Tur Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Varieties: तूर उत्पादन वाढीसाठी वाण निवड महत्त्वाची

Tur Farming: तूर पिकाची पेरणी १५ जून ते १५ जुलै या दरम्यान करावी. जास्तीत जास्त ३० जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी. पेरणीस जसजसा उशीर होईल, तसे उत्पादनात घट येते. त्यामुळे वेळेत पेरणी पूर्ण करावी.

Team Agrowon

डॉ. विजयकुमार गावंडे, डॉ. दीपक पाटील

Tur Yield Advisory: तूर हे महत्त्वाचे कडधान्य पीक मुख्यत्वेकरून खरीप हंगामात घेतले जाते. राज्यात तुरीची सलग तसेच आंतरपीक म्हणून लागवड केली जाते. सध्या राज्यात आणि मुख्यतः विदर्भात लागवडीखाली असलेले बहुतेक वाण हे मध्यम लवकर आणि मध्यम ते उशिरा कालावधीचे आहेत.

या वाणांच्या लागवडीखाली सुमारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र येते. तूर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, बीजप्रक्रिया, रासायनिक खतांचा शिफारशीप्रमाणे वापर, वेळेवर आंतरमशागतीची कामे, संरक्षित ओलित, वेळेवर कीड-रोग, तण नियंत्रण या महत्त्वाच्या बाबींचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून उत्पादनात वाढ मिळविणे शक्य होईल.

पेरणीची वेळ

साधारणतः ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे फायदेशीर ठरते. साधारणपणे १५ जून ते १५ जुलै या दरम्यान तूर पेरणी करावी. जास्तीत जास्त ३० जुलैपर्यंत पेरणीची कामे पूर्ण करावीत. पेरणीस जसजसा उशीर होईल, तसे उत्पादनात घट येते. पेरणीस साधारण १५ दिवस विलंब झाल्यास उत्पादनात २५ ते २७ टक्के घट येते. तर ३० दिवस पेरणीस उशीर झाल्यास ५० ते ५८ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रति बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ते ५ ग्रॅम किलो याप्रमाणे चोळावे. यामुळे पेरणीनंतर जमिनीतील मूळकुजव्या रोगामुळे बियाण्याचे तसेच अंकुरलेल्या रोपांचे नुकसान टाळणे शक्य होते.

तुरीच्या बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू खते लावल्यास उत्पादनात साधारण १० ते २२ टक्के वाढ मिळते. त्याकरिता २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक गुळाच्या थंड द्रावणात मिश्रण करून प्रति १० ते १२ किलो बियाण्यास चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यास एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. त्यानंतर वरीलप्रमाणे जिवाणू संवर्धक बियाण्यास लावून बियाणे सावलीत सुकवावे आणि त्वरित पेरणी करावी. जिवाणू संवर्धक लावून झाल्यानंतर बियाण्यांची पुन्हा साठवणूक करू नये. प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया आणि त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी.

सुधारित वाण

अ) परिपक्वता कालावधीनुसार

वाणांचे वर्गीकरण

लवकर परिपक्व होणारे वाण : १६० दिवसांच्या आधी

मध्यम कालावधीचे वाण : १६१ ते १८० दिवस

उशिरा परिपक्व होणारे वाण : १८१ दिवसांपेक्षा अधिक

ब) जमीन आणि पर्जन्यमानाप्रमाणे वाणांची निवड

मध्यम जमीन तसेच मध्यम पर्जन्यमान असल्यास लवकर किंवा मध्यम कालावधीत तयार होणारे वाण : ए.के.टी. ८८११, आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती), आय.पी.ए.ई. १५-०६, फुले राजेश्‍वरी, बी.डी.एन. ७११, फुले तृप्ती, फुले पल्लवी.

मध्यम ते भारी जमीन आणि खात्रीचे पर्जन्यमान असल्यास मध्यम कालावधीचे वाण ः पी.डी.के.व्ही. आश्‍लेषा, पी.के.व्ही. तारा, विपुला, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, बी.डी.एन. ७०८, बी.डी.एन. ७१६, रेणुका, गोदावरी.

भारी जमीन तसेच खात्रीचे पर्जन्यमान असल्यास उशिरा तयार होणारे वाण ः आशा (आय.सी.पी.एल. ८७११९), पी.डी.के.व्ही. आश्‍लेषा किंवा वरील वाणांची लागवड करता येते.

क) पीक पद्धतीनुसार वाण निवड

दुबार पीक पद्धती : तूर पिकानंतर लगेच दुसरे पीक घ्यावयाचे असल्यास लवकर तयार होणारे वाण उदा. आय.पी.ए.ई. १५-०६, आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती) या वाणांची पेरणी करावी.

आंतरपीक : तूर पिकामध्ये साधारणपणे मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिके आंतरपीक म्हणून घेतली जातात. त्याकरिता मध्यम लवकर ते उशिरा तयार होणाऱ्या वाणांची निवड करणे योग्य ठरते.

खत व्यवस्थापन

तूर पिकास शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची योग्य मात्रा द्यावी. पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शिफारशीत खताची मात्रा वेगवेगळ्या खतांद्वारे जसे, ५० किलो युरिया, ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर किंवा १२५ किलो डाय अमोनिअम फॉस्फेट प्रति हेक्टर प्रमाणे देता येईल. माती परीक्षण अहवालानुसार आवश्यकता भासल्यास, २० ते २५ किलो गंधक तसेच १५ किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे.

आंतरमशागत

उगवण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एक किंवा दोन रोपे ठेवावीत.

तुरीचे पीक पेरणीनंतर सुरुवातीला अतिशय सावकाश वाढते. त्यामुळे पेरणीनंतर साधारण ६० ते ९० दिवस पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता कमीत कमी दोन वेळा निंदणी करावी.

तण नियंत्रण करण्यासाठी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिली कोळपणी कोळपणी करावी. त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात.

हेक्टरी बियाणे व लागवड पद्धत

तूर पिकाच्या विविध वाणांचे हेक्टरी बियाणे प्रमाण तसेच लागवड अंतर हे वेगवेगळे असते. खालील तक्त्यात लागवड पद्धतीनुसार वाणनिहाय बियाणे प्रमाण आणि लागवडीसाठी शिफारशीत अंतर दिले आहे.

जमिनीच्या प्रकारावर दोन ओळींतील किंवा दोन झाडांतील अंतर अवलंबून राहील. भारी व खोल जमीन असल्यास ओळींत तसेच झाडांतील अंतर जास्त ठेवावे. तर हलक्या जमिनीत अंतर कमी ठेवणे फायदेशीर आहे. पेरणीस जसजसा उशीर होईल तसतसे अंतर कमी करावे.

(लेखक डॉ. गावंडे हे कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ (तूर पैदास), तर डॉ. पाटील हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना येथे प्रमुख शास्त्रज्ञ (तूर पैदास) म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT