Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale: मी अॅग्रोवनमध्ये का लिहितो?

Maharudr Mangnale

मी अॅग्रोवनमध्ये नियमित लिहितो. लेख छापून आला की, वाचकांचे फोन सुरू होतात. अॅग्रोवनच्या वाचकांचे फोन म्हणजे, शेतकरी जगातील लोकांशी मनमोकळा संवाद असतो. ते काही आडपडदा न ठेवता भरभरून बोलतात. कृषी विभागात काम करून निवृत्त झालेले अधिकारी, कृषी पदवीधर, काही प्रयोगशील शेतकरी, शेतीविषयी आस्था असलेले लोक, प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी अशा विविध स्तरांतील वाचकांचे फोन असतात. यातील बहुतांश वाचक फेसबुकवर नसतात. कोणी असलेच तर ते माझ्या मित्र यादीतील नसतात. बोलण्यावरून सहज लक्षात येतं की, तो वरीलपैकी कोणत्या कॅटेगिरीतील आहेत ते.

अॅग्रोवनमध्ये ४ सप्टेंबर रोजी `अशी जिवावरची जोखीम किती व्यवसायांत आहे?` हा माझा लेख प्रकाशित झाला. या लेखाला तुडुंब प्रतिसाद मिळाला. या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करणारे बहुतांश वाचक हे सामान्य शेतकरी आहेत. त्यांचं नवखेपण बोलण्यातून कळतं. फोनची रिंग वाजते .उचलला की तो अग्रोवनचा लेख वाचला..राहवलं नाही. तुमचा नंबर दिसला ...लावला... असं समोरून बोललं जातं. मी म्हणतो,बोला की मग....समोरून संकोचल्यागत आवाज येतो...काय बोलायचं..आमचंच लिव्हलयं सगळं. मी नाव, गाव, वय विचारतो. तो सांगतो. आजवर कधी तुम्हाला फोन लावला नव्हता. पहिल्यांदा लावला.

बहुतेक फोन त्यांना लेख आवडला हे सांगणारे असतात. काही जण चिकित्सकपणे चर्चा करतात. एखाद-दुसरा अतिशहाणपणा दाखवायचा प्रयत्न करतो. त्याला मुद्याचं बोललं की, तो शांत बसतो. बऱ्याच जणांना मी पत्रकार आणि शेतकरी आहे, याचं आश्चर्य वाटत राहतं...हे दोन्ही कसं काय जमतं? असाही प्रश्न असतो. काही जण टाइमपास करायच्या हेतुने फोन करतात, त्यांना लगेच कटवतो. या लेखनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागातील शेतकऱ्यांशी एकाचवेळी मी जोडला जातो. त्यांचं काय चालू आहे, ते सध्याच्या परिस्थितीकडं कुठल्या दृष्टीने बघताहेत ते लक्षात येतं. एकूणच सगळे शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त आहेत, हेही जाणवतं. शेतीला भवितव्य नाही, चांगले दिवस येतील ,असं आशादायक चित्र नाही, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहतं.

`अशी जिवावरची जोखीम किती व्यवसायांत आहे?` या लेखावर फोन करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण लक्षणीय आहेत. नाशिकहून खणखणीत आवाजात एक फोन आला. एकदम वास्तव लिहिलंय असं म्हणत त्यांनी, कसं होईल हो देशाचं? असा प्रश्न केला. मी त्यांना नाव विचारलं तेव्हा ते म्हणाले, भाई कळंबकर, वय वर्षे ८४. मी म्हटलं, आपण चिंता करण्यापलिकडं परिस्थिती बिघडलीय...बघू काय होतं ते... बहुतेकदा आवाजावरूनही बोलणाऱ्या व्यक्तीची ज्येष्ठता लक्षात येते. पंढरपूर जवळच्या गावातून देशमुख मास्तर भरभरून बोलले. फोन ठेवताना म्हणाले, तुमचे अॅग्रोवनमधील सगळे लेख वाचत असतो. महारुद्रशिवाय एवढं वास्तव कोणी लिहित नाही...तुम्ही दररोजचं लिहा, बरं होईल आमच्यासाठी, असे ते म्हणाले. मी म्हटलं, कशाला खोटं खोटं कौतूक करताय? भावनिक होऊन देशमुख मास्तर बोलले, मी एक चांगला शिक्षक म्हणून निवृत्त झालोय...खोटं नाही बोलणार...

मी बऱ्याचजणांना विचारतो. तुम्हाला लेखातील नेमकं काय आवडलं. समोरून उत्तर येतं, आमच्या मनातलं लिहिता. आम्हाला जे सांगता येत नाही, ते तुम्ही सांगता. अनेकजण या भागात आलो तर, आमच्या शेतीला भेट द्या, जेवायला या असं निमंत्रण देतात. त्यांना हो म्हणण्याशिवाय पर्याय नसतो. काही वेळापूर्वी एक फोन आला. तुमचा लेख खूप आवडला. तुम्ही असंच लिहित राहा. श्रीगणेश तुमची भरभराट करो... मी म्हटलं की, तुमच्या शुभेच्छांनी जर गणेश माझं भलं करणार असेल तर, त्या शुभेच्छा सगळ्या शेतकऱ्यांना द्या...माझ्यापेक्षा इतरांना त्याची जास्त गरज आहे... गणेशाला जर शेतकऱ्यांची चिंता असती तर, शेतीची एवढी दूर्दशा झालीच नसती...असं बरच बोलून मी त्यांना नाव, गाव विचारलं. ते काही बोलेनात. त्यांनी फोन ठेऊन दिला.

गेल्या दोन दिवसातील फोनची संख्या आहे १४३. अबब म्हणण्यासारखी. फोन करणाऱ्यांचा माझ्याकडं काहीच स्वार्थ नसतो. त्यांना देण्यासारखं माझ्याकडं काहीच नाही. त्यांनाही हे माहित असतं. पण बोलावं ही मनातून इच्छा असते. काही वेळा माझ्याकडून फोन घेतला गेला नाही तर, ते पुन्हा फोन करतात. तुम्ही उचलला नाही म्हणून पुन्हा केला, असं सांगतात. मला फोन करण्यात वा घेण्यात फारसा रस नाही. मात्र अॅग्रोवनच्या वाचकांचे फोन मी आवर्जून घेतो. ती कुठल्या व्यावहारिक कामासाठी नाही तर, निर्व्याज आनंदासाठी मला बोलू इच्छितात. हे मला कळतं. त्याचा मी सन्मान करतो. खरं तर हे सगळे फोन मला व्हीआयपी बनवून टाकतात. बोलताना बहुतेकजण पत्रकार साहेब असा उल्लेख करतात. मधेच एखाद्या ज्येष्ठाला मी म्हणतो, काका..मी साहेब कसला? मी म्हशीराख्या,अडाणी शेतकरी. नावानं बोला..साहेब म्हणू नका..मला ते शिवी दिल्यासारखं वाटतं!

मी शेतीसंदर्भातच लिहित असल्याने अॅग्रोवन हे योग्य व्यासपीठ आहे. लेखनाला एवढा मोठा प्रतिसाद दुसरीकडं मिळत नाही. मी ठराविक दिवसांत लिहिलंच पाहिजे असं बंधन माझ्यावर नाही. लेखनाबद्दल कुठली बंधनं नाहीत. त्यांनी छापलंच पाहिजे, असा माझा आग्रह नाही. हे सगळं दोघांच्याही सोयीचं आहे. ते या लेखनाचं मानधन देतात, ते महत्त्वाचं आहेच. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मागणीप्रमाणे पुरवठा करणारं लेखन मला शक्य नाही. शिवाय मी काही पूर्णवेळ लेखक नाही. लेखन हे माझ्या अपनी पसंदकी जिंदगी जगण्यातील एक भाग आहे.

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT