Washim News : जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळते. ही संधी आनंदाने स्वीकारून काम करताना समाधान घ्या, असे आवाहन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून वाशीम जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यानंतर जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात पालकमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागात सेवा करण्याची सर्वोच्च संधी आहे. वैयक्तिक तणाव, दुःख विसरून कर्मचाऱ्यांनी आनंदाने काम करावे.
चांगले काम करणाऱ्यांवर टीका होणे स्वाभाविक आहे. हे लक्षात ठेवून अधिक प्रेरणादायी कार्य करा, असे त्यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतींवर चित्ररूपात साकारलेल्या ‘बोलक्या भिंती’ प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आरोग्य विषयक जनजागृती फलकांचेही अनावरण झाले.
जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांनंतर आता प्रशासकीय इमारतीही जनतेशी संवाद साधणाऱ्या स्वरूपात साकारल्या जात असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, हे उदाहरण म्हणजे वाघमारे आहेत, असे गौरवोद्गार काढले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी मुले ही ग्रामीण भारताचे भविष्य आहेत. या मुलांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे आणि त्यांनी ती नेटाने पार पाडावी, अशी अपेक्षा भरणे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढल्याने पटसंख्येत वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मी जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष आणि आता मंत्री झालो असलो तरी खेड्यातल्या लोकांची सेवा करण्याची खरी संधी मला जिल्हा परिषदेने दिली. त्यामुळे माझ्या राजकीय प्रवासाचे खरे श्रेय जिल्हा परिषदेचे आहे, असेही ते म्हणाले. ग्रामपंचायत अधिकारी अरविंद पडघन, संजय नवघरे आणि सत्वशिला जाधव या गुणवंत कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार किरण सरनाईक, आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन डाबेराव व नेहा काळे यांनी केले. विठ्ठल भुसारी यांनी प्रास्ताविक केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.