Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : सोलापुरात तिप्पट कांदा आवक

सुदर्शन सुतार

Solapur News : कांद्यावरील निर्यातबंदीमुळे सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवकेत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.१५) पुन्हा कांद्याची तब्बल १५०० गाड्यांपर्यंत आवक झाली.

एकाचवेळी मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजाराच्या आवारात कांदा उतरायलाही जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी, सकाळी दहा वाजता सुरू होणारे लिलाव दुपारी दोननंतर सुरू झाले. शिवाय जादा आवकेमुळे सरासरी दरही पुन्हा २००० रुपयांच्या आतच राहिले.

बुधवारी (ता.१३) १०७७ गाड्यांपर्यंत आवक झाली. या कांद्याचे लिलाव, लोडिंग आणि अनलोडिंग करणे या कामासाठी जागा आणि वेळ मिळावा, यासाठी गुरुवारी (ता.१४) बाजार समितीने कांदा लिलावाला सुट्टी दिली. पण शुक्रवारी (ता.१५) पुन्हा तब्बल १५०० गाडयापर्यंत आवक झाली.

त्यामुळे बाजार समितीचे नियोजन कोलमडले. सकाळी दहा वाजता होणारे लिलाव सुरू व्हायला, दुपारी दोन वाजले. तब्बल चार तासांनी लिलाव लांबले. शिवाय दुपारपर्यंत कांद्याच्या गाड्या येतच राहिल्या. त्यामुळे वाढत्या आवकेमुळे कांद्याचा सरासरी दरही प्रतिक्विंटलला १८०० ते २००० रुपयांपर्यंत राहिला.

सोलापूर बाजार समितीत जिल्ह्यासह धाराशिव, सांगली, नगर, पुणे, बीड, लातूर जिल्ह्यातून कांदा येतो आहे. निर्यातबंदीपूर्वी केवळ ४०० ते ५०० गाड्यांपर्यंत असणारी आवक आता दुप्पट-तिप्पटपर्यंत पोचली आहे. राज्याच्या विविध भागांसह शेजारच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि विजयपूरमधूनही कांदा येतो आहे.

त्यामुळे आवक वाढते आहे. निर्यातबंदीमुळे दर आणखी पडतील, या धास्तीने शेतकरी कांदा बाजारात आणत आहेत. त्याचा फायदा खरेदीदार घेत आहेतच, पण त्यात बाजार समितीकडून एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या बाजारात येत आहेत, पण नियोजन होत नसल्याने एकदिवसाआड कांद्याचे लिलाव करण्यात येत आहेत. त्याचाही परिणाम थेट दरावर होत आहे.

हमालांच्या आंदोलनाचा परिणाम

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या गाड्यांची आवक वाढते आहे. त्यामुळे एकदिवसाआड लिलाव सुरू आहेत. पण तरीही त्याचा ताण हमालांवर येत आहे. परिणामी, हमालांनी हमाली वाढवून द्यावी, यासाठी गुरुवारी (ता.१४) रात्री कांदा न उतरण्याचा निर्णय घेतला.

आधीच वाढती आवक आणि पुन्हा हमालांचा बंद झाला तर मोठी समस्या निर्माण होईल, या विचाराने प्रशासनाने रात्रीच त्यांच्याशी चर्चेतून तोडगा काढत सध्याच्या हमालीत एक रुपया वाढवून देण्याचा निर्णय घेतला. पण हमालांच्या या पावित्र्यामुळेच शुक्रवारी लिलावाला उशीर झाल्याचे सांगण्यात आले.

आज, उद्या लिलावाला सट्टी

वाढत्या आवकेमुळे आता पुन्हा शनिवारी (ता.१६) कांदा लिलावाला सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय रविवारी (ता.१७) साप्ताहिक सुट्टी यामुळे सलग दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT