Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : शेतकरी आंदोलनात गुरुवारी काय घडलं? दिल्लीच्या सर्व सीमा बंद!

Dhananjay Sanap

शेतकरी आंदोलन आज काय घडलं?

शेतकरी आंदोलनातील पोलिस हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भारतीय किसान युनियननं पंजाबमध्ये गुरुवारी (ता.१४) दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान रेल्वे रोको पुकारला पंजाबमध्ये गुरुवारी सकाळपासूनच जागोजागी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. 'रेल्वे रोको' करून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध नोंदवणार असल्याची भूमिका भारतीय किसान युनियनने घेतली.

हरियाणा-दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधारा नळकांड्यांचा भडिमार करण्यात आला होता. हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाच्या नेतृत्वात २०० शेतकरी संघटनांनी 'चलो दिल्ली' हाक दिली होती. हरियाणातील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे कूच करत असतानाच हरियाणा-दिल्लीच्या शंभू सीमेवर पोलिसांनी आडवलं. सीमाभागात जमावबंदी लागू केली. इंटरनेट आणि मोबाइल मेसेज सुविधा बंद केली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गावर लोखंडी आणि सिमेंटचे बॅरीकेट्स उभारले. आणि पोलिस फौजफाटा तैनात केला. शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊ नये, यासाठी बळाचा वापर करून तगडा बंदोबस्त उभारण्यात आला. त्याविरोधात भारतीय किसान युनियन आक्रमक झाली आहे.

भारतीय किसान युनियनने गुरुवारी (ता.१५) सकाळपासून दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावरील टोल वसूली बंद केली. त्यामुळं शेतकऱ्यांचा ओघ शंभू सीमेकडे वाढला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी दुपारी महिलाही पोचल्या आहेत. त्यासोबतच भारतीय किसान युनियननेही १७ फेब्रुवारी रोजी आपआपल्या तहसील समोर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत कुरुक्षेत्रमध्ये किसान युनियनने बैठक बोलवली होती. या बैठकीत चर्चा करून भारतीय किसान युनियनने १७ फेब्रुवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली. दुसरीकडे पंजाबमधील राजपुरमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रोको केला. त्यात महिलांचाही सक्रीय सहभाग होता. दिल्लीच्या दिशेनं निघालेला जमाव पाहता प्रशासनं दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. शंभू, सिंघू, गाझियाबाद, सीमेसोबतच आज गुरुग्राम सीमावरही बॅरीकेट्स आणि टायर ब्लास्टर लावण्यात आलेत. 

मुख्यमंत्री खट्टर काय म्हणाले?

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मंगळवारी हरियाणा सरकारला शेतकऱ्यांना रोखण्याच्या मुद्द्यावरून काही प्रश्न विचारले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांना महामार्गावर अडवलं का? असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असं उच्च न्यायालयानं सांगितलं. त्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. खट्टर म्हणाले, "सीमा भाग बंद करण्याचा मुद्दा हरियाणा सरकारचा नाही. तो केंद्रीय एजन्सीचा निर्णय आहे. सीमा भागात आंदोलन करणारे शेतकरी पंजाबचे आहेत, हरियाणाचे नाहीत. त्यामुळं आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाब सरकारकडे मागण्या मांडव्यात,"असंही खट्टर म्हणाले. शेतकरी आंदोलकांना रोखण्यावरून आणि सीमाभागातील इंटरनेट सेवा बंद करण्याच्या हरियाणा सरकारच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

ट्रॅक्टर खरेदीत घसरण

देशात ट्रॅक्टर खरेदीत मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घट झालीय. खरीपात पावसानं दडी मारल्यानंतर देशाच्या विविध भागात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. दुष्काळग्रस्त भागात अवकाळी पावसानं दिलासा दिला होता. पण खरीपात घटलेली उत्पादकता आणि रब्बी पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जानेवारीतही ट्रॅक्टर खरेदीकडे पाठ फिरवली. २०२३ च्या जानेवारी महिन्यात ६५ हजार ६३५ ट्रॅक्टर विक्री झाली होती. यंदा मात्र जानेवारी महिन्यात ५५ हजार ५८९ ट्रॅक्टरच विक्री झाली. ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या जानेवारी २०२४ च्या अहवालानुसार २२ हजार ९७२ ट्रॅक्टरची विक्री केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत १७ टक्के घसरण झाल्याचं कंपनीचा रिपोर्ट सांगतो. महिंद्रा अँड महिंद्रा देशात सर्वाधिक ट्रॅक्टरचा खप करणारी कंपनी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT