Millet Cultivation Techniques Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Cultivation Techniques : भरडधान्यांसाठी शून्य मशागत तंत्र फायदेशीर

Team Agrowon

अनिल निवळकर

Millet Update : दैनंदिन आहारात भरडधान्यांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा आणि त्यातून आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला उच्च प्रतीची पोषणमूल्ये मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भरडधान्यांचा ‘श्री अन्न’ असा विशेष उल्लेख करण्यात आला. भरडधान्यांचे महत्त्व लक्षात घेता भारताने ‘मिलेट मिशन’ हे नवे धोरण हाती घेतले आहे.

भरडधान्य म्हटले, की नाचणी हे प्रमुख पीक डोळ्यासमोर येते. पारंपरिक भरडधान्य लागवड पद्धतीमधील अडचणी लक्षात घेता नाचणी, वरी, कांग इत्यादी पिकांच्या लागवडी शेतकऱ्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे या जमिनी पडीक होत आहेत.

एका बाजूने भरडधान्य पिकांचे प्रमाण कमी होत चालले असताना यावर्षीच्या ‘मिलेट मिशन’मुळे शहरात होत असलेल्या जाहिराती, चर्चासत्रामुळे या धान्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल असे चित्र आहे. शेतकऱ्यांनी भरडधान्ये पिके मोठ्या प्रमाणात लावावीत यासाठी कृषी खात्यामार्फत विविध योजनांतर्गत प्रयत्न केले जात आहेत.

संशोधन पातळीवर सुद्धा भरडधान्यांच्या चांगल्या जातींची निर्मिती करणे, विविध पाककृती, प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीवर जास्तीत जास्त चर्चा होताना दिसते. परंतु यामध्ये भरडधान्ये पिकांचा उत्पादन खर्च कमी करून, जमिनीची धूप थांबवून कशी पिकवायची यावर कोणीही विचार करत नाही.

जमिनीची धूप थांबवा

१) डोंगर उतारावर बैल नांगर किंवा कुदळीच्या साह्याने जमिनी नांगरून/खणून भरडधान्य पिकाची रोपे लागवड करण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामुळे दरवर्षी त्या डोंगर उतारावर मातीची मोठ्या प्रमाणात धूप होते. मातीची धूप होत असताना सेंद्रिय कर्ब, सूक्ष्मजीव, उपयुक्त बुरशी, गांडुळे व जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो.

एकंदरीत सुपीकता नष्ट होते. परिणामी, त्या डोंगरातील मातीची झालेली झीज भरून काढण्यासाठी तो डोंगर/माळरान पुढील वर्षी पडीक ठेवावा लागतो. दुसऱ्या डोंगर उतारावर, माळरानावर पुढील वर्षीच्या पिकाची लागवड करावी लागते, या पद्धतीला शिफ्टिंग कल्टिव्हेशन असे म्हणतात.

महाराष्ट्रात सर्वदूर याच पद्धतीने पारंपरिक भरडधान्यांची शेती प्रचलित आहे. डोंगर उतारावरील माती पुढे नदी-नाल्यातून धरणात गाळ स्वरूपात जाऊन बसते. धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी होते. तेथील गाळ काढण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.

२) गेल्या वर्षी पावसाळ्यात सुरगाणा तालुक्यात सगुणा संवर्धित शेती संदर्भात अभ्यास दौरा केला असता असे दिसून आले, की सप्टेंबर महिन्यात सुद्धा नार नदीचे पाणी गर्द लाल भडक दिसत होते. जून, जुलैमध्ये नद्यांचे पाणी साहजिकपणे नांगरट, चिखलणीमुळे गढूळ लाल झालेले असते.

परंतु सप्टेंबर महिन्यात असण्याचे कारण काय? याचा शोध घेत असता असे लक्षात आले, की सुरगाणा भागात डोंगर उतारावर नाचणी, वरी, उडीद या पिकांची आजही मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी करतात. त्यासाठी डोंगर उतारावर नांगर किंवा कुदळीने मशागत करावी लागते. उतारावरील जमीन नांगरल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते.

पावसाळा संपेपर्यंत धूप होत राहते. त्यामुळेच नार नदीचे पाणी हे सप्टेंबर महिन्यात सुद्धा लाल भडक दिसत होते. ज्या डोंगरी भागात भरडधान्यांची लागवड केली जाते तेथे मातीची धूप दरवर्षी सातत्यपूर्वक होत आहे. ही धूप कशी थांबवायची यावर गांभीर्याने चिंतन करणे गरजेचे आहे.

शून्य मशागत पद्धतीचा वापर

१) खरिपात अतिपावसाच्या प्रदेशात भातशेतीसाठी चिखलणी करताना आपल्या शेतातून किती माती वाहून जाते याचे सुद्धा गणित किंवा मोजमाप आपल्याकडे नाही. यासाठी २०२२ च्या पावसाळ्यात सगुणा रूरल फाउंडेशन टीम कडून मातीची धूप मोजण्याचा प्रयोग करण्यात आला. प्रयोगाचे निष्कर्ष असे होते, की ज्या शेतात ट्रॅक्टरचलित लोखंडी नांगर वापरले होते, त्या ठिकाणी १५ टक्के मातीची धूप होते.

ज्या शेतकऱ्यांनी पॉवर टिलर वापरला तेथे १४ टक्के मातीची धूप होते. ज्या शेतात बैलचलित लाकडी नांगर वापरला त्या ठिकाणी ३ टक्के मातीची धूप होते. ज्या शेतकऱ्यांनी एसआरटी शेती पद्धतीने भात लागवड केली होती त्या शेतात मातीची धूप अगदी नगण्य म्हणजे मोजता न येण्याजोगी होती.

२) डोंगर उतारावर पारंपरिक पद्धतीने भरडधान्य लागवडीचा प्रचार करताना मातीची धूप होऊ नये याकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मातीची धूप न होऊ देता शून्य मशागत पद्धतीने भरडधान्य लागवडीवर भर द्यावा.

३) एसआरटी शून्य मशागत संवर्धित शेतीची अशी पद्धत आहे, की ज्यामध्ये कोणतेही पीक लागवडीसाठी जमिनीची मशागत म्हणजे नांगरणी, चिखलणी, कोळपणी, खुरपणी, इत्यादी करण्याची आवश्यकता नाही. शून्य मशागत पद्धतीने डोंगर उतारावर नांगरणी न करता कायमस्वरूपी गादीवाफे करून त्यावर टोकण यंत्राच्या साहाय्याने नाचणी, वरी, कांग इत्यादी पिकांची रोप लागवड करता येते.

उगवण पश्चात निवडक तणनाशकांचा प्रमाणबद्ध वापर करून तण व्यवस्थापन करता येते. काढणी झाल्यावर या पिकांची मुळे जागेलाच कुजत ठेवल्याने मातीची धूप न होता सुपीकता वाढत जाते. जिवाणू, गांडुळे, उपयुक्त बुरशी या सूक्ष्मजीवसृष्टीची वाढ होऊन डोंगरावरील मातीच्या कणरचनेत चांगला बदल होऊन पाणी आडवे वाहून न जाता ते भूगर्भात झिरपायला लागते.

त्यामुळे डोंगरभागातील भूगर्भ पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होते. या पद्धतीमुळे पुढील वर्षी त्याच जागी पुनःपुन्हा पीक घेता येते. जागा बदलण्याची गरज भासत नाही. पारंपारिक नाचणीला आपण फुटवा झालेला पाहिला नाही, परंतु एसआरटी पद्धतीने लागवड केलेल्या नाचणीला भातासारखे फुटवे होऊन उत्पादनात दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून येते.

४) भरडधान्य क्षेत्रात डोंगर उताराला ठरावीक अंतरावर समपातळी काढून वाळा गवताचे दाट कंटूर बांध तयार केल्यास मातीच्या धुपेला आळा बसू शकतो. वाळा गवताची मुळे ७ ते ८ फूट जमिनीत खोलवर जातात. तेथील माती घट्ट धरून ठेवतात.

वणवा, कमी पाऊस, अति तीव्रतेचा पाऊस याचा कोणताही परिणाम या वनस्पतीवर होत नाही. ज्या भागात भूस्खलन, दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात मातीची झीज झालेली आहे, ही झीज भरून काढण्याची क्षमता वाळा गवतामध्ये आहे.

संपर्क : अनिल निवळकर, ७७९८७२०२७२, (लेखक वनशास्त्र पदवीधर असून एसआरटी शून्य मशागत संवर्धित शेती अभ्यासक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT