Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Nilesh Heda : विदर्भातली आमराई कोणी संपवली?

Mango Season : आंबा नसल्याने कोकीळेचा आर्त स्वरही नव्हता. आजोबा जाणे, आमराई जाणे, नदीचा डोह जाणे, कोकीळेचा स्वर जाणे यात काही परस्परसंगती आहे काय हे शोधण्याचा प्रयत्न माझ्यातला अभ्यासक करत होता.

डॉ. निलेश हेडा

Rural Mango Story : माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सगळ्या सुट्ट्या आमराईत जायच्या. ते सुंदर दिवस होते. आमराया म्हणजे फक्त आंब्याची झाडं नव्हती. त्यात एक राजसी थाट होता. रसाळ्याची संस्कृती होती. आज मात्र ते सगळं वैभव संपून गेलं आहे. विदर्भातल्या आमराया जवळपास संपल्या आहेत. आपण एक अख्खी संस्कृती संपवत आहोत.

बऱ्याच वर्षानंतर गावाकडे जाणं झालं. आजोबा कधीचेच आमराई सोडून गेले होते. जिथे आधी आमराई होती तिथेच त्यांच्या अस्थी ठेऊन एक चबुतरा बनवला आहे. आता आमराई नव्हती. अरुणावतीचा डोह गाळाने भरला होता.

आंबा नसल्याने कोकीळेचा आर्त स्वरही नव्हता. आजोबा जाणे, आमराई जाणे, नदीचा डोह जाणे, कोकीळेचा स्वर जाणे यात काही परस्परसंगती आहे काय हे शोधण्याचा प्रयत्न माझ्यातला अभ्यासक करत होता.

एक झेन कथा आठवली. एका जंगलातून शेवटचा वाघ संपला आणि जंगलातून वाहणारी एक नदी कोरडी झाली... एवढीच ती कथा. आजच्या आपल्या परिस्थितीकी शास्त्राच्या परिप्रेक्ष्यात ही कथा खरी आहे. तीच आमराईलाही लागू पडते.

विषन्न मनाने आजोबाच्या समाधी जवळ बसलो. उण्यापुऱ्या २०-२५ वर्षांमध्ये तथाकथित विकासाचा बराच मोठा टप्पा गाठल्या गेला होता. आमराई संपली होती. विदर्भातला शेतकरी जेव्हा कर्जामध्ये आकंठ बुडाला तेव्हा किटकनाशकांच्या, रासायनिक खतांच्या अवाजवी खर्चाला भागवण्यासाठी सर्वप्रथम शेतातली, धुऱ्यावरची आंब्याची झाडे तोडून विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून घेतला.

मातीत आधीसारखी ओल टिकत नाही म्हणून सुद्धा अनेक आंब्यांची झाडे आपसुकच वाळली. गेल्या काही वर्षात माकडांचा त्रास अतोनात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांपासून दूर व्हायला सुरुवात केली.

बाजार प्रत्येक ठिकाणी आपला रंग दाखवतो. स्वस्तात मिळणारी, बाहेरुन येणारी, रसायनांनी पिकवलेली कलमी, बदाम आंब्यांनी गावरान आंब्याचा गोडवा नष्ट केला. बाजारात नेलेला गावरान आंबा बेभाव घेण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे शेतकरी निरुत्साहित झाला.

आंब्याला जेव्हा बार नसतो तेव्हा भाव भरपूर, जेव्हा बार भरपूर तेव्हा भाव नाही अशा दृष्टचक्राने शेतकरी जिथे होता तिथेच राहिला. रस्त्याच्या कडेने एकेकाळी असणारी आंब्याची जुणीजाणती झाडं रस्त्याच्या रुंदीकरणात कापल्या गेली.

एकूणच काय तर जुनी मातीशी इमान असणारी माणसे मातीआड गेल्याने, पर्यावरणाचा अतोनात ह्रास झाल्याने आणि बाजाराच्या बदलेल्या स्वभावाने आमराई गेली.

काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या हराळ ह्या गावात होतो. गावातील नरवाडे नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हातात मावणार नाही एवढा एक आंबा आणून दिला. अशी आंब्याची जात पूर्वी कधीही बघितली नव्हती. त्याचा असा गोडवा कधीच चाखला नव्हता. तशा प्रकारचं ते गावात एकमेव झाड होतं. अशा आंब्याच्या जातीची दखल घेण्याची सुबुद्धी सरकारच्या कृषी विभागाला, कृषी विद्यापीठांना होऊ नये याचे आश्चर्य आहे.

विदर्भातील विविध आंब्यांच्या जातींची साधी चेक लिस्ट, त्यांचा आढळ बनवले गेल्याचे मला माहित नाही. परवा एका गावाला तंटामुक्तीचा दोन लक्ष रुपयांचा धनादेश मिळाला. आलेल्या पैशात मोठे प्रवेशद्वार निर्माण करायचं नियोजन सुरु झालं. माझा एक पर्यावरण प्रेमी मित्र म्हणाला गावच्या इ क्लास जमिनीवर गावरान आंब्यांची आमराई उभारुया.

दरवर्षी गावाला उत्पन्नही मिळेल आणि आमराईच्या पुनरूज्जीवनाच्या दिशेने एक पाऊल टाकल्या जाईल. नक्षत्रवन, स्मृतीवनाप्रमाणे आमराईची वाटचाल व्हायला पाहिजे. हराळ गावच्या दुर्मिळ आंब्याच्या जातींची कलम करुन त्याला संरक्षित करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT