Nashik News : जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अभियांत्रिकीचे अंग असते. मात्र, सामाजिक अंग तुलनेत कमी असते. त्यांच्याकडे काही जबाबदारी असल्याने काही गोष्टी मागे राहतात. मात्र अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की, समन्वय साधून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी गेले पाहिजे. तरच तो प्रकल्प केल्याचा उपयोग आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी केले.
जलसंपदा विभाग आणि डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ॲक्सिस बँक आणि फोर्ड फाउंडेशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय सहभागी सिंचन व्यवस्थापन कार्यशाळा शनिवार (ता. २८) रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक येथे यशस्वीरीत्या पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. बेलसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ‘नाबार्ड’चे उपसरव्यवस्थापक प्रदीप पराते, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला, नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र गोवर्धने, विभागीय जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे संस्थापक संचालक शहाजी सोमवंशी, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, धुळे पाटबंधारे विभागाचे प्रकल्प अभियंता संजय सोनवणे, तापी पाटबंधारे मंडळ जळगाव चे अधीक्षक अभियंता संतोष भोसले, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरचे कार्यकारी संचालक मोहन शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बेलसरे म्हणाले, की पाणी मिळाले तर शेतीउत्पन्नात वाढ होऊन बदल शक्य आहे. मात्र त्यासाठी शाश्वत सिंचन व्यवस्था तयार कराव्या लागतील. प्रकल्प बांधले आहेत. सर्वच ठिकाणी अधिकारी पुढे येतील असे नाही. मात्र, काही स्थानिक घटकांनी पुढे येऊन ही चळवळ हाती घ्यावी. शेती सिंचन व्यवस्थापनासाठी पुढाकार घ्यावा, शासनाची ही योजना आहे. खात्रीने पाणी मिळाल्यास पीक पद्धतीत बदल करता येतो.
या वेळी जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांचे सदस्य तसेच अफार्म, युवामित्र, बायफ, प्रेम फाउंडेशन, लुपिन यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी व कृषी विभाग, आत्मा, जलसंपदा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. पराते यांनी नाबार्डच्या माध्यमातून पाणलोट विकास व स्प्रिंगशेड प्रकल्पांची माहिती दिली. सहभागी सिंचन व्यवस्थापनासाठी नवे प्रकल्प राबवण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले.
पॅनेल चर्चेत कालवा व्यवस्थापन, कृषी विस्तार,पीक उत्पादकता वाढ, शेतमाल विक्री व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्था व कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पाणी वापर संस्था सदस्य व संस्थांनी अनुभव मांडले.कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाणी वापर संस्थांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ. बेलसरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
...तर काम अधिक व्यापकपणे राबवता येईल
मोहन शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सहभागी सिंचन व्यवस्थापनाच्या यशासाठी पाणी वापर संस्था सशक्त करणे, कालव्यांची नियमित देखभाल व शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पाणी पोहोचवणे हे तीन प्रमुख घटक असल्याचे सांगितले. सीएसआर व शासकीय भागीदारीच्या माध्यमातून हे काम अधिक व्यापकपणे राबवता येईल, असेही त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.