Climate change
Climate change agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदलतंय, आपणही बदलूया

विजय कोळेकर

Organic Curb : पाण्याइतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे जमिनीच्या आरोग्याचा आणि तिच्या सुपीकतेचा. पिकांच्या कमी उत्पादकतेच्या कारणांमध्ये जमिनीची सुपीकता म्हणजेच सेंद्रिय कर्ब कमी असणे हे प्रमुख कारण आहे.

शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेवरून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण समजते. सेंद्रिय कर्बामध्ये वाढ करण्यासाठीच्या उपायांबद्दल तांत्रिक माहिती घेऊन नियोजन करावे.

या उपायांमध्ये जमिनीची कमीत कमी हलवाहलव करणे, नांगरणी, कुळवणी, कोळपणी, वखरणी सारखी मशागतीची कामे थांबवणे, एकदाच बेड तयार करून त्यावर पिकांचे बियाणे टोकने, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा वापर करणे, पिकांची व तणांची मुळे जमिनीमध्ये ठेवून जाग्यावरच कुजू देणे आणि त्याच ठिकाणी पुढील पिकांचे बियाणे टोकून नवीन पीक घेणे या उपायांचा समावेश होतो.

अशी शून्य मशागत शेती पद्धती अवलंबल्यास शेतकऱ्यांचा बहुतांशी त्रास, काबाडकष्ट, वेळ आणि खर्च कमी होऊन चांगले उत्पादन मिळू शकते, याबाबत सविस्तर माहिती घेऊन नियोजन करावे. शून्य मशागतीद्वारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव घ्यावेत.

भातासाठी राब भाजणे, रोपे तयार करणे, नांगरणी, चिखलणी आणि लावणी ही कामे टाळून सगुणा रिजनरेटीव्ह तंत्राने (एसआरटी) भात लागवडीचे नियोजन करावे. मशागत थांबल्यामुळे जमिनीखालील भागात अनंत सूक्ष्मजीव आणि गांडुळे तयार होतात. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

जमिनीचा कठीण थर निघून जाऊन निचरा सुधारतो. पिकांचे पोषण आणखी सुधारण्यासाठी जैविक आणि सेंद्रिय खते वापरणे गरजेचे असल्याने अशी खते घरच्या घरी तयार करण्यासाठी महिला बचत गट आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. पिकांचे किडी-रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लिंबोळी अर्क तसेच जैविक व नैसर्गिक कीडनाशके गावातच तयार करण्याचे नियोजन करावे.

बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी आणि मजुरांच्या उपलब्धतेची व खर्चाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने शेतीच्या कामांसाठी आधुनिक यंत्रांचा वापर गरजेचा झाला आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे मशागतीसाठी यंत्रांची गरज नाही पण टोकन, फवारणी, पिकांची कापणी, मळणी अशा कामांसाठी लागणारी चांगली यंत्रे प्रत्येक गावामध्ये उपलब्ध करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीने औजारे बँक तयार करावी.

प्रत्येक औजारे बँकेमध्ये रुंद सारी वाफा (बीबीएफ) यंत्र, फेरोमन सापळे, फवारणी पंप, कापणी यंत्रे, मळणी यंत्रे जरूर ठेवावीत. पावसामध्ये खंड पडल्यास उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिके जगविण्यासाठी डिझेल इंजिन व तुषार संच अशी संरक्षित पाण्याची सेवा गटांनी सुरू केल्यास लहान शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सध्या फवारणीसाठी ड्रोन वापर वाढत असल्याने ज्या गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे तेथे शेतकरी कंपन्यांनी ड्रोन सेवा सुरू करावी.

शेतीच्या नियोजनामध्ये आपत्कालीन नियोजन आणि जोखीम व्यवस्थापनदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्याचा अत्यंत लहरी हवामानात शेतीमधील जोखीम वाढत चालली आहे. चालू वर्षी मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने खरिपामध्ये दोन प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पहिली म्हणजे पावसाला उशिरा सुरुवात आणि दुसरी म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पावसात पडणारा खंड. या दोन्ही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी गावामध्ये काही निर्णय सामूहिकरीत्या घेणे गरजेचे आहे.

यामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर म्हणजे जमिनीमध्ये ६५ मिमी ओलावा असल्यानंतर पेरणी करणे, धूळवाफ पेरणी टाळणे, दुबार पेरणीचे संकट आल्यास त्यासाठी आवश्यक बियाणे बाजूला काढून ठेवणे किंवा बियाणे बँकेमध्ये जमा करणे, पावसापूर्वी विहिरींचे तसेच बोअरवेलचे पुनर्भरण करून घेणे, बंधाऱ्यांची व तलावांची डागडुजी करून घेणे, पडलेल्या पावसाचे नाल्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी विहीर, शेततळे, गावतलाव किंवा बंधाऱ्यात साठवून ठेवणे असे निर्णय घ्यावेत. ही कामे गावातील सर्व युवक मंडळ, महिला मंडळ तसेच शेतकरी गटांनी तत्काळ करणे गरजेचे आहे.

हवामानातील बदलाबरोबरच बाजारातील बदलामुळे निर्माण होणारी जोखीम म्हणजे उत्पादित शेतीमालाचे संभाव्य नुकसान आणि कमी भावामुळे होणारे आर्थिक नुकसान, ही जोखीम कमी करण्यासाठी गावच्या शेती नियोजनामध्ये शेतीमाल साठवणुकीची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे.

गावोगावी लहान ते मध्यम आकाराची गोदामे निर्माण करणे हा ग्रामपंचायतीच्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या जबाबदारीचा भाग असला पाहिजे. गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेने प्रमुख बाजार गावात अशी गोदामे निर्माण करून धानाची साठवणूक व्यवस्था तयार केली आहे. त्याचा फायदा आदिवासी विकास महामंडळ तसेच इतर शेतकरी घेत आहेत.

याशिवाय कृषी विभागाच्या काही योजना व प्रकल्पातून सर्व जिल्ह्यामध्ये शेतकरी गट तसेच उत्पादक कंपन्या मध्यम ते मोठ्या आकाराची गोदामे निर्माण करत आहेत. त्यांची संख्या व गती वाढल्यास शेतीतील जोखीम कमी होण्यास बरीच मदत होईल.

शेतीच्या नियोजन आराखड्यात शेतीमाल उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचे नियोजन समाविष्ट होणे क्रमप्राप्त आहे. ही शेतीमाल मूल्यसाखळी आपल्या राज्यात नवीन नाही. सहकाराच्या तत्त्वावर शेती क्षेत्रात निर्माण झालेली ‘दुग्धशर्करा’ व्यवस्था म्हणजे मूल्य साखळीचे उत्तम उदाहरण आहे.

ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक यांच्यासाठी निर्माण झालेली प्रत्येक टप्प्यावरील व्यवस्था कापूस, कडधान्ये, तेलबिया भाजीपाला, फळे इ. उत्पादनांसाठी निर्माण करणे शक्य आहे. यासाठी गावागावांत अभ्यासपूर्ण काम करावे लागणार आहे.

सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने या प्रकारच्या मूल्य साखळीची यशस्वी निर्मिती केली आहे. एकूणच शेतीसाठी उपलब्ध संसाधनांचा आणि मूल्य साखळीचा अभ्यास करून नियोजन केले तर शेतीचा शाश्‍वत विकास घडवून आणणे कोणत्याही ग्रामपंचायतीला सहज शक्य आहे.

हवामान बदलतंय, आपणही बदलूया ...हंगामाच्या पुढे जाऊन शेतीचे नियोजन करूया.

(लेखक मृदशास्त्र विशेषज्ञ तथा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात कृषी विद्यावेत्ता आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT