Zero Tillage  Agrowon
ॲग्रो विशेष

Zero Tillage Farming : शून्य मशागत शेती एक उत्तम मार्ग

Agriculture Operations : अतिमशागतीमुळे जमिनीमध्ये दीड-दोन फुटांखाली कडकपणा येऊन जमिनीची नैसर्गिक रचना बिघडत चालली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार व अवलंब करणे आवश्यक आहे. हवामान बदल कमी करणे, अन्नसुरक्षेची हमी, जैवविविधता आणि मातीचे आरोग्य या गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत. याचा एकत्रित परिणाम साधायचा असेल तर पुनरुत्पादक शेती (शून्य मशागत शेती) हा एक उत्तम मार्ग आहे, असे मत विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी व्यक्त केले.

डॉ. मोटे, खेती बड्डी ॲग्रिटेक प्रा. लि. पुणेचे कृषी अधिकारी शैलेश भोसले, तंत्रज्ञान समन्वयक सुरेशसिंग बेडवाल यांनी संयुक्तरित्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर नुकतीच भेट दिली. त्या वेळी मोटे बोलत होते. ते म्हणाले, की जमिनीच्या सुपीकतेचा देखील ऱ्हास होत आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी हवामानाशी अनुकूल संवर्धित शेती पद्धती अवलंबल्यास जमिनीच्या संवर्धनाबरोबरच उत्पादन खर्चामध्ये लक्षणीय घट होत असल्याचे दिसून आले आहे. अतिमशागतीमुळे जमिनीमध्ये दीड-दोन फुटांखाली कडकपणा येऊन जमिनीची नैसर्गिक रचना बिघडत चालली आहे.

वारंवार जमिनीची मशागत केल्याने मातीची सारखी हलवाहलव होऊन खालच्या थरातील माती वर येते व या मातीवर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे प्रतिकूल परिणाम होतो. सर्वप्रथम तापलेल्या मातीतील सेंद्रिय कर्ब हवेत उडून जाण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सेंद्रिय पदार्थ कमी झाल्याने मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडूळासारखे उपयुक्त प्राण्यांचे प्रमाण घटत जाते, हेदेखील त्यांनी शेतकऱ्याच्या निदर्शनास आणून दिले.

शून्य मशागत पद्धतीचा अवलंब केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव माहिती करून घेतले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत, तंत्रज्ञान समन्वयक श्री. बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांकडून विना मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.

खेती बड्डीच्या श्री. भोसले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या जमीन आणि पिकात होणाऱ्या बदलाच्या नोंदी खेती बड्डी ॲपमध्ये केल्या. शून्य मशागत शेती तंत्रज्ञान करताना खेती बड्डीच्या मोबाइल ॲपचा कसा फायदा होतो आणि उत्पादन खर्चात बचत कशी करता येते याबाबत आवश्यकतेनुसार योग्य मार्गदर्शन केले.

या दौऱ्यादरम्यान डॉ. मोटे यांनी विना मशागत शेती तंत्रज्ञान (संवर्धित शेती) पद्धत याविषयी आलेले शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. रावसाहेब मोहिते आणि प्रभाकर सुसलादे या शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन त्यांच्याशी सखोल चर्चा केली. शेतकऱ्यांच्या शेताची, जमिनीची पाहणी केली.

निदर्शनास आलेले फायदे

सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये साठवण होण्यास मदत होते

सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहतो

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

रासायनिक खतांची बचत होते

गांडुळांची संख्या वाढते

मातीचे तापमान नियंत्रित राहते.

जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते.

पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT