भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड जमिनीची सुधारणा
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड जमिनीची सुधारणा 
ॲग्रो गाईड

भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड जमिनीची सुधारणा

Abhijeet Dake

सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण इस्लामपूर (जि. सांगली) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील यांनी भूमिगत निचरा प्रणाली तंत्राचा अवलंब करून आपल्या क्षारपड जमिनीची सुधारणा केली. या जमिनीत उसाचे जिथे १५ ते २० टनच उत्पादन मिळायचे, तिथे सुरू उसाचे ३४ गुंठ्यांत ९४. ९४२ टन म्हणजे हेक्टरी २७९.२४ टन उत्पादन मिळविले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा २०१६-१७ चा विभागवार पहिला क्रमांक मिळवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे .

 सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी व खतांचा अतिवापर झाल्याने क्षारपड जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. ही जमीन पिकाऊ व सुपीक बनवण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नशील आहेत. वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर येथील अभिजित बाळासाहेब पाटील हा त्यापैकीच युवा शेतकरी.

जमीन सुधारण्यासाठीचे प्रयत्न अभिजित यांचे एम.कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ते सध्या क्‍लार्क आहेत. त्यांचे वडील शेतीच करायचे. एकूण शेती सात एकर. त्यातील पाच एकर क्षारपड होती. त्यामुळे ती असून नसल्यासारखी होती. दोनच एकरांत काय ते उत्पन्न मिळायचे. त्यामुळे आर्थिक ताणही जाणवायचा. प्रगतिशील विचारांचे अभिजित यांनी हीच पाच एकर क्षारपड जमीन सुधारण्याचे ठरवले.

विचारांना कृतीची दिशा मिळाली सांगली शहरापासून जवळच असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने भूमिगत निचरा प्रणाली तंत्राचा विकास केला आहे. ही माहिती इस्लामपूर नजीकच्या कै. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून अभिजित यांना मिळाली. त्यांनी संशोधन केंद्रात धाव घेतली. तेथे निचरा प्रणालीचे कार्य, खर्च आदी सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था शेतकऱ्यांना याच प्रणालीविषयी शेतकऱ्यांत जागृती करीत होती. अभिजित यांना नेमक्या याच काळात या तंत्राची व त्याबाबत मदत करणाऱ्या तज्ज्ञांची गरज होती. विचारांना कृतीची दिशा मिळाली. त्यानुसार संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर अभिजित यांच्या शेतात तंत्राचा वापर करण्याचे नक्की केले. मुख्य म्हणजे त्याचा खर्चही संस्थाच करणार होती.

 या होत्या अडचणी

  • जमीन क्षारपड असल्याने उगवण क्षमता कमी होती.
  • पाणी साचून राहत असल्याने निचरा होत नसे
  • शेती पडून होती
  • ऊस उत्पादकता एकरी केवळ १५ ते२० टन होती.
  • त्यासाठी असा केला भूमिगत निचरा प्रणाली तंत्राचा वापर

  • पाच एकर क्षारपड क्षेत्र निश्चित केले.  संपूर्ण क्षेत्राचा आवाका लक्षात घेऊन जमिनीत तीन फूट खोल पाइप बसविली.
  • यात सुमारे चार पाइप्स वापरल्या. प्रत्येकी दोन पाइपमध्ये ६० फूट अंतर ठेवले.
  • पाइपची लांबी सुमारे सहाशे ते सातशे फूट होती.   
  • समांतर निचरा प्रणाली पद्धत वापरली.
  •    या झाल्या सुधारणा

  •  जमिनीची सुपीकता वाढू लागली
  •  वाफसा लवकर येऊ लागला
  •  पांढऱ्या मुळींची वाढ झाली.  
  •  एकरी उत्पादन वाढू लागले. त्याची आकडेवारी (एकरी)                       
  • पीक  पूर्वी        सद्यःस्थितीत
    हरभरा  २ ते ३.३ क्विंटल     ९ क्विंटल
    सोयाबीन  ६ क्विंटल         १५ क्विंटल
    ऊस     १५ ते २० टन       ५० ते ६० टन

      या गोष्टींची घेतली जाते काळजी

  •  मशागत ३५ एचपी ट्रॅक्‍टरच्या वापराने. त्यामुळे शेताचा तुडवा होत नाही
  •  तणनाशकांचा वापर टाळला जातो
  •  कुट्टीद्वारे पाला मातीआड केला जातो
  •  गरजेएवढाच पाण्याचा व हिरवळीच्या खतांचा वापर
  •    मातीचा तलाव निचरा प्रणाली तंत्राचा वापर केल्यानंतर शेतात निचरा होणारे पाणी ओढ्यात सोडण्याऐवजी केंद्रीय मत्स्य शिक्षण या संस्थेच्या सल्ल्यानुसार तलाव बांधून त्यात घेण्याचे ठरले. त्यात मागील वर्षापासून मत्स्यपालन सुरू केले. हे पाणी शेताला वर्षातून चार ते पाच वेळा वापरले जाते. मात्र त्याआधी पाण्याची तपासणी केली जाते.                                                      

     माती पृथक्करण अहवाल    अ  ब
     आम्ल-विम्ल निर्देशांक (पीएच)  ८,२५  ८.२३
     एकूण विद्राव्य क्षार (ईसी)  ३.८५  ०.७७
     सेंद्रिय कर्ब (टक्के)  ०.९०  ०.८९
     स्फूरद  (किलो प्रति एकर  १.३५    ३.८४  
     पालाश (किलो प्रति एकर)   १४५.१०  ३०४. ६४
     मुक्त चुना (टक्के)            १.२५    १२. ०   १.२५  
     लोह (पीपीएम)  ५. ७०    १.९२  
     जस्त (पीपीएम)   ०.५१    १.९५
     मंगल (पीपीएम)  २.०६   ६.५६  
     तांबे (पीपीएम)   ७.८९   ५.२८  

    अ.  तंत्र वापरापूर्वीची अाकडेवारी (सन २००९) ब.  भूमिगत निचरा प्रणाली वापरानंतरची अाकडेवारी (सन २०१५)

    संपर्क- अभिजीत पाटील- ८२७५५९२२९३

    .

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT