Vegetables Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Residue Free : बाजार व्यवस्था रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबल होणार

मराठवाड्याच्या आजनी (ता. बिलोली. जि. नांदेड) गावातील शेतकरी कुटुंबात राहून गोविंद हांडे मराठवाडा कृषी विद्यापीठातून पदवीधर बनले. कीटकशास्त्रात कृषी पदव्युत्तर पदवी मिळवत स्पर्धा परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य कृषी सेवेतून कृषी खात्यात गुणनियंत्रण निरीक्षकपदी रुजू झाले. अन्न सुरक्षितता, कीडनाशकांचे उर्वरित अंश आणि निर्यात याच क्षेत्रात त्यांनी २५ वर्षे सेवा केली. त्यांना मराठवाडा मित्र मंडळाने ‘जीवनगौरव’, तर शासनाचा ‘कृषिसेवारत्न’ मिळाला आहे. निवृत्तीनंतरही ते सेवाभावी वृत्तीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

गोविंद हांडे

“आमचा शेतीमाल रेसिड्यू फ्री (Residue Free Agriculture Produce) आणि टेसेबलदेखील आहे,” असे नाशिक, सांगली, पुणे भागातील प्रयोगशील शेतकरी अभिमानाने सांगत असतात. कारण निर्यातक्षम शेतीमाल (Exportable Agriculture Produce) ते पिकवतात. ते काळाची पावले ओळखून शेती पद्धतीत बदल करतात आणि विदेशी बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण माल विकण्याचा प्रयत्न करतात.

जागतिक बाजारात आता रेसिड्यू फ्री म्हणजेच कीडनाशकाच्या उर्वरित अंशाची कमाल पातळी सांभाळून पिकवला जाणारा शेतीमाल विकला जातो. हा शेतीमाल ट्रेसेबल असतो. ट्रेसेबल म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यातील खरी माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देणारी प्रणाली होय. सध्या रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबिलिटीची सुविधा असलेला शेतीमाल फक्त जागतिक बाजारासाठी पिकवला जात आहे. थोड्या फार फरकाने देशी बाजारातील काही मॉल्सदेखील रेसिड्यू फ्री व ट्रेसेबल शेतीमाल विकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

माझ्या मते येत्या एक-दोन दशकांत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात मिळणारा शेतीमाल विषयुक्त नसेल. कोणत्याही शेतीमालास रेसिड्यू फ्री व ट्रेसेबल असल्याशिवाय विकले जाणार नाही. कारण ग्राहकच तो घेणार नाही. कीडनाशके, खतांचा बेसुमार वापर झाल्याचे त्याचे परिणाम वसुंधरेप्रमाणेच मानवी शरीरावर देखील होत आहेत. त्यामुळे ग्राहक आता स्वतःहून रेसिड्यू फ्री अन्नपदार्थांकडे वळत आहेत.

भविष्यात हे प्रमाण वाढत जाईल. देशात सध्या ट्रेसिबिलिटीखाली तयार होणाऱ्या एकूण शेतीमालापैकी ८० टक्के महाराष्ट्राचा आहे. आज आपण ४२ प्रकारच्या भाजीपाल्यांच्या ट्रेसिबिलिटीच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशात चांगली क्रयशक्ती असलेल्या वर्गातील ३० टक्के ग्राहकांना आता विषमुक्त अन्न हवं आहे. त्यामुळे ते पैसा मोजायला तयार आहेत. हेच प्रमाण आणखी वाढणार आहे.

भविष्यात भारतीय ग्राहक सुरक्षित अन्न व विषमुक्त शेतीमालाला प्राधान्य देतील. त्यासाठी ते जादा पैसे मोजतील. दुसऱ्या बाजूला कीड-रोगावर नियंत्रण घालण्यासाठी घातक कीडनाशके वापरू नयेत, याकरिता जगभर सध्या तयार होत असलेला दबाव आणखी तीव्र होईल. वातावरण, पशुपक्षी तसेच मानवी शरीरांना अपायकारक ठरणाऱ्या अतिघातक रासायनिक उत्पादनांच्या वापराला विरोध होत जाईल. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षितता धोरणदेखील भविष्यात अधिकाधिक प्रगल्भ व मानवी आरोग्याची काळजी घेणारे असेल.

परिणामी, आपल्याला आठवडी बाजारात मिळणारी भाजीपाला, फळेदेखील रेसिड्यू फ्री आणि ट्रेसिबिलिटीची सुविधा असलेलीच ठेवावी लागतील. कारण जमाना तसा येईल. देशात कर्करोगाचे रुग्ण वाढलेले आहेत. कीडनाशके व रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे भविष्यात ‘एफएसएसएआय’ची (भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण) नियमावलीआणखी बळकट होत जाईल.

शेतीमाल असो की दुग्धजन्य पदार्थ; त्यातील कीडनाशकांचे अंश किंवा भेसळ याची काटेकोर तपासणी करणारी पद्धत भविष्यात लागू होईलच; पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. त्यामुळे आपण स्वतः शेतकरी म्हणून उच्च गुणवत्तेची व रेसिड्यू फ्री उत्पादने देणारी शेती करायला हवी. मी सध्या महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी मंडळाचा राज्य सल्लागार म्हणून काम सांभाळत आहे.

त्यामुळे निर्यातदार किंवा प्रयोगशील शेतकऱ्यांशी माझा जळवून संबंध येतो. ते जिद्दी आणि कष्टाळू आहे. कोणत्या दर्जाचे उत्पादन दिल्यास जास्त पैसे मिळतील हे एकदा शेतकऱ्यांना समजावून सांगितले, की खडकातदेखील रेसिड्यू फ्री पिकवून दाखवतील. आपल्याकडील शेतकरी वर्गाची जिद्द, निर्यातदारांचा अभ्यास, साधनसामग्रीमधील वैविध्यता इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे. त्याचा लाभ आता प्रत्येक शेतकऱ्याने मिळवायला हवा.

अर्थात, हे नेमकं कसं साधायचं हे समजावून सांगणारी व्यवस्था पुढील दशकात तयार होईल. कारण केंद्राच्या पातळीवर सध्या सुरू असलेल्या सुधारणा व त्यासाठी होत असलेला पाठपुरावा मला आशादायक वाटतो. भारत एक दिवस जगाची ‘फ्रूट्‍स, ग्रेन्स, व्हिजिटेबल्स बास्केट’ होणार हे निश्‍चित! त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने कसून अभ्यास करायला हवा. जास्तीत जास्त शेतात थांबावे आणि देशी व विदेशी बाजारपेठांचा अभ्यास करीत गुणवत्तापूर्ण शेतीमाल तयार करावा आणि परवडते त्याच किमतीत विकून प्रगती साधावी. राज्य शासनाची यंत्रणा सदैव तुमच्या सोबत आहे.

(शब्दांकन ः मनोज कापडे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT