Symptoms of tuber rot 
ॲग्रो गाईड

केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे व्यवस्थापन

सद्य स्थितीमध्ये केळी पिकावर बुरशीजन्य करपा (सिगाटोका) व जिवाणूजन्य कंद कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, वेळीच रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

डॉ. कृष्णा पवार, सतीश माने

उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे केळी बागेमध्ये रोगांच्या प्रादुर्भाव वाढत आहे. सद्य स्थितीमध्ये केळी पिकावर बुरशीजन्य करपा (सिगाटोका) व जिवाणूजन्य कंद कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, वेळीच रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. राज्याच्या विविध भागातील केळी पिकावर बुरशीजन्य करपा (सिगाटोका) व जिवाणूजन्य कंद कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र दिसत आहे. या रोगांमुळे केळी पिकाच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते. परिणामी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. करपा रोगाची लक्षणे 

  • या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला खालील पानांवर आढळून येतो.
  • पानांवर लहान लांबट गोलाकार फिक्कट पिवळसर ठिपके पडतात. ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन लांबट पिवळ्या रेषा पानाच्या उप शिरांच्या दरम्यान दिसतात. कालांतराने ठिपके वाढत जाऊन पान वाळते.
  • पूर्ण वाढलेल्या ठिपक्यांचा रंग तपकिरी काळपट असतो. या ठिपक्यांभोवती पिवळसर रंगाची वलये दिसून येतात.
  • या रोगाचे ठिपके सर्वसाधारणपणे पानांच्या कडांवर आणि शेंड्यावर जास्त आढळून येतात.
  • रोगास अनुकूल हवामान दीर्घकाळ राहिल्यास ठिपके एकमेकांत मिसळून पाने टोकाकडून करपतात. पाने फाटतात, देठापासून मोडून लोंबकळतात.
  • रोगाची तीव्रता जास्त प्रमाणात असल्यास, संपूर्ण पान सुकते. एकूण कार्यक्षम पानांची संख्या कमी झाल्याने झाडाच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत बाधा येते.
  • फळांचे पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी फळे आकाराने लहान राहतात. फळांत गर भरत नाही. वजन आणि दर्जा खालावतो.
  • रोगाची तीव्रता वाढल्यास, घडांवर परिणाम होऊन घडातील फळे अकाली पिकू लागतात.
  • रोग प्रसार 

  • रोगग्रस्त कंद, हवेद्वारे रोगाचा प्रसार होतो.
  • बुरशीचे लैंगिक व अलैंगिक बिजाणू पानांच्या खालच्या बाजूने पर्णरंध्राच्या पेशीतून आत शिरतात. दोन्ही प्रकारच्या बिजाणूंमुळे झालेल्या प्रादुर्भावामध्ये सारखी लक्षणे दिसून येतात.
  • पावसाचे थेंब किंवा दवबिंदूद्वारे प्रसार होतो.
  • पावसाचे पाणी मुख्य झाडाखाली वाढणाऱ्या पिलांवर बुरशीचे बिजाणू पडून रोगाची लागण होते. हे बिजाणू पावसाचे पाणी, जोराचा वारा यामुळे लांब अंतरावर वाहून नेले जातात. त्यामुळे रोगाचा प्रसार जलद होतो.
  • रोगाच्या प्रसारास इतर अनुकूल बाबी 

  • शिफारशीपेक्षा कमी अंतरावर दाट लागवड, पाण्याचा निचरा चांगला न होणाऱ्या जमिनीत केळी लागवड करणे, तणांचा प्रादुर्भाव, सिंचनाद्वारे पाण्याचा अनियंत्रित वापर या बाबी कारणीभूत ठरतात.
  • मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमित काढली न जाणे, सतत एकाच पिकाची लागवड करणे, खोडवा पीक घेण्याकडे वाढता कल, प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
  • नियंत्रण उपाय  मशागतीचे उपाय 

  • बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा योग्य निचरा करावा.
  • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना झाडाच्‍या वाढीची अवस्था, हवामान आणि जमिनीच्या मगदूरानुसार पाण्याची मात्रा ठरवावी.
  • केळी बाग आणि परिसरात स्वच्छ आणि तणमुक्त ठेवावी.
  • मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत.
  • अन्नद्रव्यांची शिफारशीत मात्रा ( नत्र २०० ग्रॅम, स्फुरद ६० ग्रॅम आणि पालाश २०० ग्रॅम प्रति झाड) वेळापत्रकानुसार द्यावी.
  • रोगग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पान जाळून नष्ट करावेत.
  • केळी पिकाची सतत लागवड करणे टाळावे. पिकाची फेरपालट करावी.
  • खोडवा घेण्याचे टाळावे.
  • रासायनिक नियंत्रण ः (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  • प्राथमिक लक्षणे दिसताच, कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्टिकर किंवा
  • प्रादुर्भाव वाढल्यास, प्रॉपीकोनॅझोल १ मि. लि. अधिक स्टिकर
  • गरजेनुसार पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून करावी.
  • कंद कुजव्या रोग  लक्षणे 

  • पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सुरुवातीचे १-३ महिन्याचे पीक रोगास मोठ्या प्रमाणावर बळी पडते.
  • कंद, कोवळ्या मुनव्यांवर रोगाची लक्षणे दिसून येतात.
  • कंदाचा वरील भाग कुजतो, त्यामुळे झाडाचे पोषण व्यवस्थित होत नाही.
  • पाने अचानक वाळून जमिनीकडे लोंबतात.
  • प्रादुर्भावग्रस्त कंदांना कमी मुळे फुटतात. मुळांचा टोकाकडील भाग काळा पडतो. त्यानंतर संपूर्ण मुळे काळी होऊन कुजतात. परिणामी झाडाचा आधार नाहीसा झाल्याने हलक्याशा धक्क्यानेही झाडे कोसळतात.
  • अशी झाडे उपटून पाहिल्यास फक्त झाडच उपटून येते. कंद जमिनीतच राहतात.
  • प्रादुर्भावग्रस्त कंद कापून पाहिल्यानंतर तो तपकिरी रंगाचा झालेला दिसतो. त्यात पोकळ्या निर्माण होतात.
  • ग्रॅड नैन जातीत खोडांना तडा गेलेला आढळतो. खोडाचा आतील भाग कुजतो.
  • रोगाच्या अतितीव्र अवस्थेत झाडाचा पोंगा जळून जातो. अशा झाडांना अतिशय घाणेरडा वास येतो.
  • रोगाचा उशिरा प्रादुर्भाव झाल्यास, झाडाची योग्य निसवण होत नाही. घड लहान आकाराचे निपजतात. केळ फळांचा आकार लहान होतो.
  • रोगप्रसार 

  • प्राथमिक संसर्ग रोगट कंदापासून होतो.
  • रोगट झाडाचे अवशेष, झाडांना झालेल्या इजा व जखमा, संसर्गीत हत्यारे, रोगग्रस्त बागेतील चिखल व त्यातून झिरपणारे पाणी यांच्यामार्फत रोगाचा प्रसार होतो.
  • उष्ण कोंदट वातावरण, चिबड, पाण्याचा निचरा न होणारी जमीन हे घटक रोगाच्या वाढीस पोषक ठरतात.
  • अर्धवट कुजलेल्या शेणखताच्या वापरामुळे रोग आणखी बळावतो.
  • नियंत्रण 

  • लागवडीसाठी निरोगी कंद वापरावे.
  • लागवडीपूर्वी कंदावर प्रक्रिया करावी. कॉपर ऑक्सिक्लोराईड ४ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात कंद ३० मिनिटे बुडवावेत.
  • चांगले कुजलेले शेणखत प्रतिझाड १० किलो वापरावे.
  • लागवडीच्या वेळी जमिनीतून ब्लिचींग भुकटी ६ ग्रॅम प्रति झाड द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने चार वेळा हीच प्रक्रिया करावी.
  • रोगट झाडे कंदासह उपटून नष्ट करावीत.
  • बागेत रोगग्रस्त झाडाचे कोणतेही अवशेष ठेवू नयेत. बाग स्वच्छ करावी.
  • रोगग्रस्त बागेत पुन्हा केळी पिकाची लागवड करू नये. पिकाची फेरपालट करावी.
  • संपर्क ः डॉ. कृष्णा पवार, ०२५७-२२५०९८६ सतीश माने, ९२८४३७५५४५ (अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

    Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

    SCROLL FOR NEXT