Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : राज्य सरकार शिवद्रोही

Team Agrowon

Mumbai News : राज्यातील सरकारच्या नसानसांत शिवद्रोह ठासून भरला आहे. त्यामुळे या सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी एक सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते गेले असता तेथे माजी मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

उद्धव ठाकरे म्हणाले, की राज्य सरकार पुतळाप्रकरणी गुन्हा दाखल करू, असे सांगत आहे. याचा अर्थ असा, की गुन्हा दाखल झाला आहे, हे सरकारला मान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले याचा अर्थही असाच आहे, की पंतप्रधानांचाही संबंध आहे. जो कार्यक्रम केला तो पुरेसा बोलका आहे. आता नौदलावर सर्व काही टाकले जात आहे. मात्र नौदल समुद्राच्या तुफानाशी खेळते.

तेथील संकटांशी सामना करून ते देशाला वाचवतात. आता राज्य सरकार नौदलावर जबाबदारी टाकून मोकळे होत आहे. ज्या शिल्पकारने हा पुतळा बनवला त्या शिल्पकाराला कोणताही अनुभव नाही. समुद्रकिनारी पुतळा बसवताना काय खबरदारी घ्यावी, वारे, समुद्राच्या लाटांचा काय परिणाम होईल, याची सगळी माहिती आवश्यक असते. मात्र तशी खबरदारी घेतलेली नाही. ३००-४०० वर्षांपूर्वी शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही व्यवस्थित आहेत.

या सरकारची शिवद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही प्रतिमा अधिक उघड होत चालली आहे. या सरकारला छत्रपतींबद्दल आदर नाही. राज्यपाल कोश्यारी यांनीही छत्रपतींचा अपमान केला होता. तरीदेखील पंतप्रधान मोदी यांनी त्यांना हटविले नव्हते. म्हणजेच यांच्या नसानसांत शिवद्रोह ठासून भरला आहे. हा शिवद्रोह महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन आम्ही करणार आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

कामात भ्रष्टाचार : शरद पवार

शरद पवार म्हणाले, की महाराष्ट्रात कुठेही पुतळा उभा करायचा असेल तर राज्य सरकारची त्यास परवानगी लागते. पुतळा उद्‌घाटनाला पंतप्रधान गेले होते. यात आम्ही कुठलेही राजकारण आणत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाने एका मुलीवर अत्याचार केले तेव्हा त्यांनी त्याचे हातपाय कापले होते. त्यांनी कृतीतून दाखवून दिले होते, की भगिनींवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत. छत्रपतींचा पुतळा समुद्रकिनारी उभारला. या कामात जो भ्रष्टाचार झाला, त्यामुळे पुतळा उद्ध्वस्त झाला, तेथे स्वत: पंतप्रधान जाऊन आले असतील तर भ्रष्टाचार कुठल्या टोकाला पोहोचला आहे हे लक्षात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Production : सोयाबीन उत्पादन घटणार

Electricity Bill : सरसकट शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी

Nuksan Bharpai : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५४८ कोटींवर निधीची गरज

Land Dispute : कोट्यवधींच्या सरकारी जमिनीची परस्‍पर विक्री

Diesel Smuggling : समुद्रात खुलेआम डिझेल तस्‍करी

SCROLL FOR NEXT