Turmeric Cultivation
Turmeric Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Cultivation : लागवडीसाठी हळदीच्या योग्य जाती कोणत्या?

डॉ. मनोज माळी

डॉ. मनोज माळी

Turmeric Farming News : हळद हे मसाला पिकांतील प्रमुख नगदी पीक आहे. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने तिचा उपयोग दैनंदिन आहारात करणे फायदेशीर ठरते. महाराष्ट्रातील एकूण हवामानाचा विचार करता, हळद लागवडीसाठी उत्तम आहे.

राज्यात हळद लागवडीस अक्षय तृतीयेचा मुहूर्त उत्तम मानला जातो. साधारणपणे अक्षय तृतीयेपासून हळद लागवडीस सुरुवात केली जाते. लागवडीपूर्व जमिनीची योग्यप्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत आवश्यक आहे.

हवामान

पिकांस उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व स्वच्छ सूर्यप्रकाशात पिकाची वाढ उत्तम होते. जास्त तापमान असलेल्या ठिकाणी किमान तापमानाची तीव्रता कमी झाल्यावरच लागवड करावी. अन्यथा, वाढलेल्या कमाल तापमानामुळे उगवणीवर विपरीत परिणाम होतो.

उगवणीसाठी सरासरी ३० ते ३५ अंश सेल्सिअस, फुटवे फुटण्यासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस, कंद वाढीसाठी २० ते २५ अंश सेल्सिअस, तर कंद चांगले पोसण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.

साधारण मे ते जून महिन्यातील उष्ण व दमट हवामान पिकास अनुकूल असते. पावसाळी हंगामात खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते. कंद वाढीस कोरडे व थंड हवामान पूरक ठरते.

जमीन

- मध्यम, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी. नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत हळदीचे उत्पादन भरपूर मिळते.

- जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जमिनीची खोली साधारणपणे २० ते २५ सेंमी असावी.

- जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी द्विदल किंवा हिरवळीची पिके जसे ताग, धैंचा इ. गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी.

- भारी काळ्या, चिकण व क्षारयुक्त जमिनी पिकांस मानवत नाहीत. अशा जमिनीत हळद पिकाच्या पाल्याची वाढ जास्त होते. परंतु कंद व्यवस्थित पोसले जात नाहीत.

- हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणत: १ फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे लागवडीपूर्वी एक फूट खोलीवरील माती परीक्षण करून घ्यावे.

पूर्वमशागत

- हळद लागवडीपूर्वी नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाने खणून काढणे इत्यादी पूर्वमशागातीची कामे करून घ्यावीत.

- जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. पहिले पीक काढल्यानंतर ट्रॅक्टरने २५ ते ३० सेंमी खोलीपर्यंत जमिनीची खोल नांगरट करावी. पहिल्या नांगरटीनंतर कमीत कमी १ ते २ महिन्यांनी दुसरी आडवी नांगरट करावी. दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास, तव्याचा कुळव मारून नंतर नांगरट करून घ्यावी.

- त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ३५ ते ४० टन प्रमाणे शेतात पसरून घ्यावे.

सुधारित जाती

१) फुले स्वरूपा

- दुग्गीराला या दक्षिण भारतातील जातीमधून निवड पद्धतीने ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत हळद संशोधन योजना कसबे डिग्रज येथून विकसित केली आहे.

- ही मध्यम उंच वाढणारी जात आहे. पानांचा रंग हिरवा, तर संख्या ११ ते १३ इतकी असते.

- पक्वतेचा काळ २५५ दिवसांचा असून, फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते.

- गड्डे मध्यम आकाराचे असून, वजनाने ५० ते ५५ ग्रॅमपर्यंत असतात.

- हळकुंडे सरळ व लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग पिवळसर असून, कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के इतके असते.

- हळकुंड वजनाने ३५ ते ४० ग्रॅम असतात. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सेंमी असते.

- ओल्या हळदीचे हेक्टरी सरासरी ३५८.३० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ७८.८२ क्विंटल उत्पादन मिळते. या जातीचा उतारा २२ टक्के इतका आहे.

- पानांवरील करपा रोग तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक.

२) सेलम

- या जातीची सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

- पाने रुंद, हिरवी असून, झाडास १२ ते १५ पाने येतात.

- सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात जास्त आर्द्रता व सतत रिमझिम पाऊस असल्यास फुले येतात.

- हळकुंडे, उप-हळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडांची साल पातळ असून, गाभ्याचा रंग गर्द पिवळा असतो.

- चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत झाडाची उंची ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात.

- कुरकमीनचे प्रमाण ४ ते ४.५ टक्के इतके आहे.

- ओल्या हळदीचे हेक्टरी सरासरी ३५० ते ४०० क्विंटल, तर वाळलेल्या हळदीचे ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते.

- परिपक्व होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात.

३) राजापुरी

- सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत या जातीची लागवड केली जाते.

- एका झाडास १० ते १५ पाने येतात. पाने रंद, फिक्कट हिरवी व सपाट असतात. झाडास क्वचित फुले येतात.

- हळकुंडे व उप-हळकुंडे आखूड, जाड व अंगठ्यासारखी ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो.

- कुरकुमीनचे प्रमाण ६.३० टक्के इतके आहे.

- शिजविल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के मिळतो.

- ओल्या हळदीचे हेक्टरी सरासरी २५० ते ३०० क्विंटल, तर वाळलेल्या हळदीचे ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.

- परिपक्व होण्यास ८ ते ९ महिने लागतात.

- या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यात चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो.

- हळद वायदे बाजारातील भाव हा राजापुरी हळद जातीवरून ठरविला जातो. यामुळेच ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी शेतकरी या जातीस पसंती देतात.

४) कृष्णा

- ही जात हळद संशोधन केंद्राने कडप्पा या जातीमधून निवड पद्धतीने विकसित केली आहे.

- पाने आकाराने रुंद, रंगाने हिरवट व सपाट असतात. एका झाडास १० ते १२ पाने येतात.

- हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडांचा गाभा पांढरट पिवळा असतो. पेरे संख्या ८ ते ९ इतकी असते.

- हळकुंडाच्या दोन पेरांमधील अंतर इतर जातींच्या तुलनेने जास्त असते.

- वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी ६ ते ७ सेंमी असते. कुरकुमीनचे प्रमाण २.८० टक्के इतके आहे.

- वाळलेल्या हळदीचे हेक्टरी सरासरी ७५ ते ८० क्विंटल उत्पादन मिळते.

५) टेकुरपेटा

- हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा आणि पानांचा रंग फिक्कट पिवळा असतो.

- कुरकुमीनचे प्रमाण १.८० टक्के इतके आहे.

- कच्च्या हळदीचे उत्पादन हेक्टरी ३८० ते ४०० क्विंटल, तर वाळलेल्या हळदीचे ६५ ते ७० क्विंटल इतके मिळते.

६) वायगांव

- ही जात ७ ते ७.५ महिन्यांत पक्व होते.

- सुमारे ९० टक्के झाडांना फुले येतात. पानांचा रंग गर्द हिरवा व चकाकणारा असतो.

- झाडाला ८ ते १० पाने येतात. पानांना तीव्र सुवास असतो. हळद पावडरची चवही वेगळी येते.

- कुरकुमीनचे प्रमाण ६ ते ७ टक्के इतके आहे. या जातीचा उतारा २० ते २२ टक्के असतो.

- हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध असतात. गाभा गर्द पिवळा असतो.

- कच्च्या हळदीचे हेक्टरी १७५ ते २०० क्विंटल व वाळलेल्या हळकुंडांचे हेक्टरी ३८ ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते.

७) आंबे हळद

- हळदीला कच्च्या आंबा कैरीसारखा सुवास येतो. या जातीची हळद दिसायला इतर जातींप्रमाणेच असली, तरी आतील रंग एकदम फिकट पिवळा पांढरट असतो.

- ही जात हळव्या प्रकारात मोडते.

- साधारण ७ ते ७.५ महिन्यांत काढणीस तयार होते.

- मुख्यतः लोणचे तयार करण्यासाठी वापर केला जातो.

इतर जाती

- भारतीय मसाला पिके संशोधन केंद्र, कोझीकोड (केरळ) ः सुवर्णा, सुगुणा, सुदर्शना, आयआयएसआर प्रभा, आयआयएसआर प्रतिभा, आयआयएसआर केदारम.

- तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूर यांच्याद्वारे बीएसआर-१, बीएसआर-२.

संपर्क - डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४ - (लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT