Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam Water : कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

sandeep Shirguppe

Koyna Chandoli Dam Water : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक धरणे काठोकाठ भरली आहेत. राज्याची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणानही १०० टक्के भरल्याने अनेक जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागच्या काही दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी- अधिक होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाचा पाणीसाठा नियंत्रणासाठी धरण व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आज सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून चार फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्‍याद्वारे ३७ हजार ५२७ क्युसेक आणि पायथा वीज गृहातून दोन हजार १०० क्युसेक असा एकूण ३९ हजार ६२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेचे पाणी कृष्णा नदी पात्रात आल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटांनी वाढली आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी रात्री उशिरा एक वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटाने उचलून जलवर्षात तिसऱ्या वेळी पाणीसाठा नियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला. बुधवारी सकाळी पाण्याची आवक कमी झाल्याने सहा वक्र दरवाजे बंद केले होते. मात्र, पुन्हा आवक वाढल्याने सकाळी नऊ वाजता एक फुटावर दरवाजे उघडण्यात आले होते; परंतु पाणीसाठा नियंत्रणात येत नसल्याने सायंकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांपर्यंत उचलून सांडव्यावरून कोयना नदीपात्रात १९ हजार ९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत दरवाजे दोन फुटांवर स्थिर होते. मात्र, पाणीसाठा नियंत्रणात येत नाही, असे लक्षात आल्यावर सकाळी नऊ वाजता चार फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत.

चार फुटांपर्यंत दरवाजे उघडल्‍याने कोयना नदीपात्रात धरणाच्या सांडव्यावरून ३७ हजार ५२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक विसर्ग होत आहे.

धरण पाणलोट क्षेत्र वगळता तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. धरणातून पाणी सोडले असले, तरी पूरस्थिती निर्माण होईल अशी स्थिती नाही. मात्र, नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ४९ मिलिमीटर, नवजाला ८९ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद ३३ हजार ४७७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांनी उचलणार...

धरणाच्‍या जलाशयात पाण्‍याची आवक वाढत असल्‍याने गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी रात्री ११ नंतर धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेपाच फुटांपर्यंत उचलण्यात येतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्‍यावरून ५० हजार ४४२ क्युसेक, तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असा एकूण ५२ हजार ५४२ क्युसेक विसर्ग नदीपात्रात होणार आहे.

चांदोली धरणातून विसर्ग वाढवला

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह धरण परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे. गेल्या २४ तासांत ४२ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती पर्जन्यमापक केंद्रावर झाली.

सध्या धरणात ९ हजार २८४ क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने चांदोली धरणात ३४.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ९९ टक्के भरले आहे. धरणाच्या वक्राकार दरवाजातून २५४० क्युसेक व पायथ्याशी असलेल्या वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा ३९४० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे धरण प्रशासनाने सांगितले आहे. आजवर ३६१० मिलिमिटर पाऊस झाल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

Vegetable Market : गोव्यातील विक्री केंद्रे खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला, फळे

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT