Amravati News : संततधार पावसाच्या परिणामी पाणी शेतात साचले तर काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून सर्वेक्षणाअंती लो आणि नो लॉस असा शब्दप्रयोग करीत शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवण्याची खेळी खेळण्यात आली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शिरखेड महसूल मंडलातील शेतकऱ्यांनी या संदर्भाने मोर्शी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे त्यानुसार, २२ जुलै व त्यापूर्वी १९ जुलै रोजी शिरखेड महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यामुळे शेतातून पाणी वाहून जाणे किंवा जमा होणे अशी परिस्थिती होती. अतिरिक्त पाऊस, दमट व ढगाळ वातावरण या कारणामुळे पिकाला सूर्यप्रकाश मिळाला नाही.
त्याचा परिणामी झाडांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया अपेक्षितरीत्या पार पडली नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. या विषयी तक्रार केल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून सर्वेक्षणाची प्रक्रिया झाली. या वेळी त्याने नो-लॉस असा शब्दप्रयोग करीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याची खेळी खेळली आहे.
काही शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळेल, यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीने प्रयत्न केले. ३ हेक्टर विमा संरक्षित असताना बाधित क्षेत्र केवळ ०.२० आर (२० टक्के) इतकेच दर्शविण्यात आले. विमा संरक्षित क्षेत्र कमी असो किंवा जास्त बाधित क्षेत्र व टक्केवारी बहुतांश सारखीच दाखविण्यावर कंपनीकडून भर देण्यात आला आहे.
त्यामुळे नुकसान क्षेत्र अधिक असताना कमी भरपाई मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या संदर्भाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील श्री. राठोड यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली. सोबतच विमा प्रतिनिधीलाही फोनवरून माहिती देण्यात आली. परंतु त्याची कोणतीच दखल संबंधितांकडून घेण्यात आली नाही, असा आरोप आहे.
शेतकरी विजय तट्टे, संजय तट्टे, प्रल्हाद देशमुख, जितेंद्र तट्टे, रामराव गोरे, छाया देशमुख, निर्मला तट्टे, अरविंद तट्टे, धनंजय तट्टे, वंदना तट्टे, निखिल तट्टे, माला तट्टे, सुरेंद्र तट्टे, सुदर्शन देशमुख, जयप्रकाश देशमुख, नित्यानंद देशमुख यांनी तक्रार केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.