Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production:दर्जेदार कापूस उत्पादनात हेच ध्येय

हितेंद्र गिरासे यांचा पीक फेरपालटीवर भर आहे. कापसासाठी गव्हाचे बेवड उपयुक्त ठरला आहे. कापूस लागवडीपूर्वी एकरी चार ट्रॉली शेणखताची मात्रा देऊन जमीन भुसभुशीत करतात.

Team Agrowon

चंद्रकांत जाधव

तावखेडा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील हितेंद्र गुलाबसिंह गिरासे यांनी जमीन सुपीकता, एकात्मिक कीड-रोगनियंत्रण (Integrated Pest Management) आणि माती परीक्षणानुसार खतवापरावर भर देत एकरी दहा क्विंटल कापूस उत्पादनात (Cotton Production) सातत्य ठेवले आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनातून किफायतशीर नफा हे त्यांचे पीक व्यवस्थापनाचे सूत्र आहे.

तावखेडा शिवार (ता. शिंदखेडा, जि. धुळे) कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. या भागात काळी कसदार, मध्यम प्रकारची जमीन आहे. या गावातील प्रयोगशील शेतकरी हितेंद्र गिरासे यांच्याकडे १२ एकर कसदार जमीन आहे. दोन कूपनलिका, एक सालगडी, तीन गाई, दोन म्हशी आणि एक बैलजोडी त्यांच्याकडे आहे.

दरवर्षी त्यांच्याकडे सात ते आठ एकरात कापूस लागवड (Cotton Cultivation)असते. याचबरोबरीने तीन एकर शेती भाडेतत्वावर कसतात. हितेंद्र गिरासे पूर्वी पारंपरिक पद्धतीने कापसाची शेती कसायचे. खतांचा अनियंत्रित वापर यासोबत किडनियंत्रणावरही अधिकचा खर्च व्हायचा.

चार बाय चार फूट अंतरात कापूस लागवड केल्याने झाडांची कमी संख्या असायची. तसेच जात निवडही जमिनीच्या पोतानुसार न केल्याने उत्पादन कमी मिळायचे. एकरी पाच ते सहा क्विंटल एवढेच उत्पादन हाती यायचे. यातून किफायतशीर आर्थिक नफा होत नव्हता. त्यामुळे त्यांनी दूध संकलन व्यवसायाला सुरुवात केली.

कपाशी पीक व्यवस्थापनाची सूत्रेः

१) हितेंद्र गिरासे यांचा पीक फेरपालटीवर भर आहे. कापसासाठी गव्हाचे बेवड उपयुक्त ठरला आहे. कापूस लागवडीपूर्वी एकरी चार ट्रॉली शेणखताची मात्रा देऊन जमीन भुसभुशीत करतात.जमीन काळी कसदार असल्याने पीकवाढ चांगली होते. पिकात हवा खेळती राहावी, बोंडसड, बुरशीजन्य रोगाची समस्या अधिक भेडसावू नये तसेच दोन्ही बाजूने बैलजोडीकरवी आंतरमशागत करता यावी यासाठी चार बाय तीन फूट या अंतरात लागवड केली जाते.

२) जमिनीचा पोत लक्षात घेऊन दरवर्षी २ ते ५ जून या दरम्यान टप्प्याटप्प्याने सात ते आठ एकरात १६० ते १८० दिवसांत येणाऱ्या बीटी प्रकारच्या कापूस जातीची लागवड केली जाते. पाट पद्धतीने सिंचनावर त्यांचा भर आहे. जमीन काळी कसदार असल्याने वारंवार सिंचन करावे लागत नाही. पावसाळ्याच्या तोंडावर लागवड केल्याने अनेकदा दोनदा सिंचनानंतर पाऊस येतो.

एकात्मिक पद्धतीने कीडनियंत्रणावर भरः

१) कीडनियंत्रणासाठी शेती बांधावर आणि पिकामध्ये ठराविक अंतराने झेंडू, मका ज्वारीची लागवड करतात. यामुळे पक्षिथांबा तयार होऊन नैसर्गिक कीड नियंत्रणाला पूरक स्थिती तयार होते.

२) पिकात नांग्या भरताना कापूस बियाण्याऐवजी भेंडी, चवळी, गवार यांचा उपयोग करतात. यामुळे घरी भाजीपालाही उपलब्ध होतो, तसेच कीड नियंत्रणालाही मदत होते.

३) पीक ४५ ते ५५ दिवसांचे असतानाच दोन आंतरमशागती पूर्ण केल्यानंतर एकरी नऊ पिवळे चिकट सापळे आणि तीन निळे चिकट सापळे लावतात. या सापळ्यांच्यामुळे रसशोषक किडींचे नियंत्रण करता येते. तसेच गुलाबी बोंड अळी नियंत्रणासंबंधी एकरी आठ कामगंध सापळे लावले जातात. दर २१ दिवसांत त्यातील ल्यूर बदलतात. सापळा पिके तसेच चिकट सापळ्यांच्या वापरामुळे किमान एक रासायनिक कीडनाशकाची फवारणी वाचते, असा त्यांचा अनुभव आहे.

४) कीड नियंत्रणासाठी सौरऊर्जेवर कार्यरत लाइट ट्रॅप लावतात. अलीकडे जैविक कीडनियंत्रणासंबंधी ट्रायकोकार्डचा वापर त्यांनी सुरू केला आहे.

५) ठरावीक कालावधीत पिकावर दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते.

६) गुलाबी बोंड अळीनियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी घेतली जाते. कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिफारशीनुसार रासायनिक कीडनाशकांच्या वापरावर भर आहे.

खतांचा संतुलित वापरः

१) जमीन आरोग्यपत्रिकेच्या शिफारशीनुसार पिकाला रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. त्यामुळे खतांचा अनावश्यक वापरही थांबला आहे.

२) फवारणीतून अन्नद्रव्यांची उपलब्धता केली जाते. पहिली फवारणी ४५ ते ५० दिवसांत, दुसरी फवारणी ७५ दिवसांत आणि तिसरी फवारणी ९० दिवसांत घेतली जाते. शिफारशीनुसार दोनदा एनपीके आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते.

कापूस वेचणीः

१) कापूस वेचणी करताना कापडी पिशव्यांचा वापर केला जातो. या पिशवीत कापूस धागा गुणवत्ता टिकून राहते. प्लॅस्टिकच्या गोण्या किंवा पिशव्यांत कापूस वेचणी करून घरी आणला किंवा साठविल्यास धाग्याची गुणवत्ता ढासळते, असा हितेंद्र यांचा अनुभव आहे.

पऱ्हाटीची विल्हेवाटः

गिरासे कापूस लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात करतात. पुढे डिसेंबरमध्ये कपाशी काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतात मेंढ्या सोडल्या जातात. त्यानंतर राहिलेल्या पऱ्हाट्या रोटाव्हेटर मारून जमिनीत मिसळल्या जातात. यामुळे जमिनीत सेंद्रिय घटक वाढतात. त्यानंतर पीक फेरपालटीसाठी हरभरा, गहू लागवड केली जाते. जमीन सुपीकतेकडे त्यांचे लक्ष आहे. घरी जनावरे असल्याने पुरेसे शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे दरवर्षी जमिनीत शेणखत मिसळले जाते.

‘केव्हीके‘ने घडविला बदलः

धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राने तावखेडा येथे एक वर्ष राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कापूस पिकासंबंधी प्रकल्प राबविला. यामध्ये शेतकऱ्यांना जात निवडीपासून ते गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे मिळवायचे याबाबत वर्षभर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, शास्त्रज्ञ (कृषिविद्या) जगदीश काथेपुरी, शास्त्रज्ञ (पीक संरक्षण) डॉ. पंकज पाटील, विषय विशेषज्ञ आतिष पाटील यांनी हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांशी सतत संपर्क ठेवला. या उपक्रमात गावातील कापूस उत्पादकांसह हितेंद्र यांनीही हिरिरीने सहभाग घेत पीक व्यवस्थापन पद्धतीत बदल केला.

कापूस उत्पादनामध्ये सातत्यः

मागील चार वर्षांपासून कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्ती येत आहे. अशा स्थितीतही गिरासे यांनी कापूस उत्पादन एकरी १० क्विंटलचे सातत्य कायम ठेवले आहे. लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन त्यांना मिळते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी एकरी १५ क्विंटल उत्पादन साध्य केले होते.

मागील हंगामात मात्र अतिपावसाने नुकसान झाले. जमीन काळी कसदार असल्याने नुकसानीची पातळी सतत वाढली. कारण वाफसा स्थिती होत नव्हती. त्यामुळे एकरी सात क्विंटल उत्पादन मिळाले. गिरासे यांना एकरी १८ ते २० हजार रुपये खर्च येतो. अलीकडे मजूरटंचाई वाढली आहे. तसेच खते, कीडनाशक आदींचे दरही वधारले आहेत. यामुळे उत्पादन खर्चात चार ते पाच टक्के वाढ झाली आहे. यावर मात करत दरवर्षी एकरी १० क्विंटल उत्पादनाचे लक्ष ते गाठतात.

कापसाची विक्री खेतिया (मध्य प्रदेश) येथील बाजारात करतात. यासाठी क्विंटलमागे १०० रुपये वाहतूक खर्च येतो. तेथे खुल्या बाजारानुसार किंवा बाजारातील प्रचलित दरानुसार जाहीर लिलाव होतात. यामुळे चांगले दर मिळतात. मागील वर्षी प्रति क्विंटल कमाल १० हजार रुपये दर मिळाला. काही वेळेस गावातही चांगले दर मिळाल्यास कापसाची विक्री होते. मागील तीन वर्षे कापसाला गुणवत्तेमुळे प्रति क्विंटल सरासरी दर सहा ते सात हजार रुपये असा दर त्यांना मिळाला आहे.

संपर्कः हितेंद्र गिरासे, ९४२१६१६०७१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT