Water Purification Agrowon
ॲग्रो विशेष

Wastewater Management : सांडपाणी प्रक्रियेचे सोपे तंत्रज्ञान देईल शेतीला शुद्ध पाणी

Water Purification : या भागात गांडुळे आणि डकविड यांच्या वापरातून पाण्याचे शुद्धीकरण करण्याविषयी माहिती घेऊ.

Team Agrowon

सतीश खाडे

Water purification using earthworms and duckweed : गांडूळांद्वारे सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी टायगर बायोफिल्टर ही पद्धत वापरली जाते. त्यात प्लॅस्टिकचे क्रेट (टीबीफ बेड) घेऊन त्यात नैसर्गिक गाळण माध्यम आणि वेगवेगळ्या आकारांच्या खडीचे अनेक थर भरतात. यामध्ये आयसेनिया फोटिडा या जातीची मोठ्या आकाराची गांडुळे भरली जातात.

त्यांच्या मोठ्या आकारामुळे त्यांना ‘टायगर अर्थवर्म’ असेही संबोधतात. या गांडुळांची शारीरिक क्षमता भक्कम असून, ती सांडपाण्यातील प्रदूषके सहज पचवतात. हे प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ खाऊन त्याचे रूपांतर गांडूळ खतात करतात. त्यातून निचरा झालेले पाणी फिल्टर मीडियामधून खाली एकत्रित केले जाते.

क्रेटमध्ये जैवमाध्यमाच्या थरामध्ये नारळाच्या शेंड्यांचा (कोकोहस्क) वापर केला जातो. त्यात सोडलेल्या गांडुळांना ओलाव्यासाठी स्प्रिंकलरद्वारे सांडपाणी फवारले जाते. या फवारणीदरम्यान सांडपाण्यात हवेतील ऑक्सिजनही विरघळतो. त्यामुळे सांडपाण्यातील सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाचा वेग वाढतो.

या प्रक्रियेमधून बाहेर पडणारे पाणी ‘फिल्टर फीड टॅंक’ (Filter Feed tank)मध्ये साठवले जाते. तेथून ते पंपाने वाळूच्या गाळण टाकीमध्ये (प्रेशर सॅण्ड फिल्टर) व पुढे ॲक्टिव्हेटेड कार्बन फिल्टरमधून पास केले जाते. वाळूच्या गाळण यंत्रणेमध्ये सूक्ष्म कण काढले जातात, तर ॲक्टिव्हेटेड कार्बन फिल्टरमध्ये पाण्याला आलेला काळसर रंग व वास काढला जातो. शेवटी निर्जंतुकीकरणासाठी सोडिअम हायपोक्लोराइडचा डोस दिला जातो.

हे शुद्ध झालेले पाणी शेती आणि बागांमध्ये वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. सांडपाण्याच्या क्षमतेनुसार क्रेटची संख्या व ते ठेवण्यासाठी जागेचे क्षेत्रफळ ठरवावे लागते. तसेच या प्रक्रियेमध्ये पंपाने पाणी उपसून स्प्रिंकलरद्वारे फवारावे लागत असल्याने काही प्रमाणात यांत्रिक ऊर्जा व वीज वापरावी लागते.

हा थोडासा खर्च मिळणाऱ्या गांडूळ खताच्या विक्रीतून माघारी मिळू शकतो. पण मिळणारे शेतीयोग्य शुद्ध पाणी मोलाचे असून, त्यातून पिकांच्या उत्पादनात वाढ होते, हे महत्त्वाचे!

या प्रकारची यंत्रणा पुण्यातील गोल्फ क्लब, येरवडा येथे बसवली आहे. तिथे २.५ कोटी रुपये खर्चून १० लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. त्याचा देखभाल दुरुस्ती खर्च महिन्याला १.२० लाख इतका आहे.

या पाण्याचा वापर गोल्फ क्लबमधील झाडे व हिरवळीसाठी वापरले जाते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांतील १४ गावांमध्ये अशी यंत्रणा कार्यरत आहे. आणखी १२२ गावांत प्रगतिपथावर असल्याचे समजते. म्हणजेच या गावातील सांडपाणी आता शुद्ध होण्यास सुरुवात होणार आहे.

डकविड सांडपाणी प्रक्रिया

डकविड म्हणजे टिकली गवत. पाण्यात बारीक हिरव्या टिकल्या टिकल्या दिसतात. हे बदकांना खूप आवडत असल्यामुळे त्याचे नाव पडले डकविड. या डकविडच्या मदतीने सांडपाणी शुद्धीकरणाचा एक प्रकल्प २०१४-१५ मध्ये उत्तर प्रदेशात रायबरेली जिल्ह्यात ‘आवळा’ गावाजवळ उभा करण्यात आला. येथे इफ्को ( IFFCO) या प्रसिद्ध कंपनीचा खत बनवण्याचा कारखाना आहे.

कारखान्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक छोटे शहरच (टाउनशिप) वसलेले आहे. या वसाहतीच्या सांडपाण्याचे प्रमाण प्रतिदिन ३० लाख लिटर इतके आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी कंपनीने पूजा तेंडुलकर यांची मदत घेतली.

त्यांनी या मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या सांडपाण्यावर डकविडची प्रक्रिया केली. त्यासाठी टाउनशिपच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी छोटे कालवे (चॅनेल्स) बनवलेले असून, त्यात सांडपाणी ठिकठिकाणी अडवलेले आहे. या शांत झालेल्या पाण्यामध्ये डकविड वाढवले जाते.

डकविड वाढीचा वेग खूपच अधिक असतो. हे वाढलेले डकविड दर काही टप्प्याने पाण्याबाहेर काढले जाते. ते म्हशींचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे आवळा गावातील म्हशींना खाऊ घातले जाते. ॲझोलाप्रमाणेच या खाद्यामुळे म्हशींचे दूध आणि त्याची स्निग्धताही वाढली. सांडपाण्यावरील डकविडच्या प्रक्रियेमुळे पाणी स्वच्छ राहू लागले. दुर्गंधी व डास पूर्णपणे नष्ट झाले. त्या पाण्याचा वापर काही प्रमाणात स्वच्छता, काही बाग व झाडे यांना वापरून उरलेले नदीत सोडले जाते.

डकविडविषयी अधिक माहिती

पाण्यावर आडवे पसरत त्याची वाढ होते. मुळे खाली पाण्यात तीन ते चार इंचापर्यंत वाढतात. याचा वाढीचा वेग खूपच जास्त असतो. आता बायोमासच्या भाषेत सांगायचे झाले, तर ५० ग्रॅम बायोमासचे दोन-तीन दिवसांत शंभर ग्रॅम इतके बायोमास तयार होते.

याच्या एकूण वजनाच्या प्रमाणात ३० ते ४० टक्के प्रोटिन्स असतात. ही प्रोटिन्स जनावरे व माणसे खाऊ शकतात. मुख्य म्हणजे या डकविडच्या मुळावर व पानावर वाढणारे विशिष्ट प्रकारचे जिवाणू हे सांडपाण्यातील विविध विद्राव्य व अविद्राव्य घटकांचे विघटन करतात.

आपल्या अन्नात व बायोमासमध्ये रूपांतरित करते. यामुळे पाण्यातील विद्राव्य व अविद्राव्य घटक कमी कमी होत जातात. पाण्यातील हे घटक कमी झाल्याने हळूहळू ऑक्सिजन विरघळण्याचे प्रमाण वाढते. ऑक्सिजनचे योग्य प्रमाण होताच पाणी अधिक जिवंत होऊ लागते. म्हणजेच पाण्यात जीवसृष्टी वाढू शकेल अशी स्थिती निर्माण होते.

डकविडच्या काही जाती असून, त्यानुसार विद्राव्य आणि अविद्राव्य घटकांच्या विघटनाची क्षमता कमी अधिक असते. पण तरीही खूप वेगाने वाढणारे आणि ताकदीने काम करून विघटनास अवघड असणाऱ्या रेणूंच्या साखळी तोडणाऱ्या हा छोटासा पाणयोद्धाच आहे. कारण हे पाणगवत पाण्यातील प्रदूषणाची पातळी अचानक वाढली तरी त्याचा धक्का सहन करण्याइतके भक्कम असतात.

ते विघटित घटक डकविड मुळावाटे शोषून घेते. फक्त यांची मुळे वरच्या थरात वाढत असल्याने खोलवरच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात ते असमर्थ ठरतात. हीच या पद्धतीतील मर्यादा आहे. त्यामुळे हे सांडपाणी छोट्या छोट्या उथळ (कमी खोलीच्या) चरांमध्ये शांतपणे खेळवत न्यावे लागतात. या चरांच्या बांधकामाचा खर्च एकदाच होईल, तो केल्यानंतर हे दीर्घकाळ काम देत राहतात. सांडपाणी जीवशास्त्रीयदृष्ट्या शुद्ध होण्यासाठी चार दिवस लागतात.

डकविड पद्धत वापरलेली ठिकाणे - कात्रज डेअरी चिलिंग सेंटर, कोंढापुरी, पुणे; महाराष्ट्र शासनाचे आदिवासी कल्याण विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या काही आदिवासी रहिवासी शाळा; पुण्यातील केळकर समाधी; किवळे (जि. पुणे) येथील नाला पुनरुज्जीवन प्रकल्प इ.

सुधारित शोष खड्डे

ग्रामीण भागामध्ये सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्ड्यांची मोहीम एकेकाळी राबवली गेली होती. मात्र तिच्या देखभालीअभावी ती अनेक ठिकाणी बंद पडलेली आहे. त्यासाठी आता सुधारित शोषखड्ड्याची पद्धत अवलंबता येते. यातून सांडपाणी नियंत्रण आणि पाण्याची उपलब्धता वाढवणे हे दोन्ही हेतू साध्य होऊ शकतात.

शोषखड्ड्यामध्ये सांडपाणी जिरताना पाण्यात न विरघळलेले घटक जमिनीच्या, मातीच्या गाळणीत अडकतात. त्यांचे तिथेच वेगाने विघटनही होते, स्वच्छ झालेले पाणी जमिनीत जिरत जाते. शौचालयासहित घरातले सांडपाणी यात जिरवले जाऊ शकते. यामुळे गावातून गटारी वाहणे, त्यातील पाणी तुंबणे, त्याला दुर्गंधी येणे, डास व अन्य कीटकांची वाढ होणे आणि पर्यायाने रोगराईचे प्रमाण वाढणे अशा संभाव्य बाबींचा चांगलाच अटकाव होतो.

पाणी जमिनीत जिरत असल्याने भूजलात भर पडत जाते. मात्र शोष खड्डे हा पर्याय घरगुती सांडपाण्यासाठीच योग्य आहे. कारखान्यांचे व व्यावसायिक इमारतीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यासाठी हा पर्याय अजिबात वापरू नये.

२०१६-१७ या वर्षी भिगवण (जि. पुणे) या वीस हजार लोकसंख्येच्या गावात रोटरी क्लबने मोठा निधी उभारून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शोषखड्ड्याची मोहीम राबवली. गावात ६०० पेक्षा अधिक शोषखड्डे घेऊन ऐंशी टक्के गाव गटारमुक्त केले. या गटार मुक्तीमुळे डास व कीटक मुक्ती आणि त्यातून रोगराईवर मोठे नियंत्रण अशा अनेक गोष्टी साध्य झाल्या. त्याचबरोबर गावाला होत असलेल्या एकूण पाणीपुरवठ्याच्या साठ ते

सत्तर टक्के पाणी भूजलात भर पडत असल्याचे सरपंचांनी सांगितले. हे तंत्रज्ञाना फार काही अवघड नाही. खड्डा खोदणीचा खर्च वगळता अन्य काही विशेष खर्चही नाही. यासाठी शासकीय अनुदानही उपलब्ध आहे.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT