निचऱ्याची जमीन निवडावी. दर वर्षी पीक फेरपालट करावी.
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडाजवळ एक लिटर पाण्यात एक ग्रॅम कार्बेन्डाझिम  मिसळून आळवणी करावी, तसेच फवारणी करावी.
  • करपा :  हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाचा प्रादुर्भाव प्रथमत: झाडाच्या खालच्या पानांवर दिसून येते. तेथून रोग वरपर्यंत विस्तारतो.  लक्षणे : पानावर काळे ठिपके दिसतात, ते पुढे विस्तारतात. त्यामुळे पाने गळतात, झाड मरते.  नियंत्रण :  

  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच  रोगट पाने जाळून टाकावीत. नियंत्रणासाठी मॅंकोझेब ०.२ टक्के किंवा कार्बेन्डाझिम ०.१ टक्के द्रावणाची आलटून पालटून १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या गरजेनुसार कराव्यात.
  • संपर्क ः ०२०- २५६९३७५० (लेखक अखिल भारतीय समन्वयित पुष्पसुधार प्रकल्प,  राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Namo 7th Installment : शेतकऱ्यांना दिलासा; नमोच्या सातव्या हप्त्यासाठी १९३२ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

    Farmers Celebration: शेतशिवारात भरघोस धान्य पिकू दे!

    Agriculture Technology: मजुरी, वेळेत बचत करणारे ऊसतोडणी यंत्र

    Monsoon Rain Forecast: राज्यात २ दिवस पावसाची शक्यता; कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

    Rain Crop Damage: खानदेशात पावसाने हानी, अनेक भागांत हजेरी

    SCROLL FOR NEXT