Maharashtra Assembly  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Mahayuti : विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांतील १५ पैकी ११ जागा महायुतीला मिळाल्या.

Team Agrowon

Akola News : विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांतील १५ पैकी ११ जागा महायुतीला मिळाल्या. त्यातही भाजपाने नऊ जागा जिंकत बाजी मारली. यामुळे आता अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात भाजपच्या एक-एक आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.

यात जळगाव जामोद मतदार संघात पाचव्यांदा विजयी झालेले डॉ. संजय कुटे, अकोला पूर्वमध्ये विजयाची सर्वाधिक मतांनी हॅटट्रिक करणारे रणधीर सावरकर यांचा दावा अधिक प्रबळ बनलेला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर, चिखली, अकोला पूर्व, कारंजा, वाशीम, मूर्तीजापूर, अकोट या जागा मोठ्या फरकाने जिंकल्या.

या सर्व ठिकाणी विरोधी उमेदवार विजयापासून बरेच दूर राहिले होते. या तीन जिल्ह्यांत बुलडाणा, सिंदखेडराजा या दोन जागा महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जिंकल्या.

या भागात महायुतीने ज्या पद्धतीने विजय मिळवला, त्यात प्रचारासाठी मोठ्या नेत्यांनी घेतलेल्या सभांचा अधिक फायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांनी तारले. त्यामुळेच आता विजयाचा जल्लोश होत आहे. दुसरीकडे सर्वांच्या नजरा मंत्रिपदाकडे लागल्या आहेत.

या वेळी पश्चिम विदर्भात संजय कुटे यांचा प्रबळ दावा आहे. यापूर्वी त्यांना काही दिवसांसाठी मंत्रिपद दिले गेले होते. आता त्यांची मंत्रिमंडळात वर्णी निश्चित मानली जात आहे. राज्यात गेल्या काळात शिंदे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी डॉ. कुटे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

या सर्व बाबी आता त्यांना मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानत आहेत. अकोल्यातून रणधीर सावरकर यांना मंत्रिपद तसेच पालकमंत्रीपद मिळेल, असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटू लागला आहे. ज्या पद्धतीने या दोन्ही जिल्ह्यात भाजपने पकड बनवून ठेवली त्याचे बक्षीस मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता वाढलेली आहे.

गड गेल्याचे शल्य

विधानसभेतील दणदणीत विजयात महायुतीला अकोला पश्चिम आणि मेहकर या दोन जागा गमावल्याचे शल्य बोचते आहे. अकोला पश्चिम हा गेल्या सात निवडणुकांमध्ये भाजपचा गड होता. येथे गोवर्धन शर्मा सातत्याने निवडून येत होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

कमी कालावधीमुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक न घेता येथे विधानसभा निवडणुकीबरोबरच कार्यक्रम राबवला. या ठिकाणी विजय अग्रवाल यांनी काट्याची लढत दिली. मात्र, काँग्रेस उमेदवार भारी पडला. भाजपमधील अंतर्गत बंडाळीसुद्धा या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा होत आहे.

बुलडाण्यातील मेहकरची शिवसेनेची (एकनाथ शिंदे गट) जागा या वेळी सिद्धार्थ खरात या नवख्या उमेदवाराने शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) लढत जिंकली. मेहकर हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदार संघ आहे. येथे डॉ. संजय रायमूलकर हे सातत्याने विजयी झाले होते.

पण या वेळी मतदारांनी गृहीत धरणाऱ्यांना झटका दिला. याबरोबरच ‘मविआ’चे दिग्गज उमेदवार व पाचवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलेले माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ऐनवेळी महायुती सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश घेत निवडणूक लढवली. पण त्यांनाही मतदारांनी नाकारले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मनोज कायंदे यांना निवडून दिले.

महाविकासला चिंतनाची गरज

महायुतीच्या विजयाचा चौफेर गुलाल उधळला. त्यात महाविकास आघाडीचे अपयश ठळकपणे समोर आले. १५ पैकी चार जागा ‘मविआ’ला मिळाल्या. काही मतदार संघांत विजयाच्या आसपासही उमेदवार नव्हते. सत्तारुढ पक्षाविरुद्ध नकारात्मक वातावरण असतानाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही परिस्थिती कॅच करण्यात यश आले नाही.

विजयी झालेले मतदार संघ

महायुती ः जळगाव, खामगाव, मलकापूर, चिखली, अकोला पूर्व, अकोट, मूर्तीजापूर, वाशीम, कारंजा, बुलडाणा, सिंदखेडराजा

महाविकास आघाडी ः रिसोड, अकोला पश्चिम, मेहकर, बाळापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

Tur Pest : तुरीवर अळीचे आक्रमण; वातावरण बदलाचा फटका

SCROLL FOR NEXT