Interaction with Yogesh Kumbhejkar, Managing Director of Mahabeej:
महाबीजची सुरुवात कशी झाली?
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना कंपनी अधिनियमन १९५६ च्या अन्वये २८ एप्रिल १९७६ रोजी करण्यात आली. जागतिक बँकेच्या आर्थिक साह्याने राष्ट्रीय बियाणे प्रकल्पांतर्गत ही कंपनी सुरू करण्यात आली. सुरुवातीस महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम हा अकोला, बुलडाणा, परभणी व नांदेड या चार जिल्ह्यांमध्येच राबविण्यात येत होता. नंतर महामंडळाचा हळूहळू विस्तार झाला. आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये महामंडळाकडून विविध पिके/वाणांचा विभागनिहाय बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येतो.
या पन्नास वर्षांच्या काळातील कोणते टप्पे महत्त्वाचे ठरले?
सन १९९० च्या दशकामध्ये कापूस बियाण्यास तंतुविरहित करण्याकरिता त्या काळातील अद्ययावत ड्राय गॅस डिलिंटिंग तंत्रज्ञान असलेले बीज प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. महामंडळाने राष्ट्रीय बियाणे प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात आपल्या अद्ययावत बीज प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आठ लाख क्विंटल साठवणूक क्षमतेची गोदामे उभी केली. याशिवाय शास्त्रोक्त पद्धतीने साठवणुकीकरिता सौर ऊर्जाचलित, आर्द्रताविरहित वातानुकूलित गोदामांची उभारणी करण्यात आली.
बीज प्रक्रिया केंद्रावर सौर ऊर्जा स्रोतांचा उपयोग सुरू करण्यात आला. याशिवाय आणखी काही महत्त्वाचे टप्पे सांगता येतील. वर्ष २०१४ मध्ये बी.टी. तंत्रज्ञान महामंडळास मिळाले. तर २०००-२००१ मध्ये आघारकर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध सोयाबीन वाणांचे पैदासकार बियाणे महाबीजने तयार करण्याबाबत करार करण्यात आला. त्याच प्रमाणे महामंडळाने केंद्र शासनाच्या सीड ट्रेसेबिलिटीसाठी निर्मित साथी पोर्टलद्वारे देशात सर्वात जास्त बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यास २०२३ च्या खरीप हंगामापासून सुरुवात केली. महामंडळास राष्ट्रीय उत्पादकता विषयक विविध पुरस्कार १६ वेळा प्राप्त झाले आहेत.
महाबीजची पुढील दिशा काय असेल?
सद्यःस्थितीत महामंडळाकडे मूग, उडीद, तूर, ज्वारी, मका, बाजरी, सूर्यफूल, संकरित कपाशी, संकरित भेंडी, संकरित चोपडा दोडका, शिरी दोडका, भोपळा इत्यादी पिकांमध्ये स्वत: संशोधित केलेले वाण उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात महाबीज संकरित मका, संकरित भाजीपाला, चारा पिके आणि बीटी कपाशीमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या व शेतकरीभिमुख वाणांच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देणार आहे.
कोणकोणत्या बियाण्यांमध्ये महाबीज आघाडीवर आहे?
महाबीजची राज्यातील बियाणे बाजारात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. महाबीजचा राज्यातील प्रमुख पिकांत मोठा विक्री वाटा आहे. उदा. सोयाबीन ४५ टक्के, हरभरा ६५ ते ७० टक्के, गहू ६५ टक्के, सुधारित ज्वारी ८० ते ८५ टक्के, कडधान्य ४५ टक्के, धान/भात ३५ ते ४० टक्के, हिरवळीचे खत पिके ८० ते ९० टक्के, चारापिके ६५ ते ७० टक्के इत्यादी. त्यामुळे महाबीजच्या बियाण्यांच्या किमती काय राहतात, त्याचा संपूर्ण बियाणे बाजारावर सकारात्मक परिणाम होतो.
महाबीजमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी कोणते उपाय केले जातात?
गुणवत्ता नियंत्रण विभागांतर्गत कार्यरत दक्षता पथकामार्फत बीजोत्पादन, प्रक्रिया, साठवणूक व विपणन या सर्व स्तरांवर बियाण्यांची गुणवत्ता तपासण्यात येते. बियाण्यांची उगवणशक्ती, जोम, भौतिक व अनुवंशिक शुद्धता यांना महाबीजच्या गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये सर्वोच्च प्राधान्य आहे.
मूलत: सोयाबीन बियाणे हे अतिशय संवेदनक्षम, नाजूक व साठवणुकीच्या बाबतीत नाशिवंत असल्यामुळे त्याची गुणवत्ता राखण्यासाठी धुरीकरण व धुरळीकरणासह प्रत्येक स्तरावर विशेष काळजी घेण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यासोबतच विशेष खबरदारी म्हणून प्रमाणित बियाण्याच्या प्रत्येक लॉटची क्षेत्रीय उगवण चाचणी घेण्यात येऊन या चाचणीमध्ये पात्र बियाणेच विपणनाकरिता उपलब्ध होते. महामंडळाचे गुणवत्ता विषयक कार्य भारतीय तसेच ISTA चे मानक व परीक्षण पद्धतीनुसार चालते. महामंडळाच्या अकोला, परभणी व जालना येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा शासन अधिसूचित असून National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories ची मानांकन प्रक्रिया सुरू आहे.
शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो?
- शेतकऱ्यांचे आजही पहिले प्राधान्य महामंडळाच्या प्रमाणित बियाण्यांनाच असते. राज्यातील शेतकऱ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळेच महामंडळाने ५० व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. महामंडळाचे खरेदी धोरण हे अतिशय पारदर्शक आहे. बीजोत्पादन कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वीच खरेदी धोरण व अग्रीम तसेच कच्चे बियाणे तपासणी धोरण सुनिश्चित केले जाते. तसेच प्राधान्यक्रमाने आगाऊ आरक्षणानुसारच बीजोत्पादन कार्यक्रम आवंटित केला जातो. इतक्या वर्षांनंतर आजही महाबीजचे बियाणे संपल्यानंतरच इतर कंपन्यांच्या बियाण्यांची विक्री होते. शेतकरी पहिल्यांदा महामंडळाचेच बियाणे मागतात याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचा महाबीजवर असलेला विश्वास म्हणता येईल.
बाजारातील स्पर्धा व बदलत्या हवामानाचे महाबीजवर काही परिणाम होत आहेत का?
निश्चितच. बाजारातील स्पर्धा व बदलत्या हवामानाचे महाबीजवर सुद्धा परिणाम होत आहेत. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणाऱ्या वाणांची यादी जास्त वेगाने बदलते आहे. मात्र महाबीज या बदलांना सामोरे जाण्यास सज्ज आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि वेळोवेळी उपाययोजना करत आम्ही या स्पर्धेत यशस्वीपणे टिकून आहोत. महामंडळाचा पन्नास वर्षांचा प्रवास म्हणजे केवळ एक इतिहास नव्हे तर एक विश्वासाचं बियाणं अशी ओळख निर्माण करणारा आहे. महाबीजने आपल्या गुणवत्ता, नावीन्य आणि शेतकरी-केंद्रित दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मनात आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली. पुढील काळातही महाबीज आपली भूमिका अधिक बळकट करीत शेतीच्या विकासाला चालना देईल, यात शंका नाही.
आजच्या काळात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर महाबीज काय उपाय करते?
आज रोजी राज्यातील शेतकऱ्यांपुढील सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे बियाण्यांच्या किमती आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास मिळणारा बाजारभाव हेच आहे. त्यासाठी महामंडळ राज्यातील शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यास बियाणे खरेदी खर्चाचा आर्थिक भार कमी होण्यास निश्चितच मदत होते. त्याचबरोबर बाजारपेठेत ज्या नवनवीन पिकांमधून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो त्या पिकांच्या वाणांचे बियाणे उपलब्ध करण्यावर महाबीजचा भर असतो.
संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रमात महाबीजचे योगदान कसे आहे?
हवामान बदल व राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अधिक उत्पादनशील संकरित आणि सुधारित वाण विकसित करण्याचे संशोधनात्मक कार्य महाबीजमार्फत सुरू आहे. त्याला केंद्र शासनाच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभाग, नवी दिल्ली यांची मान्यता आहे. महामंडळाचे संशोधन कार्य प्रामुख्याने संकरित बीटी कापूस, संकरित ज्वारी, संकरित मका, तूर, मूग, उडीद, हरभरा व संकरित भाजीपाला या पिकांवर केंद्रित आहे. जैविक उत्पादनांच्या वापरामुळे नैसर्गिक संतुलन व जैवविविधता टिकून राहते. पर्यावरण व मानवी आरोग्य यांचा विचार करता जैविक उत्पादनांचे महत्त्व वाढत आहे. सद्यःस्थितीत महाबीजमार्फत गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आणि द्रवरूप जैविक खते यामध्ये विशेषत: जैविक संघ महाजैविक (रायझोबियम/ॲझोटोबॅक्टर, पीएसबी व केएमबी) आणि पिके (पीएसबी + केएमबी) तसेच ट्रायकोडर्मा यांच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.