Human Mind
Human Mind Agrowon
ॲग्रो विशेष

Human Psychology : मन म्हणजे काय?

Team Agrowon

डॉ. सुवर्णा बोबडे, शिल्पा जोशी

Human Health : मन हा डोळ्यांना न दिसणारा अवयव आहे. मनाचा अंदाज वागण्यातून येतो, बोलण्यातून येतो, हावभावांतून येतो. पण प्राणवायू किंवा घरात तारेतून येणारी वीज जशी दिसत नाही, तशीच मन (Mind) ही ‘न दिसणारी’ पण ‘असणारी’ संस्था आहे. मन एखाद्या मळ्यासारखे आहे, आपण मनात जे पेरू ते उगवते.

दर्जेदार उत्पादन हवं तर बीज आणि मशागत महत्वाची! काही वेळा अमूर्त कार्यांमध्ये अडचणी जाणवतात.

त्रासदायक विचार सतत आणि खूप आवेगाने येत राहणे, संताप, तीव्र भीती, अतिचिंता, अपराधीपणा अशा भावना जाणवणे, अविवेकी वर्तन किंवा व्यसनासारख्या हानिकारक सवयी हे मनाचे त्रास आहेत.

प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आणि कृतिशील असणारा शेतकरी म्हणजे कर्ता शेतकरी. हे वाक्य वाचताना, आता हा लेख वाचताना तुम्ही कुठले अवयव वापरता आहात? पेपर धरायला हात, वाचायला डोळे, डोळ्यांनी जे वाचले त्याचा अर्थ लावायला मेंदू आणि मन! समजा काही कारणाने हाताला इजा झाली, तर आपण पेपर खाली ठेवून वाचू शकू.

अंध व्यक्तींना ब्रेल लिपीत लिहिलेला लेख वाचता येईल. पण लेखाचा अर्थ लावायचा तर मात्र मन अगदी अपरिहार्य आहे. आपल्या सगळ्या कृतींमध्ये, कामांमध्ये मन या अवयवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मन एखाद्या मळ्यासारखे आहे, आपण मनात जे पेरू ते उगवते. दर्जेदार उत्पादन हवं तर बीज आणि मशागत महत्त्वाची! मनाच्या मातीची मशागत करण्याचे तंत्र आणि मंत्र आपण या लेखमालेत आपण बघणार आहोत.

मन म्हणजे काय? हिंदी-मराठी सिनेमात मन दाखवताना हृदयाकडे हात नेतात खरे; पण मन नक्की कुठे असतं? सहसा आपण आपले सगळे अवयव बघू शकतो, प्रत्यक्ष किंवा काही मेडिकल टेस्ट करून. मात्र मन हा डोळ्यांना न दिसणारा अवयव आहे.

मनाचा अंदाज वागण्यातून येतो, बोलण्यातून येतो, हावभावांतून येतो. पण प्राणवायू किंवा घरात तारेतून येणारी वीज जशी दिसत नाही, तशीच मन ही ‘न दिसणारी’ पण ‘असणारी’ संस्था आहे.

‘विशिष्ट कार्ये करणारी संस्था’ असे मनाचे वर्णन करता येईल. विज्ञानानुसार मन म्हणजे मेंदूच्या मज्जा पेशी आणि त्यांचे कार्य असे म्हणता येईल.

अतिशय विशेष आणि अद्‍भुत अशा या मज्जापेशी असतात. आपल्या शरीरात अक्षरश: कोटींच्या संख्येने या मज्जापेशी काम करत असतात.

मेंदू आणि मज्जापेशी यांनी बनलेल्या मज्जासंस्थेची कार्ये दोन प्रकारची असतात – मूर्त कार्ये आणि अमूर्त कार्ये. जी कामे आपल्याला प्रत्यक्ष दिसतात, निरखता येतात, मोजता येतात ती कार्ये म्हणजे मूर्त कार्ये. उदाहरणार्थ, मज्जापेशींनी आज्ञा दिली, की आपण वजन उचलतो.

वजन उचलले आहे ही कृती प्रत्यक्ष बघता येते, किती वजन उचलले, ते उचलायला किती सेकंद लागले हे मोजता येते. तोल सांभाळणे, बघणे, ऐकणे, बोलणे, शरीराच्या ऐच्छिक हालचाली ही सगळी झाली मूर्त कार्ये.

आपण विचार करणे, जुने संदर्भ आठवणे, निर्णय घेणे, भावना जाणवणे हे ही अनुभवत असतो. मात्र ही कामे स्वत:ला किंवा इतरांना प्रत्यक्ष दिसत नाहीत.

विचार किंवा भावनेची तीव्रता त्या व्यक्तीला स्वत:पुरती अनुभवता येते; पण मोजता येत नाहीत. ही झाली मज्जा संस्थेची अमूर्त कार्ये किंवा मन!

मज्जासंस्थेची ही अमूर्त कार्ये थोडी विस्ताराने समजून घेऊया. मनाची कुठली कामे आपण अनुभवतो?
विचार करणे (Thinking) ः हा लेख वाचताना तुमच्या मनात काही उमटत आहे, ते झाले विचार.
भावना (Emotions) ः राग येतो, भीती वाटते, कुतूहल जाणवते, या सगळ्या झाल्या भावना.
स्मरण / स्मृती (Memory) ः जुन्या गोष्टी आठवतात, पूर्वी घेतलेले अनुभव, निर्णय आठवतात. व्यक्ती-जागा-गंध-चव याबद्दल आठवणी असतात. या आठवणींची साठवण करणे आणि नेमकेपणाने त्या हुडकून काढणे हे झाले स्मृतीचे कार्य.


बुद्धी (Intelligence) ः समस्येचा सर्वांगाने अभ्यास करून त्यावर उत्तर शोधणे, वेगवेगळे पर्याय तयार करणे हे झाले बुद्धीचे काम.
प्रेरणा (Motivation) ः एखादी कृती करण्यासाठी स्वत:ला प्रोत्साहित करणे म्हणजे प्रेरणा. अगदी रोज पूजा-हरिपाठ म्हणणे किंवा वेळच्या वेळी बँकेची, शेतीची, घरातली, बाहेरची कामे पार पाडणे यासाठी प्रेरणेचे काम खूप महत्त्वाचे.


तारतम्य (Judgment) ः काय करणे फायद्याचे, काय करण्याने नुकसान याची तुलना करणे म्हणजे तारतम्य.
विवेक (Conscience) ः सत् आणि असत् याचा विचार करून निर्णय घ्यायला उपयुक्त ठरणारे मनाचे कार्य म्हणजे हा विवेक. इतरांना त्रास देऊ नये, खोटे बोलू नये, बळ वापरून इतरांची वस्तू हिसकावून घेऊ नये यांसारखे विचार करायला मदत होते ती या विवेकाची. मानवी मनाची ही विशेष संस्था! आतापर्यंत आपण पाहिली ती कार्ये, कमी-अधिक प्रमाणात, प्राण्यांमध्येही आढळतात. पण विवेक हे कार्य मात्र माणसाच्या मेंदूत विशेष प्रगत झाले आहे.


जागृती (Consciousness) ः आपले मन या सगळ्या कार्यात गुंतलेले आहे याची सतत एक जाणीव आपल्याला असते. ही जाणीव म्हणजे जागृती. मनाची माती कसायची तर आपले विचार, आपल्या प्रेरणा, भावना याबद्दल भान निर्माण करायला लागेल. आणि त्यासाठी ही जागृती खूप महत्त्वाची.

एक उदाहरण बघूया. समजा एखादं गुलाबाचं फूल आपल्याला दिसलं. डोळ्यांनी त्या फुलाचा आकृतिबंध आणि रंग, नाकाने त्याचा सुवास अनुभवला. बघणे, वास घेणे ही झाली मूर्त कार्ये. “हा जांभळट रंग जरा वेगळाच आहे, पण पाकळ्या आणि वास बघता हा गुलाबच आहे.

” हा विचार तुमच्या मनात आला. हा विचार म्हणजे अमूर्त कार्य! हा विचार येताना स्मृतीचे कार्य देखील मनाने केले, कारण आधी अनुभवलेल्या फुलांच्या रंग-रूप-गंध या आठवणींशी पडताळून ‘हे फूल गुलाबच असणार!’ हा निष्कर्ष काढला.

गुलाबाचे फूल म्हटले की प्रेमाची भावना मनावर उमटली. (भावना).
गुलाबाच्या बाबतीतली जुनी एखादी आठवण जागी झाली (स्मृती).
कदाचित गोड शिरशिरी जाणवली. (शरीरावर उमटलेली संवेदना ः मूर्त कार्य)
चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. (वर्तन)


हे फूल दुसऱ्याच्या बागेतलं आहे, ते आपण तोडणे योग्य नाही. (तारतम्य)
म्हणजे गुलाबाचे फूल दिसणे यातून मन आणि शरीरावरही काही संवेदना उमटल्या. आपल्या मेंदूची मूर्त आणि अमूर्त कार्ये घडली, आणि अगदी वेगाने घडली.

प्रत्येक अवयावासाठी तज्ज्ञ डॉक्टर असतात तसेच मन या अवयवाचे देखील डॉक्टर असतात.
मेंदूतज्ज्ञ (Neurologist) आणि मनोविकारतज्ज्ञ (Psychiatrist)
शरीरभर पसरलेल्या मज्जापेशी आणि मेंदू मिळून मनाची अमूर्त कार्ये पार पाडत असतात. या यंत्रणेत काही बिघाड झाला तर मेंदूतज्ज्ञाची (Neurologist) मदत घ्यावी लागते.

मेंदूला दुखापत झाली, गाठ आली, अपुरा रक्तपुरवठा अशा काही कारणाने, नीट दिसत नाही, हालचाली नीट करता येत नाहीत, तोल सांभाळता येत नाही असे त्रास जाणवू शकतात. अवयवात होणारे बदल किंवा बिघाड, वेगवेगळे स्कॅन किंवा टेस्ट करून शोधता येतात.

अशा चाचण्या आणि मूर्त कार्यांचे निरीक्षण करून मज्जासंस्थेतील त्रासाचे निदान करणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे काम मेंदूतज्ज्ञ करतात.

काही वेळा अमूर्त कार्यांमध्ये अडचणी जाणवतात. त्रासदायक विचार सतत आणि खूप आवेगाने येत राहणे, संताप, तीव्र भीती, अतिचिंता, अपराधीपणा अशा भावना जाणवणे, अविवेकी वर्तन किंवा व्यसनासारख्या हानिकारक सवयी हे मनाचे त्रास आहेत.

हे त्रास मेंदू ह्या अवयवाच्या चाचण्या किंवा स्कॅनमध्ये दिसणार नाहीत. त्या व्यक्तीने / कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मनाच्या कार्यातले हे अडथळे (वर्तनातील बदल, भावनांची तीव्रता आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम इत्यादी) शोधावे लागतात.

ही सर्व अमूर्त कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक रसायने लागतात. ती जर पुरेशा प्रमाणात तयार होत नसतील किंवा त्यांचा समतोल बिघडला असेल, तर त्यावर औषधयोजना करावी लागते.

अमूर्त कार्ये, मनाचे त्रास यांचे निदान आणि औषधोपचार करणारे तज्ज्ञ म्हणजे मनोविकारतज्ज्ञ (Psychiatrist) आणि समुपदेशन करणारे मानसोपचारतज्ज्ञ (Psychologist)

पुढच्या लेखात मन ही जटील संस्था समजून घ्यायला आणि त्यावर काम करायला मदत करेल असे ‘मनाचे मॉडेल’ आपण बघणार आहोत.

-------
(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आणि मनोविकास प्रशिक्षक आहेत.)
kartashetkari@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT