Pune News: सिंहगड पर्वतरांगेतील हरणी नावाच्या प्रसिद्ध गायीचा बाळंतपणात मृत्यू झाला. या घटनेनंतर हरणीच्या मालकासह वाडीतील शेतकरी कुटुंबीयांमध्ये आपल्याच घरातील सदस्य कायमचा निघून गेल्याची भावना आहे. हरणीला साडीचोळी अर्पण करीत शेवटचा निरोप देण्यात आला असून, दशक्रिया विधीदेखील केला गेला.
वाईचे शेतकरी योगेश देशमुख यांच्या गोठ्यात एक खिलार जातीची देशी गाय होती. मात्र गोठा बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर या गायीचे काय करायचे, असा प्रश्न उद्भवला. त्यामुळे शेतकरी हनुमंत विठ्ठल भोंडेकर व त्यांच्या पत्नी लक्ष्मी भोंडेकर यांनी जणू काही गायीला दत्तक घेत आपल्या शेतावर आणले. सिंहगडाजवळील अतकरवाडीच्या रानात ही गाय पांढरी शुभ्र, चपळ गाय ‘हरणी’ नावाने शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाली.
तिची सारे जण घरच्या सदस्यासारखे काळजी घेत असत. तिला मुलांचा लळा असल्याने गावची मुले हरणीच्या अंगाखांद्यावर खेळत. पहिल्या बाळंतपणाला हरणीचे अंग बाहेर आले. त्यामुळे कासाविस झालेल्या भोंडेकर कुटुंबाने चार तास झुंज देत हरणी व तिच्या बाळाला वाचविले. या घटनेची कहाणी ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध होताच राज्यभरातून ५०० हून अधिक वाचकांनी भोंडेकर कुटुंबाशी संपर्क करीत त्यांचे अभिनंदन केले होते.
हरणीचे दुसरे बाळांतपण मात्र घातक ठरले. कारण तिचे अंग पुन्हा बाहेर आले. तिला वाचविण्यासाठी भोंडेकर कुटुंबाने मोठी झुंज दिली. परंतु सुंदर कालवडीला जन्म देत हरणीने जागीच प्राण सोडले. यामुळे भोंडेकर कुटुंबीयांसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या कुटुंबाने रानात स्वतः मोठा खड्डा खणून मिठामध्ये हरणीला पुरले. या वेळी तिला साडीचोळी अर्पण करण्यात आली.
‘हरणीच्या मृत्यूमुळे घरातील सुहासिनी गेल्यासारखे आम्हाला वाटते आहे. त्यामुळेच आम्ही तिला साडीचोळी अर्पण केली. तिचा दशक्रिया विधीदेखील आम्ही केला.’ असे श्री. भोंडेकर यांनी सांगितले. हरणीचे बाळ आता सुखरूप आहे. ते खट्याळ असून त्याला वेळेवर खाऊपिऊ घालण्यात आता सारा शेतकरी परिवार गुंतून पडला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.