Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : वीजपंपांची बिल देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भरता येणार

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील पाणीपुरवठा योजनांच्या वीजपंपांचे थकित वीजबिल पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.

ही थकित वीज देयके भरल्यानंतर जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या वीजपंपांसाठी नवीन वीज जोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील १ हजार ३८५ ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांच्या १ हजार ५८५ जोडण्यांची ४८ कोटी रुपये वीजबिलाची थकबाकी आहे.

ही थकबाकी आता पंधराव्या वित्त आयोगातून भरली जाणार असल्यामुळे ग्रामपंचायतींवरील भार कमी आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनांची जलचाचणी करता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात १२२२ पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यापैकी जवळपास १७२ योजनांची कामे पूर्ण झाली तर १०१८ कामे प्रगतिपथावर असून ३२ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

या योजनांसाठी उद्भव विहिरींची कामे सुरू झाल्यापासून ठेकेदार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नवीन वीज जोडणीसाठी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत जवळपास हजार ग्रामपंचायतींनी वीजपंप जोडणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींकडे आधीच महावितरण कंपनीची वीजदेयके थकित आहेत.

या ग्रामपंचायती थकित देयकांचा भरणा करीत नसल्यामुळे महावितरण कंपनीने त्यांना आधी थकबाकी भरा नंतर जोडणीसाठी अर्ज करा, अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतली आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व इतर सदस्य ही थकबाकी भरण्यास तयार नाही.

काही ग्रामपंचायती आमची आर्थिक परिस्थिती नसल्याचे कारण देत आहेत. यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याबाबत राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडे माहिती कळवली व त्यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती.

राज्यात सर्वच ठिकाणी अशीच समस्या आहे. यामुळे ग्रामविकास विभागाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून वीजपंपांची थकित वीजदेयके भरण्यास परवानगी दिली आहे.

यातून केवळ वीजपंपांचीच थकित वीजदेयके भरण्याची परवानगी असून इतर वीज जोडण्यांची थकबाकी यातून भरता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिेषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून त्यांच्याकडील पंधराव्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून ही वीजदेयके भरण्यासाठी पत्र पाठवले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सध्या पंधराव्या वित्त आयोगाचे २७९ कोटी रुपये शिल्लक आहेत.

यातील बहुतांश रक्कम बंधित निधीतील आहे. यामुळे जानेवारीअखेपर्यंत महावितरणचे ग्रामपंचायतींकडे थकित असलेल्या वीजदेयकांचा भरणा केला जाईल. यानंतर महावितरणकडून जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या उद्भव विहिरींच्या वीजपंपांसाठी जोडण्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठेकेदारांची सुटका होणार

महावितरण कंपनीचे अधिकारी मागील थकबाकी भरल्याशिवाय नवीन जोडणी देणार नसल्याचे सांगतात. यामुळे ठेकेदारांनी ग्रामपंचायतींकडे याबाबत तगादा लावल्यास सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून संबंधित ठेकेदारालाच मागील थकबाकी भरण्याबाबत आग्रह केला जात आहे.

नवीन वीज जोडणी मिळत नसल्याने ठेकेदारांना उद्भव विहिरी खोदण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर करावा लागत आहे. आता या निर्णयानंतर वीजजोडण्या मिळाल्यास ठेकेदारांची या अडचणीतून सुटका होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT