Effects on Water : बदलत्या हवामानाचे पाण्यावरील परिणाम

Article by Satish Khade : बदलत्या हवामानाचे पाण्यावरील परिणाम कोणते होतात? कशाप्रकारे होतात याबद्दलची माहिती पाहुयात.
Climate Change
Climate ChangeAgrowon

सतीश खाडे

Effects of a Changing Climate on water : हवामान बदल (किंवा ग्लोबल वॉर्मिंग) हा सतत कानावर पडून पडून गांभीर्यच हरवून गेलेला शब्द. आपल्याला माहिती आहे, असे वाटणाऱ्यालाही ‘पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तापमान दीड ते दोन अंशांनी तापमान वाढणार आहे’ यापेक्षा फार माहिती नसते. सर्वसामान्यांना वाटते, ‘‘त्यात एवढं काळजीचं कारण काय?’’ थोडी अधिक माहिती असणारे म्हणतात,

‘‘ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रातील अनेक बेटे बुडतील. किनाऱ्यावरची गावे, शहरे उदा. मुंबई, कोलकाता बुडतील. कारण काय तर ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्रात वाढलेले पाणी.’’ साधा खिळा तर बोचलाय, असे वाटत असतानाच त्याचे गॅंग्रीन होऊन, हळूहळू अवयवभर पसरावे. उपाय करायलाही संधी न मिळता मृत्युशय्येवर पोहोचावे. होय, असेच काहीसे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल दुर्दैवाने घडत आहे.

तापमान सरासरी दीड ते दोन अंशांनी वाढणार, याचा खरा अर्थ समजून घेऊ. एका बाजूला ध्रुवीय प्रदेशातील तापमान -४० ते -५० अंशांपर्यंत असते, तर वाळवंटामधील तापमान ५५ अंशांपर्यंत पोहोचते. या दोन्हींच्या सरासरीच्या दीड अंशाने वाढ होणार आहे, हे लक्षात घेतले त्याचे गांभीर्य आपल्याला कळू शकेल. या हवामानातील बदलाचे पाण्यावर नेमके काय आणि कसे परीणाम होतील, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

पावसावरील परिणाम

साधारणपणे पाऊस कसा पडतो, हे आपल्याला माहिती असते. पाण्याचे बाष्प होते, त्यातून ढग तयार होतात. वाऱ्यांमुळे ढग वाहून नेले जातात. अनुकूल परिस्थिती येताच त्यातून पाऊस पडतो. तापमान वाढत असल्याचा पहिला परिणाम बाष्प निर्मिती त्याच प्रमाणात वाढणार. हवेत वाढलेले धुळीचे सूक्ष्मकण, विविध वायू यांच्यामुळे हवेतील आर्द्रतेचे केंद्रीकरण वाढत आहे.

परिणामी, थेंब बनण्याच्या प्रक्रियेत बदल होऊन थेंबांचा आकार हा वाढत जातो. थेंबांचे वजन लवकर वाढते. ढगातून थेंब खाली एका जागी जास्त प्रमाणात आल्यामुळे अतिवृष्टीची उदाहरणे वारंवार घडताना दिसत आहेत. पावसाच्या ढगांच्या प्रवासातील अनियमितता खूप वाढत चालली आहे. याला कारण वाऱ्यांच्या दिशा भरकटत आहेत. लाखो वर्षांपासून वाऱ्यांचे प्रवासचक्र एका नियमित क्रमाने फिरत असते.

कारण त्या वेळी वाऱ्यांची निर्मिती आणि प्रवास हा जमीन व समुद्राच्या तापमान फरकावरच अवलंबून होता. या तापमानासाठीचा कारक संबंध फक्त सूर्याशी जोडलेला होता. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेल्या कारखाने व रस्त्यावरील वाहनांच्या धुरातून अनेक प्रकारचे वायू हवेत मिसळत आहेत. त्यांचा प्रभाव पृथ्वीवरील तापमानावर पडत आहे. त्यातही गेल्या ५० ते १०० वर्षांत या प्रभावाचा वेग खूप जास्त आहे.

Climate Change
Climate Change : तापमानातील बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम

दोन ठिकाणच्या तापमान फरकामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. म्हणजे एका ठिकाणची हवा तापल्याने तिची घनता कमी होत हलकी होते. ती वर जाते. तिथे झालेल्या मोकळ्या जागेत बाजूची हवा शिरकाव करते. यातूनच वारे वाहू लागतात. सध्या हवेचे तापमानही अनियमितपणे वाढत चालले आहे.

त्यामुळे हवेच्या व पर्यायाने ढगांच्या प्रवासातील अनियमितता वाढत आहे. अवर्षण आणि अतिवृष्टी यांची वारंवारिता आणि तीव्रता वाढत असल्याची प्रचिती जगभरात येत आहे. तरी दोन टोकाची उदाहरणे मला इथे द्यावीशी वाटतात. कॅलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यात डोंगर आणि जंगल भरपूर असूनही, २००६ ते २०१७ ही अकरा वर्षे येथे दुष्काळ होता.

त्याउलट दुबईत हजारो चौरस किलोमीटर फक्त उजाड माळरान असतानाही तिथे काही चौरस किलोमीटर परिसरात गुडघाभर पाणी साचण्याइतका मोठा पाऊस झाला होता. आपल्याकडचे उदाहरण घ्यायचे तर तीन वर्षांपूर्वी एकाच वर्षात चार चक्रीवादळे भारतीय किनारपट्टीवर येऊन आदळली. दहा वर्षांतून कधीतरी एखाद्या वेळी घडणारी ढगफुटी १५ दिवसांत तीनदा झाली. अचानक आलेल्या महापुराने मोठे नुकसान केले.

सागरी पाणी आणि वायूंच्या चलनवलनावरील परिणाम

हवामान बदलाचे प्रमुख कारण म्हणजे हवेत वाढत असलेला कार्बन डायऑक्साइड, मिथेन व तत्सम वायू. हवेतील कर्बवायू जमिनीवरील वनस्पती शोषतात. त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात हा कर्बवायू पाण्यात शोषला जातो. पाण्यात विरघळलेला कर्बवायू पाण्यातील एकपेशीय जिवाणू, शेवाळांपासून वेगवेगळ्या समुद्री गवते, शैवाले (पाण्यातील जंगले) शोषून घेतात. जमिनीवरील वनस्पतींप्रमाणेच तिथेही प्राणवायूची निर्मिती होते.

त्यातील काही भाग पाण्यात विरघळतो, तर काही भाग हवेमध्ये येतो. हवेतील ऑक्सिजनपैकी या समुद्र जिवांनी पुरविलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ४०-६० टक्के असते. परंतु गेल्या काही दशकांपासून हवेतील कर्बवायूचे प्रमाण इतके वाढले आहे, की समुद्राची कर्बवायू शोषण्याची व विरघळण्याची क्षमता संपत चालली आहे. समुद्री वनस्पतींनी शोषूनही पाण्यात कर्बवायू शिल्लक राहत असल्याने त्याच्या आम्लतेमध्ये वाढ होत आहे. ही वाढती आम्लता एका टप्प्यानंतर समुद्री वनस्पती आणि जिवांसाठी धोकादायक ठरू शकते. कर्बवायू आणि प्राणवायूच्या साखळीमध्ये ते अत्यंत मोलाचे असून, त्यांचीच संख्या कमी होत गेली तर संपूर्ण समतोल बिघडण्याची शक्यता आहे. समुद्राची कर्बवायू शोषण्याची मर्यादा कमी होत जाऊन हवेतील त्याचे प्रमाण वाढेल. त्याचा परिणाम पुन्हा तापमान वाढीमध्ये होईल.

या परिस्थितीत भर पडते ती जमिनीवरील जलस्रोतांच्या प्रदूषणाची! पाणी प्रदूषण म्हटले की आपल्याला केवळ उद्योगांनी केलेले प्रदूषण आठवत असले तरी अगदी प्रत्येक घरही पाण्याचे प्रदूषण करण्यात आघाडीवर आहे. आपल्या घरगुती सांडपाण्यामध्ये विविध स्वच्छतेच्या नावाखाली असंख्य रसायने मिसळली जात आहे. हे सर्व पाणी नद्या, नाले खराब करत शेवटी समुद्रात पोहोचते. या प्रदूषणामुळे समुद्र किनाऱ्यालगतचे लाखो चौरस किलोमीटरपर्यंतचे पाणी प्रदूषित होत आहे. हे प्रदूषण इतके आहे, की या पाण्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनही राहिलेला नाही. परिणामी हे विभाग जीवविरहित होत चालले आहेत.

जमिनीतील आर्द्रतेवरील परिणाम

हवेच्या वाढत्या तापमानासोबत हवेतील आर्द्रतेसोबतच जमिनीची ओलही वेगाने कमी होते. तापमान वाढीमुळे पिकांच्या बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो, परिणामी, पिकांची पाण्याची मागणीही वाढते. पिकांना पाण्याचा ताण बसतो. जिथे संरक्षित सिंचनही करणे शक्य नाही, अशा जिरायती शेतीला मोठा फटका बसतो.

जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीतील वरच्या थरातील उपयुक्त सूक्ष्मजीव मरतात किंवा निष्क्रिय होतात. हे सूक्ष्मजीवच मुळांना जमिनीतील उपलब्ध करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असतात. प्रत्यक्ष तापमानातील वाढीसोबतच जमिनीतील कमी ओलावा आणि निष्क्रिय सूक्ष्मजीव या घटकांमुळेही पिकांची वाढ मंदावते. त्याचा अन्नधान्य निर्मितीवर विपरीत परिणाम होणार असून, अन्नसुरक्षेसाठी धोक्यात वाढ होणार आहे.

भूजलावरील परिणाम

वाढत्या तापमानामुळे पिकांना पाणी द्यायची वारंवारिता वाढणार आहे. थोडक्यात, पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर कमी करावे लागणार आहे. प्रत्येक पाळीमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक पाणी द्यावे लागेल. अशा प्रकारे सर्वत्र वाढीव पाणी देण्यासाठी भूजलाचा वापरही वाढेल. उपसा वाढल्याने भूजल पातळी खालावतच राहणार आहे. मुळात हवामान बदलाच्या परिणामामुळे पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल झालेले दिसतात.

त्यात अनियमिततेसोबतच कमी वेळात जास्त पाऊस ही स्थिती वारंवार दिसत आहे. पूर्वीसारख्या भीजपावसाचे प्रमाण कमी होत जाईल. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे. जास्त पावसामुळे पुराचे म्हणजेच पाणी वेगाने वाहून जाण्याचे प्रमाण वाढेल. भूजलामध्ये नैसर्गिकरीत्या पडणारी भर कमी होईल. म्हणजे एकाबाजूला भूजलाचा वापर वाढणार आहे, तर दुसरीकडे पुनर्भरण होणार नाही.

Climate Change
Climate Change : शेतीचे संक्रमणपर्व

बर्फ रूपातले पाणी

पृथ्वीवरील गोड्या पाण्याच्या मुख्य स्रोतांमध्ये बर्फ वितळून तयार होणार पाणी हे महत्त्वाचे आहे. तापमानातील वाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील व हिमालय तत्सम पर्वतावरील बर्फाच्या रूपात असलेले पाणी वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पाणी कोट्यवधी वर्षे तुलनेने अतिशुद्ध स्वरुपात साठून आहे. ते आपणच प्रदूषित करत चाललेल्या समुद्राला जाऊन मिळत आहे.

त्यातून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन किनाऱ्यालगतची शहरे किंवा बेटे पाण्यात बुडण्याचा धोका आहे. मात्र त्यासोबतच एक मोठा धोका म्हणजे सागरी किनाऱ्यालगत शहरांच्या कितीतरी पट अधिक जमीन, जी जंगलांनी व्यापलेली आहे, ती बुडणार आहे. खाऱ्या पाण्यामुळे ही झाडे मरून जातील. जंगल, त्यातील अन्नसाखळ्या उद्ध्वस्त होतील. या जंगलामुळे शोषला जाणारा कर्बवायू वातावरणात तसाच राहून पुढील तापमान वाढीचा दर वाढेल.

हिमालयातील बर्फ वितळून अनेक नद्यांचा उगम काही किलोमीटर अलीकडे आल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे. येत्या एक-दोन शतकांतच या बर्फांची वितळलेले पाणी घेऊन वाहणाऱ्या नद्या आटण्याची शक्यता वाढेल. भूतानमध्ये हा विशेष बदल लक्षात येत आहे. या बर्फाखाली दडलेले, सुप्तावस्थेत असलेले असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव (जिवाणू, विषाणू) वातावरणात येऊन त्यांच्या उद्रेकाच्या शक्यता वाढणार आहेत.

नद्यावरील परिणाम

कमी वेळात अधिक पाऊस, अतिवृष्टीमुळे महापूर येण्याचे प्रमाण वाढत जाणार आहे. पावसाच्या वाहत्या पण्यासोबत किंवा पुराच्या स्थितीमध्ये जमिनीचा सुपीक थर वाहून जातो. जमीन नापीक होते. काही भागांतील सततच्या अवर्षण आणि दीर्घ दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर बारमाही नद्या हंगामी होत शेवटी नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचणार आहेत. सुपीक जमिनीचे कमी होणारे प्रमाण, अवर्षण, दुष्काळ यामुळे शेतीवरील व लोकांच्या जगण्यावरील ताण वाढत असून स्थलांतराची समस्या वाढेल. अनेक ठिकाणी लोकांना गाव, प्रदेश तर काही ठिकाणी देशही सोडून बाहेर पडावे लागत आहे. येत्या पंधरा-वीस वर्षांत हवामान बदलांच्या एक किंवा अधिक घटकांच्या फटक्यामुळे जगातील

दोन तृतीयांश लोकसंख्या पीडीत असेल, असा दावा जागतिक संस्थांच्या अहवालातून पुढे येत आहेत.

नष्ट होणाऱ्या जलस्रोतातील जलचर, उभयचर सजीवांसोबतच वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होणार आहेत. नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. अन्नसाखळीतील मधले दुवे तुटल्याने अनेक अन्नसाखळी उद्ध्वस्त होत आहेत. पुरात वाहून जाणारी घरे, वाहने यांनी आपला जीव तुटतो. पण इथे जीवसृष्टीच नष्ट होत आहे, त्याकडे आपण कधी लक्ष देणार?

सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com