Washim News : सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विदर्भातील विविध संघटनांनी अनेक प्रश्नांबाबत आवाज उठवला होता. त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्यांचा विशेष मुद्दा होता.
परंतु सत्ताधाऱ्यांनी या सर्व प्रश्नांना बगल देत, केवळ कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनबाबत थातूरमातूर चर्चा केली. या सर्व घडामोडीवर विरोधी पक्ष पाहिजे तेवढा आक्रमक होताना दिसला नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकार उदासीन तर विरोधी पक्ष अस्तित्वहीन असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. त्यांनी वाढती महागाई, शेतीमालाला भाव, वेगळा विदर्भ, पीकविमा, दुष्काळी परिस्थिती आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आदी मुद्द्यांना हात घालत याबाबत राज्य सरकारकडे कुठलीही विशेष ध्येयधोरण नसल्याचे नमूद केले.
तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष सरकारला कुठल्याही ठोस मुद्द्यावर कोंडीत पकडण्यात सपशेल अपयशी ठरले असून, राज्यातील विरोधी पक्षच अस्तित्वहीन असल्याची टीकादेखील त्यांनी केली. विरोधकांच्या एकंदरीत हालचालीवरून सत्ताधारी व विरोधक यांची मिलीभगत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावून घेण्याची हीच योग्य वेळ असून, त्याबाबत संबंधित संघटनांनी आक्रमकपणे आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करावा, असे आवाहनदेखील ॲड. आंबेडकर यांनी या वेळी केले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बोलताना ते म्हणाले, की पीकविम्याची अग्रिम रक्कम मंजूर केल्याची घोषणा केली.
मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात सदर रक्कम अद्याप जमा झाली नाही. अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीकविम्याची रक्कम मिळालीच नाही हे वास्तव आहे. अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी पोटतिडकेने करीत आहेत.
परंतु याबाबत राज्य सरकार उदासीन असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. या वेळी त्यांच्यासोबत महिला राष्ट्रीय अध्यक्षा अंजली आंबेडकर, अरूंधती शिरसाट, किरण गिऱ्हे, ज्योती इंगळे, सोनाजी इंगळे, अनिल गरकळ, सय्यद अकील भाई आदींची उपस्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.