Agriculture Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Warehouse : साठवण, वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Warehouse Business : गोदाम व्यवसायात माहिती तंत्रज्ञानाचा आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’शी संबंधित उपकरणांचा उपयोग करून यशस्वी गोदाम व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने गोदामाची मालकी असणाऱ्या गोदामधारकांनी आणि गोदाम व्यवसायात कार्यरत यंत्रणांनी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा परिचय करून घेणे आवश्यक आहे. गोदाम व्यवसायात माहिती तंत्रज्ञान आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा वापर होणे अत्यावश्यक आहे.

त्यानुसार गोदाम क्षेत्रात कार्यरत विविध कंपन्या शेतकरी ते ग्राहक या पुरवठा साखळीत गोदाम व्यवस्थेचा उत्तम वापर करीत असल्याचे आपण मागील काही लेखात पाहिले. यापूर्वीच्या लेखात आपण काही प्रमाणात माहिती घेतली असून या प्रणालीचा उपयोग व महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे.

यापूर्वी आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग (RFID टॅग), वायरलेस बीकन्स प्रणाली, दरवाजा सुरक्षा अलार्म/ गजर यंत्रणा, तापमान सेन्सर, मोशन सेन्सर्स, स्मोक सेन्सर / डिटेक्टर, स्कॅनर, सीसीटीव्ही (क्लोज्ड सर्किट टीव्ही), टॅब्लेट / मोबाईल उपकरणे / मोबाईल थर्मल प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि आर्द्रता मापक (अद्वितीय APN सह) अशा विविध ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ शी निगडित उपकरणांची आपण माहिती घेतली. अशाच प्रकारे गोदाम व्यवस्थापनाशी निगडित विविध प्रकारचे तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे.

गोदाम व्यवस्थापन प्रणाली (GMS)

गोदाम व्यवस्थापन प्रणाली ही इतर तंत्रज्ञानाप्रमाणेच एक प्रणाली असून त्यामध्ये कोणत्या सुविधांचा समावेश होतो व त्यापासून गोदाम व्यवस्थापन कसे होऊ शकते हे पाहूयात.

गोदाम व्यवस्थापन प्रणालीमुळे गोदामाचे दार उघडणे व बंद करणे या क्रिया करताना त्यावर नियंत्रण ठेवता येते. त्यातून शेतीमालाची होणारी आवक व जावक याची योग्य व विश्वासार्ह नोंद ठेवता येते.

या प्रणालीत तापमान, आर्द्रता इत्यादीचे व्यवस्थापन करण्यासाठी सेन्सर्सची सोय करण्यात आलेली असल्याने गोदाम आणि गोदामात ठेवलेल्या शेतीमालातील आर्द्रता व तापमान यांची अचूक नोंद घेऊन योग्य त्या उपाययोजना करता येतात.

सीसीटीव्हीद्वारे शेतमालाच्या साठ्यावर पाळत ठेवणे, ठेवीदारांना शेतमालाच्या साठ्याची वेळेत माहिती पुरविणे अथवा शेतीमालाचा साठा सुस्थितीत आहे की नाही, हे रोजच्या रोज पाहणे, या बाबी या प्रणालीतील सीसीटीव्हीच्या सुविधेद्वारे प्राप्त होतात.

गोदाम पावती किंवा धान्य तारण प्रक्रियेचे स्वयं-चलन म्हणजेच मानवविरहित धान्य तारण प्रक्रियेची अंमलबजावणी फक्त गोदाम व्यवस्थापन प्रणालीद्वारे शक्य होऊ शकते.

गोदाम व्यवस्थापन प्रणालीमध्ये धान्याची पोती स्वयंचलितपणे मोजण्यासाठी आरएफआयडी (RFID) / वायरलेस बीकन्सची सुविधेची तरतूद करण्यात आली आहे. या सुविधेमुळे गोदामातील धान्याची सर्व पोती एकाच वेळेस अचूकपणे मोजता येतात. ही माहिती गोदाम व्यवस्थापन प्रणालीला पाठवून गोदामातील साठ्याचा व निधीचा अचूक ताळमेळ ठेवता येतो.

गोदामात धान्य ठेवणारा ठेवीदार अथवा शेतकरी अथवा व्यापारी संपूर्ण प्रणालीचे स्वत: कामकाज पाहू शकतो, ठेव व पैसे काढण्याची प्रक्रिया करू शकतो. या प्रणालीमुळे पारदर्शक व्यवहार करणे शक्य होऊ शकते

या प्रणालीत ठेवीदारासाठी ॲपची सुविधा उपलब्ध करता येते, जेणेकरून ठेवीदार, ग्राहक, गोदाम चालक अथवा मालक यांना सर्व व्यवहार अॅपद्वारे करता येऊ शकतात. तसेच वेअरहाऊस मॅनेजमेंट सिस्टम तंत्रज्ञान सॉफ्टवेअरद्वारे संगणकावरसुद्धा वापरता येते.

गोदाम व्यवस्थापन प्रणाली गोदामाला संपूर्ण सुरक्षा देण्याचे कार्य करते, गोदामाचे डिजिटायझेशन, वेळेत बचत करणे, गोदामातील विविध उपक्रमांची कार्यक्षमता वाढविणे, अचूक माहिती देण्यासाठी मदत इत्यादीसाठी सहकार्य करते.

गोदामात शेतीमाल आल्यापासून गोदाम पावती तयार होईपर्यंतची पारंपरिक कार्यपद्धती

ठेवीदाराबद्दलची संपूर्ण माहिती (KYD)नोंदविणे, करारपत्रावरील अटी शर्ती ठेवीदाराला समजावून देऊन साठवणूक शुल्काची पुष्टी करणे याचा समावेश होते. भौतिकरित्या गोळा केलेला ठेवीदाराचा तपशील आणि सर्व कागदपत्रांचे काम गोदाम पर्यवेक्षकाद्वारे ठराविक कागदपत्रांच्या ढाच्यानुसार हाताने केले जाते.

गोदामाच्या गेट रजिस्टरमध्ये सुरक्षारक्षकाद्वारे नोंद केल्यानंतर गोदाम परिसरात वाहनाचा प्रवेश होतो. शेतीमालाने भरलेल्या वाहनाचे वजनकाट्यावर वजन करण्यात येते. गोदामातील गुणवत्ता नियंत्रण कर्मचारी किंवा परीक्षक वजन केलेल्या मालाची गुणवत्ता तपासतो. साठवणूक योग्य शेतमाल असेल तर त्याच्या वर्गवारीनुसार शेतमाल स्वीकारला जातो.

गोदामातील गुणवत्ता नियंत्रण कर्मचारी किंवा परीक्षकाद्वारे गुणवत्तेचा अहवाल तयार केला जातो. गोदाम पर्यवेक्षकाद्वारे संपूर्ण गुणवत्ता अहवालाची माहिती हाताने नोंदवहीमधे प्रविष्ट केली जाते.

ट्रकमधून साठा उतरविण्यात येतो आणि गोदामात योग्य थप्पीनिहाय साठा केला जातो. गोदामातील पर्यवेक्षकांद्वारे साठा रजिस्टरमध्ये (स्टॉकवाइज रजिस्टर अथवा थप्पी निहाय नोंदवही) माहिती प्रविष्ट केली जाते.

रिकाम्या ट्रकचे पुन्हा वजनकाट्यावर वजन होते. ट्रकचा गेट पास तयार करून त्या गेट पासला वजनाची स्लीप जोडली जाते.

गेट रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर रिकामा ट्रक गेटमधून बाहेर पडतो, त्या वेळेस शेतीमालाची आवक पावती तयार करण्यात येते. गोदाम पर्यवेक्षकाद्वारे भौतिक रजिस्टर (गेट रजिस्टर) आणि (स्टॉक रजिस्टर) मध्ये हाताने माहिती प्रविष्ट केली जाते.

शेतीमालाची आवक झालेल्या शेतीमालाची नोंद ः

स्टॉक रजिस्टर/ साठा नोंदवही.

स्टॉकनिहाय रजिस्टर/ थप्पीनिहाय दर्जा आणि प्रमाण नोंदवही

ठेवीदार खाते नोंदवही.

स्टॉक कार्ड/ शेतमालाच्या थप्पीनिहाय नोंदीचे कार्ड आणि इतर रेकॉर्ड.

या सर्व माहितीचे संकलन व माहिती लिहिण्याचे कामकाज गोदाम पर्यवेक्षकाद्वारे स्वहस्ते नोंदवहीमध्ये केले जाते आणि सर्व नोंदीचे जतनसुद्धा नोंदवहीमध्ये केले जाते.

यानंतर शेतकरी अथवा व्यापारी यांना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर पावती पुस्तकाद्वारे गोदाम पावती तयार करून देणे. कर्जाची आवश्यकता असल्यास त्यानुसार बँकेशी निगडित प्रक्रिया राबविणे व कर्ज उपलब्ध करून देणे.

गोदाम पावती अथवा धान्य तारण योजना राबविणाऱ्या सर्व संस्था सद्यपरिस्थितीत वरील प्रमाणे प्रक्रिया करतात परंतु त्याचे डिजिटायझेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.

भारतातील कृषी क्षेत्राशी निगडित ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज'वर आधारित परिस्थिती

एनसीडीईक्स हे मान्यताप्राप्त गोदामांमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञान लागू करणारे जगातील पहिले कमोडिटी एक्स्चेंज आहे. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज लिमिटेड (NCDEX), भारतातील अग्रगण्य कमोडिटी एक्स्चेंजने कृषी क्षेत्राशी निगडित गोदामांमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाची अंमलबजावणी २० जुलै २०१६ रोजी सुरू केली. गोदामांमध्ये साठविलेल्या वस्तूंचा रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलद्वारे मागोवा घेतला जातो. शेतीमाल साठवणुकीबाबतची खरी माहिती उपलब्ध करून दिली जाते. यामुळे गोदामातील साठवणूक आणि शेतमालाचे वितरण याच्याशी निगडित गोदामचालकाच्या कामकाजाची कार्यक्षमता आणि ग्राहकांमधील विश्वासार्हता सुधारण्यास मदत होते.

एनसीडीईक्स हे जसे गोदामात आरएफआयडी (RFID) तंत्रज्ञान लागू करणारे जगातील पहिले कमोडिटी एक्स्चेंज बनले आहे, तसेच नॅशनल बल्क होल्डिंग कॉर्पोरेशन (NBHC) हे एनसीडीईक्सच्या खारा, बिकानेर, राजस्थान येथील एमव्ही अॅग्रो येथे आरएफआयडी तंत्रज्ञान सुरू करणारी एक्स्चेंजची पहिली वेअरहाऊस सेवापुरवठादार बनली. या प्रक्रियेअंतर्गत गोदामात प्रवेश करताना शेतमालाच्या प्रत्येक पिशवीला टॅग लावला जातो आणि शेतमालाच्या लॉटचा तपशील डिजिटल स्वरूपात संग्रहित केला जातो. आरएफआयडी टॅगमुळे माहितीचे स्वयंचलितपणे संकलन होते तसेच शेतमालाच्या पोत्यांची मालकी, शेतमाल ठेवीची तारीख, एक्स्चेंजचा वैधता कालावधी याची त्वरित आणि अचूक माहिती मिळते. यामुळे कर्मचारी वर्गावरील अवलंबित्व कमी होऊन वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.

गोदाम व्यवस्थापन प्रणालीची प्रमुख व सहाय्यक कार्ये

मध्यवर्ती गोदाम व्यवस्थापन प्रणाली.

क्लाउडवर आधारित यंत्रणा.

माहितीचे उत्तम व्यवस्थापन.

गोदामातील कामकाजाच्या गरजेवर आधारित तंत्रज्ञान.

आरएफआयडी आणि आरएफआयडी विरहित प्रणाली.

त्रिस्तरीय माहितीचे आकलन व व्यवस्थापन.

गोदामातील कामकाजाशी निगडित संदेश सूचना प्रणाली.

गोदाम पावती निगडित व्यवस्थापन प्रणाली.

शेतमाल तारण/ धान्य तारण/ गोदाम पावती/ वखार पावती व्यवस्थापन प्रणाली.

डिजिटल स्वरूपात गोदाम पावती.

आवश्यकतेनुसार संपार्श्विक व्यवस्थापन प्रणाली अथवा शेतमाल तारण व्यवस्थापन प्रणाली.

आरएफआयडी विरहित प्रणाली अँड्रॉइड मोबाईल फोनवर देखील वापरली जाऊ शकते.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०,

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT