Dr. S. D. Sawant
Dr. S. D. Sawant 
ॲग्रो गाईड

कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशा

अमित गद्रे

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ १८ मे (मंगळवार) रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पर्दापण करीत आहे. यानिमित्ताने वर्षभर विद्यापीठातर्फे शेतकरी, कृषी उद्योजक तसेच विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, परिसंवाद आणि पीकनिहाय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. या अनुषंगाने विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांच्याशी साधलेला संवाद... 

  • शेती विकासामध्ये विद्यापीठाचे योगदान कसे फायदेशीर ठरले आहे?
  • भात हे कोकणपट्टीतील महत्त्वाचे पीक. भाताची संपूर्ण देशाची प्रति हेक्टरी उत्पादकता ३२ क्विंटल, राज्याची २४ क्विंटल आणि कोकणाची ४२.५ क्विंटल आहे. पूर्वी कोकणात भाताच्या रत्ना, जया या जाती लागवडीखाली होत्या. पीक उत्पादनवाढीसाठी विद्यापीठाने कर्जत-५, कर्जत-७ या जाती विकसित केल्या. टीएन-१ आणि आयआर-८  या जातीमधून बुटका जनुक मिळाला. यातून बारीक दाण्याच्या जाती, तसेच उशिरा पावसाने न पडणाऱ्या कर्जत-४, कर्जत-६, रत्नागिरी-२४ या जाती विकसित झाल्या. याचबरोबरीने विद्यापीठाने भाताच्या संकरित जातीदेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत.पोहे, पापडासाठी कर्जत-३, भडंगाच्या चुरमुऱ्यासाठी रत्नागिरी-१, नाशिक चिवड्यासाठी कर्जत-७, सह्याद्री -१, सह्याद्री-३, रत्नागिरी-४ या जातींना मागणी आहे. लाल तांदळासाठी रत्नागिरी-७ ला शेतकऱ्यांची पसंती आहे. यामध्ये लोह आणि जस्ताचे चांगले प्रमाण आहे. पनवेल-१, पनवेल-२, पनवेल ३ या जाती ६.५० ते ७ विद्युत वाहकता क्षार असलेल्या जमिनीमध्ये चांगले उत्पादन देतात. काळ्या भाताबाबत संशोधन सुरू आहे. भात पिकासाठी प्लॅस्टिक आच्छादन वापरून त्यापाठोपाठ मका आणि त्यानंतर भुईमूग किंवा मूग लागवडीचा पॅटर्न तयार केला आहे. विद्यापीठाने नाचणीच्या तीन जाती विकसित केल्या आहे. नाचणी सत्त्व, वडी, बिस्कीट, कुरकुरे निर्मितीचे तंत्र बचत गटांपर्यंत पोहोचविले आहे. नाचणी मळणीसाठी यंत्र विकसित केले आहे. याचबरोबरीने फळपिके, भाजीपाला, मसाला पिके, कडधान्ये, चारा पिकांच्या जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. 

  • फळपिकांच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरणार आहे?
  • हापूस जातीप्रमाणेच विद्यापीठाने आंब्याच्या रत्ना, सिंधू, कोकण राजा या नावीन्यपूर्ण जाती प्रसारित केल्या आहेत. याचबरोबरीने काजू, फणस,नारळ,कोकम, करवंद,सुपारी आदी पिकांच्या जाती शेतकऱ्यांच्या शेतात रूजल्या आहेत. इस्राईलमधील शास्त्रज्ञांच्या मदतीने जुन्या आंबा झाडांचे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्रज्ञान विकसित करून त्यांची शेतकऱ्यांच्या बागेत प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. आंबा झाडाचे छाटणी तंत्र, प्रत्येक वर्षी फळधारणेसाठी पॅक्लोब्युट्रोझॉलचा वापर, फळांमध्ये साका होऊ नये आणि फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बॅगिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. पॅक्लोब्युट्रोझॉलचा अतिप्रमाणात वापर झाडाला फार वर्षं मानवत नाही. त्यामुळे पॅक्लोब्युट्रोझॉलचा वापर न करता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाडाच्या विस्ताराखालील माती उकरणे, चैत्र पालवी सुदृढ करण्यासाठी अन्नद्रव्यांची फवारणी तसेच ऑक्टोबर पालवीची खुडणी यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून लवकर व प्रतिवर्षी फुलधारणा घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. काजू बोंड, करवंद, जांभूळ, कच्ची कैरी यापासून वाईननिर्मिती तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

  • कंदपिकांमध्ये कोणती संधी आहे ?
  • विद्यापीठाने कणगर, सुरण, साखर कंद, रताळी उत्पादन वाढ तसेच प्रो-ट्रे मध्ये अभिवृद्धी आणि प्रक्रिया तंत्रज्ञान विशेष संशोधन झाले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमातून कंदपिकांची रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

  • दुर्लक्षित पिकांना चालना देण्यासाठी कोणता प्रकल्प कार्यरत आहे?
  • निरोखे (जि.सिंधुदुर्ग) गावामध्ये जांभूळ आणि आंबोली (जि.सिंधुदुर्ग) गावातून सुरंगीच्या कळ्यांचा दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा व्यापार होतो. या विभागातून जांभूळ आणि सुरंगीच्या चांगल्या प्रतीच्या झाडाची निवड करून कलमे तयार केली. ही कलमे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये लावण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी लूपीन फाउंडेशन, कृषी विभागाची मदत झाली आहे. याचबरोबरीने त्रिफळ, वावडींग लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.  

  • मत्स्यशेतीमधील कोणते नवीन तंत्र मच्छिमारांपर्यंत पोहोचविले आहे?
  • समुद्रामध्ये मत्स्य संवर्धनाकरिता उपयुक्त जागांची निवड, संभाव्य मासेमारी क्षेत्रासंबधी आगाऊ अंदाजासाठी रिमोट सेंसिंग तंत्रज्ञान विकसित केले. कमी बाजारमूल्य असणाऱ्या मासळीपासून वडा, कटलेट, लोणचेनिर्मिती तंत्रज्ञान मच्छीमार गटांना दिले आहे. मासळीच्या टाकाऊ भागापासून उच्च प्रथिनयुक्त उपपदार्थ जसे कायटीन, कायटोसेन, सिलेज, फिश प्रोटीन कॉन्सट्रेटनिर्मिती सुरू आहे. यातून लघू उद्योगाला चालना मिळेल. मत्स्य अभियांत्रिकी विभागाने ‘कोकण स्क्वीड जिगर’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. निमखाऱ्या पाण्यात जिताडा संवर्धन, खेकडा संवर्धन आणि गोड्या पाण्यातील स्वोर्ड-टेल, निऑन टेट्रा, ऑस्कर संवर्धन तंत्रज्ञान फायदेशीर आहे. कार्प संवर्धन आणि शोभिवंत मत्स्यपालनाबाबतही प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणते करार झाले आहेत?  विद्यापीठाचा अमेरिकेतील मिशिगन स्टेट विद्यापीठाशी करार झाल्याने विद्यार्थांसाठी उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. याचबरोबरीने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (पुणे), राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था (बारामती), केंद्रीय किनारपट्टी शेती संशोधन संस्था (गोवा) आणि फुलशेती संशोधन संचालनालय (पुणे) यांच्या बरोबरीने सामंजस्य करारामुळे तेथील अत्याधुनिक प्रयोगशाळेचा लाभ संशोधक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. 

  • विद्यापीठाचे एकात्मिक शेती मॉडेलचे स्वरूप कसे आहे?
  • उत्तर कोकणात भात शेती आधारित पीक पद्धती आणि दक्षिण कोकणात फळपीक आधारित पीक पद्धती आहे. उत्तर कोकणाचा विचार करता एक हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप हंगामात भात, नाचणी, भुईमूग, काकडी आणि वैरण पिके, रब्बी हंगामात वांगी, कलिंगड, चवळी, वाल, मधुमका या पिकांचा समावेश आहे. यासोबत आंबा, आवळा, चिकू, नारळ, मसाला पिके आणि रोपवाटिकेला संधी आहे. पूरक उद्योगाच्या दृष्टीने पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खतनिर्मितीची जोड दिली आहे. किनारपट्टी भागासाठी मत्स्यशेती आधारित मॉडेल विकसित केले आहे. दक्षिण कोकणासाठी फलोद्यान आधारित नारळ पिकांमध्ये जायफळ, काळी मिरी, दालचिनी, अननस इत्यादी पिकांचा आंतर पीक म्हणून समावेश आहे. 

  • विद्यापीठामध्ये कोणते नवीन संशोधन प्रकल्प सुरू आहेत?
  • विद्यापीठाच्या प्रगत जलद पैदास केंद्रातून बदलत्या हवामानात तग धरून अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या भात जाती विकसित होणार आहेत. सध्या भाताची एक जात विकसित करण्यासाठी ७ ते ८ वर्षांचा कालावधी लागतो. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे २ ते ३ वर्षांत जात विकसित होईल. अॅव्हाकॅडो पिकाबाबतही विशेष संशोधन प्रकल्प सुरू होत आहे. फळप्रक्रियेसाठी असेप्टिक प्रक्रिया पद्धती तसेच बांबू प्रक्रिया, फुलशेती आणि खेकडेपालनाबाबत संशोधन प्रगतिपथावर आहे.  

  • ग्रामविकासासाठी कोणत्या उपक्रमांना चालना दिली आहे?
  • विद्यापीठाने तंत्रज्ञान प्रसारासाठी आतापर्यंत ७५ खेडी दत्तक घेतली आहेत. कुडावळे (ता. दापोली) गावामध्ये शतप्रतीशत भात लागवड अभियानांतर्गत भाताच्या विविध जातींचे बियाणे  वाटप,कृषी यांत्रिकीकरण, चारसूत्री पद्धती,  ब्रिकेट्‍सचा वापर, भात लागवड महोत्सव असे उपक्रम राबविण्यात आले. कोंगळे (ता. दापोली), वेरळ (ता. मंडणगड) गावामध्ये कर्जत-२ जातीचे १० हेक्टरवर बीजोत्पादन प्रात्यक्षिक झाले. विद्यापीठामार्फत ६४ गावांमध्ये भात बीजोत्पादन घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण उपक्रम राबविण्यात आल्याने बेरोजगारांना रोजगार आणि पडीक भात खाचरे लागवडीखाली येत आहेत. वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग) येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामध्ये कृषी पर्यटनासाठी विविध मॉडेल विकसित करण्यात आली आहेत. 

  • पूरक उद्योगासाठी काय संधी आहे?
  • औषधी व सुंगधी वनस्पतींपासून तेल, अॅन्थोसायनीन, अल्कलॉइड्स आणि विशिष्ट लिपीड निर्मितीबाबत संशोधन सुरू आहे. याचा वापर अत्तर, सुगंधी द्रव्ये, सेंद्रिय कृषी रसायने उद्योगामध्ये होतो. कोळंबी, खेकड्यापासून कायटोसाईनची निर्मिती करून त्यांचा वापर शेती उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन सुरू आहे. कोकण कन्याळ शेळीपालन, कोकणातील स्थानिक तसेच ब्रॉयलर कोंबड्यांचा एकात्मिक कोंबडीपालन प्रकल्प विद्यापीठाने सुरू केला आहे. हे प्रकल्प पूरक उद्योगासाठी फायदेशीर ठरले आहेत. 

    माहिती तंत्रज्ञानाचा वापर 

  • www.dbskkv.org संकेतस्थळावर तंत्रज्ञान, शिफारशी, कृषी अभ्यासक्रम, हंगामनिहाय सल्ला.
  • व्हॉट्‍सॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान कृषी सल्ला.
  • आंबा, काजू, भात, मत्स्य विज्ञान, पीक संरक्षण, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी विषयक अॅप.
  • ऑनलाइन पोर्टलद्वारे कलमे, रोपांची मागणी नोंदणी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT