Na. Dho. Mahanor Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : महानोर आणि आनंद यादव यांच्यात मैत्री होती का ?

Team Agrowon

Na. Dho. Mahanor : १९८४ मध्ये जळगावला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही मी गेलो होतो. आता मी कवितेनं पुरता झपाटलेला होतो. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उपस्थित राहणं हे मला आवश्यक झालेलं होतं. एक तर तिथं खूप काही ऐकायला, पाहायला मिळत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवी ती पुस्तकं विकत घेता येत होती.

या वेळी महानोर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झालेले होते. शंकराव खरात या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, मधुकरराव चौधरी स्वागताध्यक्ष होते. या संमेलनात मी महानोरांचे पावसाळी कविता आणि पळसखेडची गाणी ही दोन कवितेची पुस्तकं आणि शेतकरी दिंडी हे रोजनिशी पुस्तक घेतलं.

जशा महानोरांच्या गाण्याच्या टेप मी पुन्हा पुन्हा ऐकत होतो; तसा हा पुस्तकांचा ऐवजही मी पुन्हा पुन्हा वाचत होतो, जपत होतो. तो इकडे-तिकडे जाऊ नये म्हणून मी त्या चारही पुस्तकांना एकत्रित खास हार्डबाउंड बाइंडिंग करून घेतलं. त्यांची ही चार पुस्तकं मी कायम माझ्यासोबत ठेवायचो.

जळगाव साहित्य संमेलनाला गेल्याचा आणखी एक फायदा झाला, तिथं बहिणाबाईंचं जातं पाहण्यात आलं. ज्या जात्यावर बसून बहिणाबाईंना आपल्या सगळ्या कविता सुचल्या ते जातं तिथं पाहून मी खूप हरकून गेलो. शिवाय बहिणाबाईंविषयी आणखीही खूप काही तिथं पाहायला आणि ऐकायला मिळालं.

जळगाव साहित्य संमेलनातून आणलेलं महानोरांचं शेतकरी दिंडी हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ही शेतकरी दिंडी वेगळी आहे. कारण मी वसमत परिसरात १९८० पासून शेतकरी आंदोलनात सहभागी झालेलो होतो. ते शेतकरी आंदोलन शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचं होतं. मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो ते महाविद्यालय ज्यांनी सुरू केलं ते गंगाप्रसादजी अग्रवाल हे गांधीवादी, समाजवादी नेते होते.

त्यांनी शरद जोशींच्या पुस्तकांचा हिंदी अनुवाद करून शरद जोशींचे विचार देशभर पोहोचवलेले होते. मी गंगाप्रसादजींसोबत सेवादालाच्या उपक्रमात आणि पुढं त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी संघटनेच्या काही उपक्रमांतही सहभागी झालेलो होतो. सुरुवातीच्या काळात सगळी समाजवादी मंडळी शरद जोशींच्या सोबत होती. त्यामुळे माझ्यावर शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा प्रभाव होता. तर ना. धों. महानोर यांच्यावर काँग्रेसप्रणीत शरद पवारांनी काढलेल्या शेतकरी दिंडीचा प्रभाव होता.

आमची शेतकऱ्याकडं पाहण्याची वैचारिक दृष्टीच भिन्न आहे, हे माझ्या हळूहळू लक्षात येत गेलं. शेतकरी संघटनाच ते माझ्या लक्षात आणून देत होती. कारण संघटनेचे सर्वच वक्ते महानोरांच्या कवितेची चेष्टा करायचे. त्या वेळी मला वाईट वाटायचं. पण ते जे म्हणत होते ते त्यांच्या बाजूनं खरंही होतं. पण माझी मात्र गोची व्हायची. आतल्या आत कुचंबणाही व्हायची. कारण संघटनेचे लोक माझ्या कवितेला प्रचंड उचलून धरत होते.

पण त्यासाठी त्यांनी महानोरांच्या कवितेवर टीका करू नये, असं मला वाटायचं. परंतु आता मराठी वाङ्‍मयव्यवहाराला हे माहीत झालेलं होतं. तसा संदर्भ लोक सततच देत होते. मला मराठी कवितेत जागा मिळवून देण्यासाठी लोक महानोरांना त्यांच्या जागेवरून उठविण्याची उठाठेव करत होते. मला त्याची गरज वाटत नव्हती.

१९८४ मध्येच वसमतच्या काही कविता लिहिणाऱ्या आम्ही तरुणांनी प्रा. श्‍यामलाल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रातिनिधिक कवितासंग्रह काढायचा असं ठरवलं. वसुमती या नावानं तो कवितासंग्रह सिद्ध केला. प्रकाशासाठी महानोरांनी यावं असं आम्हाला खूप वाटत होतं. श्‍यामलालजींचे आणि त्यांचे घरगुती संबंध होते. महानोरांनी होकारही दिला. पण नोव्हेंबर १९८४ मध्ये यशवंतरावांचं अचानक निधन झालं.

महानोरांना आमच्या कार्यक्रमाला येता आलं नाही. त्यामुळं आम्हाला फार वाईट वाटलं. पण त्याच्या पुढच्याच वर्षी नांदेडच्या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी ते वसमतहून जात असताना आवर्जून श्‍यामलालजींना भेटून गेले. आमची सगळ्यांची आठवण काढली. तो प्रातिनिधिक कवितासंग्रह घेऊन गेले. तो वाचून त्यांनी श्‍यामलालजींना एक छानसं पत्रही लिहिलं.

सर्व कवींचं आणि आमच्या उपक्रमाचं कौतुक केलं. त्या वेळी आजच्यासारखी निरोप देण्यासाठी कुठली यंत्रणा नव्हती. त्यामुळं घाईत असलेले महानोर आले आहेत हे आम्हाला कळवणं श्‍यामलालजींना शक्य झालं नाही. त्याची आम्हाला खूप हुरहुर वाटली.

१९८५ चं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नांदेडला घ्यायचं असं ठरलं. महानोर साहित्य परिषदेचे आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होतेच. श्यामरावजी कदम संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. शंकर पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती. आम्हाला वसमतहून नांदेड खूपच जवळ. पण आता या वेळी मी नेमका औरंगाबादला शिकायला गेलेलो होतो.

तरीही या संमेलनासाठी तीन दिवस मी नांदेडला आलो. तीनही दिवस संमेलनातल्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे महानोरांची धावपळ सुरूच होती. दुरून आम्ही त्यांना पाहत होतो. एकदा जेवणाच्या मंडपात श्यामरावजी कदम आणि विजया राजाध्यक्ष बसलेले असताना महानोर तिथं आले.

विजया राजाध्यक्ष यांनी महानोरांकडं लाडिकपणे तक्रार केली, की वही या तुमच्या कवितासंग्रहाची नवी आवृत्ती तुम्ही मला दिली नाही. महानोर धावत पॉप्युलरच्या बुकस्टॉलवर गेले आणि ‘वही''च्या नव्या आवृत्तीच्या दोन प्रति घेऊन आले.

त्यांनी एकेक प्रत सही करून श्यामराव कदम आणि एक विजया राजाध्यक्ष यांना दिली. तेव्हा आमच्या लक्षात आलं, की मागच्या दोन संमेलनांत आम्हाला उपलब्ध न झालेला हा कवितासंग्रह आता नव्यानं छापून आलेला आहे. आम्ही लगेच पॉप्युलरच्या दुकानात गेलो आणि वही हा त्यांचा दुसरा कवितासंग्रहही घेऊन टाकला.

तो ग्रंथालयातून मिळवून वाचलाच होता. पण माझ्याकडं हक्काचा तो हवा असं मला वाटत होतं. नव्या संगणकीय अक्षर जुळणी पद्धतीनं छापला गेलेला मराठीतला तो पहिला कवितासंग्रह होता. पॉकेटबुक आकाराची त्याची निर्मिती ही खूपच छान होती. डेमी साइज वगळून वेगळ्या आकारात प्रकाशित झालेला देखील तो पहिला मराठी कविता संग्रह होता. नंतर अनेकांनी आकाराचे अनेक प्रयोग केले. त्याची सुरुवात कदाचित ‘वही’पासून झालेली असावी.

आधीच्या आवृत्तीत मुखपृष्ठावर नर्तिकेचं रेखाटन होतं. पण या नव्या आवृत्तीत निसर्गदृश्य होतं. दोन्ही मुखपृष्ठ पद्मा सहस्रबुद्धे यांचीच होती. पद्मा सहस्रबुद्धे असेपर्यंत महानोरांच्या सर्व पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांनीच केलेली होती.

अर्थात, गांधारी त्याला अपवाद होतं. गांधारी आणि गपसपची चित्र अनुक्रमे उत्तम क्षीरसागर आणि गणेश विसपुते यांनी केलेली आहेत. वही हा महानोरांचा छोटेखानी कवितासंग्रह मला कायमच आवडत आला. याच पुस्तकातल्या शेवटच्या कविता घेऊन लताबाईंनी हृदयनाथांना ‘माझ्या आजोळची गाणी’ करायला लावली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT