Maharashtra Drought : राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने अनेक जिल्ह्यांची दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधीक कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाल्याने जिल्ह्यातील नद्या आतापासूनच कोरड्या पडल्या आहेत. सांगलीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा नदीत पाणीच नसल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
कृष्णा नदीत पाणीच नसल्याने अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोयनेतून पाणी सोडण्यासंदर्भात काल (ता.२६) सातारा येथे तेथील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाची बैठक होणार होती, मात्र ती झालीच नाही.
ती आता आज (दि.२७) होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे पाण्यासाठी सांगलीकरांची फरफट सुरूच आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी पाण्याच्या मागणीसाठी आज (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सांगली जिल्ह्याला पाणी कोयनेतून येते कोयना धरणही यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने पाणी पूरवून वापरण्यात येणार असल्याने कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सोडले जात नाही. दुसर्या बाजूला अपुरा पाऊस व ऑक्टोबर हीटमुळे नदीतून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात वाढला.
यामुळे कृष्णेचे नदीपात्र पाच-सहा दिवसापासून पूर्ण कोरडे पडले आहे. कृष्णा नदीतून सांगलीपासून कराडपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी ८२ पाणी योजना आहेत. त्यापैकी ७० पाणी योजना या नदीपत्रात पाणी नसल्याने बंद पडल्या आहेत.
या योजनांवर अवलंबून असलेल्या पलूस, विटा यासारख्या शहरांसह अनेक गावांतील पिण्याचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्याशिवाय ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंचन योजनाही बंद आहेत. किमान पिण्यासाठी तरी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पंधरा दिवसापासून सातारा पाटबंधारे विभागाकडे करीत आहे.
मात्र सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मंजुरीशिवाय पाणी सोडले जात नाही, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. सातार्यातील आजची बैठक झाल्यानंतर आज (दि. २७) सायंकाळी पाणी सोडण्याचे आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सांगली जिल्ह्यासाठी कृष्णा नदीत पिण्यासाठी कोयनेतून पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सातारा पालकमंत्री देसाई यांच्याशी संपर्क करून केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.