Pandharpuri Buffalo Agrowon
ॲग्रो विशेष

Buffalo Subsidy : ‘वारणा’ देणार म्हैस खरेदीसाठी ४२ हजार रुपयांचे अनुदान

Team Agrowon

Kolhapur News : जातीवंत म्हशीची पैदास होण्यासाठी मेहसाना व मुऱ्हा म्हशी वारणा दूध संघामार्फत खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर विक्रीचे केंद्र निर्माण केले जाणार आहे. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना ४२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली, असे केंद्र देशातील पहिलेच असल्याचे सांगून संघामार्फत दूध संघास ५९ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे सांगितले.

तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या ५६ व्या वार्षिक सभेत डॉ. कोरे बोलत होते. डॉ. कोरे म्हणाले, म्हैस व गाय दूधात प्रचंड तफावत असून म्हैस दुधाचेच उत्पादने बनवली जातात त्यामुळे वारणानगर येथील केंद्रावर सुमारे ४०० ते ५०० म्हशींचा गोठा तयार करण्यात येणार असून परराज्यातूंन मेहसाना व मुऱ्हा जातीच्या म्हशी संघामार्फत खरेदी केल्या जाणार आहेत.

यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च व होणारी फसवणूक टळणार आहे. तसेच वारणेच्या या विक्री केंद्रातून खरेदी केलेल्या म्हशीपोटी सुमारे ४२ हजारांचे अनुदान दिले जाईल. यापूर्वी दूध संस्था कमिशनमध्ये प्रतिलिटर ४० पैशांची वाढ केली आहे.

वारणाचे दूध भारतीय सैन्यदलात, आदिवासी समाजातील मुलांना सुगंधी दुधाचा पुरवठा, मेट्रो, शताब्दी, राजधानी एक्सप्रेस व वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेमध्ये वारणाची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असून मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दूधपुरवठा करण्याचे टेंडर मिळाल्याचे सांगून कोरे यांनी, रिलायन्स, डी मार्ट या मॉलच्या माध्यमातून १९ कोटींची विक्री झाल्याचे सांगितले. पुढील वर्षी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय सुरू होणार, असे सांगितले.

कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे यांना पद्मभूषण पुरस्कार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी कर्तृत्ववान महिला दूध उत्पादक पार्वती पाटील (माले), स्वाती जोशी (शिराळा), सारिका मोहीते (पोखले), उषा वगरे (माले), वर्षाराणी दशवंत (बिऊर), राणी मोहीते (घुणकी) आदींसह ४२ दूध संस्थांचा सत्कार झाला. येडूरकर यांनी अहवालवाचन केले. वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे आदींसह संचालक उपस्थित होते. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT