Herbicides Use Agrowon
ॲग्रो विशेष

Herbicides Safety : तणनाशकांचा सुरक्षित वापर महत्त्वाचा...

Crop Management : सध्या राज्यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मका, ऊस व अन्य महत्त्वाच्या पिकांत निवडक रासायनिक तणनाशकांचा वापर केला जात आहे. मात्र तणनाशकांचा वापर करताना तांत्रिक ज्ञान, फवारणीची पद्धती याचे ज्ञान घेऊन योग्य पद्धतीने व सुरक्षितपणे वापर करण्याची आवश्यकता आहे.

डॉ. संजय काकडे

डॉ. संजय काकडे

Herbicides Spraying Methods : कोणत्याही पिकामध्ये तणाचे नियंत्रण हे एक मोठे काम असते. खुरपणीसाठी मजुरांची उपलब्धताच होत नसल्याने शेतकरी सर्वसामान्यपणे पारंपरिक कोळपणी, निंदणी, उन्हाळी नांगरटी व अशा इतर मशागतीय पद्धतीने तणनियंत्रण करत असतो. मात्र या परंपरागत पद्धतीने तण व्यवस्थापन पूर्णतः शक्य होत नाही. परिणामी, सध्या शेतकऱ्यांचा कल रासायनिक तणनाशकांच्या वापराकडे वळला आहे. ते शेतकऱ्यांना सोईस्करही ठरत असल्याने त्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे.

राज्यामध्ये बहुतांश सर्व पिकांमध्ये तणनाशकांची वापर वाढत असून, त्यांच्या सुरक्षित वापराच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तणनाशकांचा योग्य पद्धतीने व शिफारशीत योग्य मात्रेत वापर करणे गरजेचे असते. शिफारशीपेक्षा कमी प्रमाणात वापर केल्यास तणांचे योग्य नियंत्रण मिळत नाही. शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात वापर केल्यास पिकांना इजा होणे, तणनाशकांचे अवशेष जमिनीमध्ये दीर्घकाळ राहणे या समस्या उद्‌भवतात.

सुरक्षित तणनाशक वापरातील महत्त्वाच्या बाबी

पिकानुसार तणनाशक निवड : साधारणतः विविध पिकांमध्ये निवडक तण नाशकाचा वापर केल्यास मुख्य पिकास कोणत्याही प्रकारची हानी अथवा इजा न होता तणांचे परिणामकारक नियंत्रण शक्य होते. कारण या निवडक तणनाशकामधील क्रियाशील घटकांसाठी ती पिके प्रतिकारक असतात. त्यामुळे विविध पिकांतील तणनाशकांसाठीचे लेबल क्लेम व शिफारशीनुसार उगवणपूर्व किंवा उगवणपश्‍चात वापर करावा.

योग्य प्रमाण : तणनाशकांचा शिफारशीत प्रमाणातच वापर करावा. त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशी जाणून घ्याव्यात. तणनाशकासोबत मिळालेले लेबल किंवा बाटलीवरील माहिती वाचून त्यातील क्रियाशील घटकांचे प्रमाण व वापरासंबंधी जाणून घ्यावे. स्वतःच्या मनाने कमी किंवा अधिक प्रमाणात वापर करू नये.

तणनाशक फवारणीसाठी पाण्याचे योग्य प्रमाण : तणनाशकाच्या प्रभावी वापरासाठी हेक्टरी पाण्याचे योग्य प्रमाण वापरणे खूप महत्त्वाचे असते. साधारणतः जमिनीवर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या उगवणपूर्व तणनाशकासाठी हेक्टरी ६०० ते ७०० लिटर पाणी वापरावे. तर उगवणपश्चात तणनाशकाच्या फवारणीसाठी हेक्टरी ५०० लिटर पाणी वापरावे.

तणनाशके वापरण्याच्या योग्य पद्धती ः तणनाशकाच्या सुरक्षित वापरामध्ये योग्य पद्धतींचा वापर करणे गरजेचे असते. संपूर्ण क्षेत्रावर सम प्रमाणात फवारणी करण्याची पद्धती बहुतांश वेळा वापरली जाते. पट्टा पद्धतीमध्ये तणनाशकाची फवारणी केवळ पेरलेल्या किंवा लागवड केलेल्या पिकांच्या ओळीमध्ये करतात. पिकांच्या दोन ओळींतील तणांच्या नियंत्रणासाठी संचालित उपचार पद्धतीचा उपयोग केला जातो. सुरक्षित फवारणी पद्धत आर्थिकदृष्ट्या अधिक मूल्य असणाऱ्या पिकामध्ये तणनाशक फवारणी सुरक्षित फवारणी पद्धतीचा अवलंब केला जातो. ही पिके धातू किंवा प्लॅस्टिकच्या आवरणाने आच्छादित करून नंतर तणनाशकाची फवारणी केली जाते. संरक्षित कवच लावूनसुद्धा तणनाशक मुख्य पिकावर पडणार नाही, याची काळजी घेऊन पिकांच्या दोन ओळींमध्ये जमिनीवर व तणांवर फवारले जाते.

योग्य नोझलचा वापर : तणनाशकाच्या सुरक्षित व प्रभावी वापरासाठी फ्लड जेट नोझल किंवा फ्लॅट फॅन नोझलचा वापर करावा. असे नोझल कमी दाबावर सम प्रमाणात फवारा उडवतात. संरक्षित कवच किंवा हूड लावावे.

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी

पिकासाठी निवडक तणनाशकाच्या डब्यावरील लेबल नीट वाचून घ्यावे. त्या लेबलवर संबंधित पिकाचे नाव असले पाहिजे. अन्यथा, तणनाशकाचा वापर त्या पिकासाठी करू नये.

विद्यापीठ, संशोधन केंद्राच्या शिफारशींचा आधार घ्यावा. शिफारशीत तणनाशकेच मात्रेत व दिलेल्या वेळी अचूकपणे वापरावीत.

तणनाशक फवारणीसाठी शक्यतो वेगळा (स्वतंत्र) नॅपसॅक पंप वापरावा. अगदीच वेगळा पंप वापरणे शक्य नसल्यास फवारणीनंतर पंप २ ते ३ वेळा साबण / डिटर्जंटने स्वच्छ धुऊन पुढील कामांसाठी वापरावा. तणनाशकाच्या फवारणीसाठी पॉवर स्प्रेचा वापर करू नये.

उगवणपूर्व तणनाशक मारण्यापूर्वी जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत आणि पुरेशी ओलसर असावी.

फवारणीकरिता स्वच्छ पाणी वापरावे. अस्वच्छ, गढूळ, जड पाण्याचा वापर टाळावा. त्यामुळे तणनाशकाचा प्रभाव कमी होऊ शकतो.

उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी नेहमी वारा शांत असताना व स्वच्छ सूर्यप्रकाशात करावी. ढगाळ वातावरणात फवारणी करणे टाळावे. हवामान अंदाज पाहून फवारणीनंतर किमान ३ ते ४ तास पाऊस येणार नसल्याची खात्री करावी.

उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. तणांचे किंवा पिकांच्या बियांचे अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये.

कडक उन्हात उगवण पश्‍चात तणनाशकाची फवारणी टाळावी.

उगवणपश्‍चात तणनाशकाचा वापर तणांच्या जोमदार वाढीच्या (२-४ पानांच्या अवस्थेत) अवस्थेत करावा.

फवारणीवेळी तणनाशक तळाशी साचून राहू नये म्हणून द्रावण अधून मधून ढवळत राहावे. उगवणपूर्व तणनाशक फवारताना उलटे चालत यावे. म्हणजे फवारलेले शेत तुडवले जाणार नाही. किमान पुढील १२ ते १५ दिवस कोणतीही आंतरमशागत करू नये.

ग्लायफोसेटसारखे बिन निवडक तणनाशक फवारल्यानंतर किमान २ आठवडे शेतात कोणतीही मशागत करू नये.

ज्या पंपाद्वारे २,४-डी या तणनाशकाची फवारणी अन्य तृणधान्य पिकात केली असल्यास तो पंप कपाशीमध्ये तणनाशकाच्या फवारणीसाठी वापरू नये.

तणनाशकाचा फवारा इतर (स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतातील) पिकांवर उडणार नाही, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे.

तणनाशकाचे शिल्लक राहिलेले द्रावण कोणत्याही पिकाच्या जमिनीत, पाण्याचे डबके किंवा अन्य वाहत्या पाण्यात टाकू नये.

तणनाशके फवारताना अन्नसेवन व धूम्रपान करू नये. तसेच पान, तंबाखू, सुपारी खाणे टाळावे. फवारणी करतेवेळी सर्व सुरक्षा साधने उदा. कपडे, हातमोजे व अन्य वापरावीत.

तणांमध्ये तणनाशकांप्रति प्रतिकारशक्ती निर्माण होऊ नये, यासाठी एकाच तणनाशकांचा सातत्याने वापर टाळावा. तणनाशकाचा क्रमवार, आलटून पालटून व अन्य तण व्यवस्थापन पद्धतींच्या जोडीने वापर करावा.

तणनाशक फवारलेल्या जमिनीत दरवर्षी चांगल्या कुजलेल्या शेणखत, कंपोस्ट खत अथवा गांडूळ खतांचा भरपूर वापर करावा.

Chart

‘२,४ डी’ या तणनाशकाचा वापर करताना घ्यावयाची काळजी

पुढील हंगामात कपाशीची लागवड करणार असाल तर आधीच्या हंगामातही त्या शेतात २,४ डी तणनाशकाचा वापर करू नये. कारण या तणनाशकाची सूक्ष्ममात्राही पिकासाठी हानिकारक ठरते.

२,४ डी तणनाशकाची फवारणी वारा शांत असताना व आसपासच्या पिकांवर त्यांचे अवशेष जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

२,४ डी फवारणी केलेल्या शेतामधून पाणी वाहून येणार नाही, हे पाहावे, या तणनाशक फवारणीसाठी वापरलेला पंप अन्य फवारणीसाठी वापरू नये.

कपाशी पिकाच्या आसपास २,४ डी हे तणनाशक अजिबात फवारू नये.

बियाणे विक्रेत्यांनी तणनाशक आणि कापूस बियाणे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT