- डॉ. निलेश हेडा-
आपल्या आसपासचे काही प्राणी दुर्लक्षित असतात. काही प्राण्यांना आपण गृहीत धरुन असतो. असाच एक प्राणी आहे डुक्कर. गोंड आदिवासी समाजात डुक्कर हा प्राणी फार महत्वाची भूमिका बजावतो. आदिवासींमध्ये अनेक सणावाराला आणि महत्वाची मेजवानी देण्यासाठी डुकराच्या मांसाचे फार महत्व आहे. डुक्कर हा आकाराने फार मोठा प्राणी असल्याने एकट्या कुटुंबासाठी त्याचे मांस जास्त होते. त्यामुळे समुहातच त्याच्या मांसाचे वाटे केले जातात. प्रत्येक गोंड आदिवासींच्या घरासमोर खास करुन डुकरांसाठी लाकुड आणि कवेलुंचा उपयोग करुन तयार केलेलं एक छोटसं घर असतं, त्याला 'पदगुडा' म्हणतात. (गोंडीत पदी म्हणजे गावठी डुक्कर आणि गेडापदी म्हणजे रानटी डुक्कर). लोक सांगतात की डुकराचे घर हे आतुन फारच स्वच्छ असते. डुक्कर हा आपल्या घरात कधीच घाण करत नाही. मेंढ्यात ८-१० पिलांच्या कळपासह आरामात चाललेली डुकरीन बघितली की जगाची चिंता न करता आपल्याच मस्तीत चाललेल्या परम योग्याची आठवण येते. आपल्या पिलांना दुध पाजताना डुकरीनीच्या चेहऱ्यावरचा परम तृप्तीचा भाव प्रत्येक क्षणाला जीवनाचा आनंद लुटणाऱ्या तपस्व्याची आठवण करुन देतो.
डुक्कर हा प्राणी खरं म्हणजे गाढवाच्या स्वभावाचा आहे असं मला वाटतं. शांत, समजदार, आपण ह्या जगात कशासाठी आलो आहे याची जणू पुरेपुर जाणीव असलेले आणि सदासर्वदा त्याच प्रयत्नात असलेले हे दोन्ही प्राणी. डुक्कर कोणालाही त्रास देत नाही, फार काही आरडाओरड करत नाहीत, चावा घेत नाही, त्यांची काळजी घेणे फार सोपे असते इत्यादी. पण रानडुकरांच्या बाबतीत असं नाही. त्याचा स्वभाव उग्र आणि मस्तीखोर. त्याची शिकार करणे अवघड असते. तो शेतीचे नुकसान करतो. तो माणसावर हल्ला करून त्याला गंभीर दुखापत करु शकतो. रानडुकराचं २०० किलोचं धुड जेव्हा माणसावर आदळतं तेव्हा केवळ देवच त्या माणसाला वाचवू शकतो. हत्तीचे अभ्यासक रमण सुकुमार यांचं हत्तीवरचं पुस्तक वाचत होतो. हत्ती शेतीची नासधुस कशी करतो, माणसावर हल्ला कसा करतो याचं फार चांगल वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केलं आहे. मला हत्ती आणि रानडुकरात बरंच साम्य आढळतं. त्यांची शेतीची नासधुस करण्याची पद्धत एक सारखीच वाटते; म्हणजे खाणं कमी अन् नाश जास्त!
आदिवासींकडे असलेल्या संपत्तीबद्दल मला मोठं आश्चर्य वाटत आलं आहे. त्यांच्या संपत्तीत शेती, पाळीव प्राणी ह्यांचा फार मोठा सहभाग असतो. त्या संपत्तीतला डुक्कर हा महत्वाचा घटक आहे. ती आदिवासींची एक प्रकारची जिवंत संपत्ती आहे. डुक्कर प्रत्येकाकडे असायलाच हवे अन्यथा तुम्ही गरीब समजले जाण्याची शक्यता असते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजकाल एक मजबूत आणि स्वस्त वाहन फार लोकप्रिय होत आहे. कमी अंतरावर जाण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्याला लोक ‘डुक्कर' म्हणतात. एकदा मध्यप्रदेशात फिल्डवर्क करताना लोकांनी त्याच वाहनाला `सुअर' म्हटल्यावर गंमत वाटली!
अभ्यासाच्या बाबतीत मला वाटतं आपण काही प्राण्यांवर अन्यायच केलेला आहे. यातील तीन प्राणी म्हणजे पाळीव डुक्कर, गाढव आणि पाळीव कुत्रा. हे तिन्ही प्राणी ग्रामीण भारताचे फार महत्वाचे भाग असुनही ह्या प्राण्यांच्या परिस्थितीकीवर, स्वभावावर फारसे अभ्यास झालेले दिसत नाहीत. मेंढा लेखात प्रत्येक घरात सरासरीने ५ ते ६ डुकर आणि २ ते ३ कुत्रे तरी असतातच. सकाळीच पदगुड्यातुन मुक्त केलेली डुकरं दिवसभर गावाच्या आसपास चरत असतात. संध्याकाळी त्यांना पदगुड्यात पुन्हा बंद केल्या जाते.
पुढे जाण्याआधी डुकरांबद्दल थोडी अधिक माहिती देण्याची माझी इच्छा आहे. सस्तन प्राण्यांच्या सुईडी (Suidae) ह्या परिवारातली डुक्कर ही जात (Sus scrofa). पाळीव डुक्कर ही त्याची उपजात (Sus scrofa domestica). मानवाने ५ ते ७ हजार वर्षांआधी डुक्कर पाळायला सुरुवात केली असावी, असे अभ्यासक मानतात. मांसासोबतच याची मजबूत हाडे शेकडो वर्षांपर्यंत आयुधं आणि ढाली बनवण्यासाठी वापरात होती. डुकराच्या केसांचा उपयोग जुन्या काळी आणि अजूनही ब्रश तयार करण्याकरीता केला जातो. पाळीव डुक्कर हा फार बुद्धिमान प्राणी आहे आणि एका तज्ज्ञानुसार कुत्रे आणि मांजरांपेक्षाही जास्त प्रभावीपणे डुकराला प्रशिक्षित केल्या जाऊ शकते. जगभर हा प्राणी आढळतो. जगभरातल्या आदिवासी संस्कृतीत डुकराचं स्थान महत्वाचं आहे. मलायन आर्चीपेलागोचा भाग असलेल्या बॅर्नीयो (Borneo) देशात जंगली डुकरांच्या कवट्या बहादुरीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात व माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत दफन केल्या जातात. निकोबार बेटांवर सुद्धा डुकरांचे सांस्कृतिकदृष्ट्या फार महत्व आहे. त्यांचे डुकरांबद्दलचे प्रेम वाखाणन्यासारखे असते. अगदी डुकरांच्या प्रेमात त्यांनी गाणी आणि कविता सुद्धा लिहिल्या आहेत. आदिवासींमध्ये डुक्कर हे संपत्तीचे द्योतक समजल्या जाते आणि दंड म्हणून देण्याच्या ऐवजात डुकरांचा वापर करण्यात येतो. हिंदु धर्मात विष्णूचा तिसरा अवतार (वराह अवतार) हा डुकराच्या स्वरुपातच होता. हिरण्ययक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला सागराच्या तळाशी लपवुन ठेवले तेंव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी विष्णूने वराहाचे रुप घेतले आणि सागराच्या तळातुन धरतीची सुटका केली, अशी आख्यायिका आहे. ह्याच काळापासुन नव्या कल्पाची सुरुवात झाल्याचे मानले जाते.
वैद्यकशास्त्राचा विचार करता मानवजातीवर डुकराचे मोठेच उपकार आहेत. मनुष्याच्या शरीर रचनाशास्त्राशी डुकराच्या शरीर रचनाशास्त्राचं कमालीचं साम्य असल्याकारणाने मानवी वैध्यकीय संशोधनात डुकराचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्या जातो. डुकराचं ह्रदय हे मानवाच्या ह्रदयाशी साधर्म्य ठेऊन असतं. डुकरांना सुद्धा धमनी काठिण्याचा आजार होतो आणि माणसाप्रमाणेच त्यांना सुद्धा ह्रदयरोग होत असतो. त्यामुळे खास करुन ह्रदयरोग शास्त्राच्या संशोधनात डुकराचं अनन्य साधारण महत्व आहे. मनुष्याप्रमाणेच डुक्कर हा सुध्दा सर्वाहारी जीव असल्याने पचनसंस्थेच्या अभ्यासात डुक्कराचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केल्या जातो. १९८० पर्यंत मधुमेहात देण्यात येणारं इंसुलिन हे औषध मिळवण्यासाठी डुक्करांचाच वापर केल्या जायचा.
असो, ह्या लेखाचा मुख्य उद्देश हा डुकरांच्या मी नोंदवलेल्या एका विशिष्ठ स्वभाव वैशिष्ठ्यावर प्रकाश टाकणे हा आहे. एक दिवस कुठे तरी जाण्यासाठी मी गडचिरोलीच्या बस स्टॅंडवर उभा होतो. आपल्या ८-१० पिलांसह एक भली मोठी डुकरीन आरामात समोरुन चालली होती. अचानक समोरुन येणाऱ्या बसने एका मध्यम आकाराच्या डुकराला चिरडले. तो जागीच ठार झाला. अगदी दोन मिनीटांसाठी सारी डुक्कर मंडळी स्तब्ध झाली; पण लगेचच त्यांनी मेलेल्या पिलाला खायला सुरुवात केली. पाच मिनिटांच्या कालावधीत हाडांसह, कवटीसह अख्ख पिल्लू साऱ्या डुक्करांनी फस्त केलं. आणि जणू काही घडलंच नाही ह्या तोऱ्यात मजल दरमजल करीत तो काफीला निघून गेला.
बेंगळुरुला भारतीय विज्ञान संस्थानात पोहचल्यावर प्रा. माधव गाडगीळ यांना मी हे निरीक्षण सांगितलं. त्यावर ते म्हणाले की 'कॅनाबालीझमचा' (स्वत:च्याच प्रजातीला खाऊन टाकण्याची प्रवृती. ही प्रवृत्ती प्राणी जगतात फारशी आढळत नाही) हा एक प्रकार आहे. जेंव्हा डुकराना वाटलं असेल की आता आपल्या हातात काही नाही तेव्हा संसाधन वाया न जाऊ देण्यासाठी त्यांनी ते मेलेले डुक्कर स्वत:च फस्त करुन टाकलं. गाडगीळ सरांनी यासंदर्भातील एक उदाहरण सुद्धा सांगितलं. सर हार्वर्ड विद्यापीठातून भारतात परतल्यानंतरओपॅलीडा नावाच्या भिंगोटीच्या स्वभावाचा अभ्यास करत होते. भिंगोटीच्या एका वसाहतीत बऱ्याच भिंगोट्या आणि त्यांची अंडी होती. काही दिवसानंतर अंड्यावर एक रोग आला आणि हळुहळू अंडी नष्ट व्हायला लागली. आता आपली अंडी वाचण्याची शाश्वती नाही हे जाणून भिंगोट्यांनी स्वत:च ती फस्त करायला सुरुवात केली.
हे ऐकुन फारच अंतर्मुख झालो. मानवी जीवन मूल्य आणि नैसर्गिक मूल्य यात बरीच तफावत आहे. निसर्ग फायदे आणि तोटे ह्या तत्वावर चालतो. तिथे सिमीत संसाधनांतून जीवनाचा प्रवास कसा अखंडितपणे सुरु राहिल हे बघावं लागतं. तिथे संसाधने वाया घालवुन चालत नाही. एखादे संसाधन (उदा. प्रथीनं) तयार करण्यासाठी निसर्गाला बरीच मेहनत घ्यावी लागते. ते असेच वाया गेलेले चालत नाही. कोणत्याही परीस्थितीत संसाधनांचे रुपांतरण ऊर्जेत व्हायला पाहिजे ही निसर्गाची ठाम भूमिका असते.
-------------
(लेखक इकॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.