Coconut Garden
Coconut Garden Agrowon
ॲग्रो विशेष

नारळासह लाखी बागेचा उभारला आदर्श नमुना

Team Agrowon

एकनाथ पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेंडोली (ता.कुडाळ) येथील अच्युत तेंडोलकर यांनी नारळ, सुपारी, काजू या मुख्य पिकांसमवेत विविध मसालेवर्गीय पिकांच्या लागवडीतून लाखी बागेचे उत्कृष्ट मॉडेलच तयार केले आहे. बहुतेक सर्व पिकांची रोपे ते स्वतःच तयार करतात. सेंद्रिय पध्दतीचा अधिकाधिक वापर करून उत्पादित केलेल्या शेतमालाला त्यांनी जागेवरच बाजारपेठ देखील तयार केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ-केळुस मार्गावर तेंडोली (ता. कुडाळ) हे निसर्गरम्य गाव आहे. गावात दूरवर सर्वत्र नारळ (Coconut), सुपारी, आंबा (Mango), काजूच्या (Cashew) बागा दिसून येतात. याच गावात अच्युत तेंडोलकर यांचे घर व शेती आहे. त्यांचे वडील मधुसूदन बेळगावमध्ये बनारस विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला या संदेशावरून प्रेरित होत ते कुटुंबासह मूळ गावी तेंडोलीत परतले व शेतीला सुरुवात केली.

शेतीचे धडे

अच्युत यांनी वयाच्या तेराव्या वर्षीच शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांची वडिलोपार्जित सुमारे १०० एकर जमीन दोन ठिकाणी होती. शेतीतील अडचणी, सिंचनाच्या पद्धतीचा अनुभव घेत सलग ४० एकरांच्या क्षेत्रात १९८१ पासून सुधारणा व प्रयोग सुरू केले. जीर्ण झालेल्या झाडांचे पुनरुज्जीवन तसेच टप्पाटप्याने नवी लागवड केली. नारळाच्या विविध जाती केरळ, गोवा यांसह विविध भागातून आणल्या. स्थानिक जाती उंच असल्या तरी त्या उत्पादन चांगल्या देतात हे लक्षात आले.

रोपनिर्मितीचे कौशल्य

नारळ रोपनिर्मितीचे कौशल्य अच्युत यांनी जाणून घेतले. सुपारी, जायफळ, मिरी, लवंग, दालचिनी आदींच्या रोपांची निर्मितीही ते स्वतःच करतात. सुमारे ४० वर्षांचा अनुभव व हातखंडा यात तयार झाला आहे. नारळ रोपनिर्मिती करताना झाडावरील उत्तम पेंडीतील फळांची निवड करतात. ती पहिल्या पावसात ठेवली जातात. त्यातून कोंब आल्यानंतर ती पिशवीत भरली जातात. उत्तम फळनिवड हाच निकष अन्य पिकांच्या रोपनिर्मितीतही पाळला जातो.

सेंद्रिय पद्धतीवर भर

-गरजेपुरताच रासायनिक कीडनाशकांचा व तोही अल्प प्रमाणात वापर.

-रोप लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षेच किरकोळ स्वरूपात रासायनिक खताचा वापर.

-बागेत उपलब्ध पालापाचोळा, पीक अवशेष, तण, नारळांच्या फांद्या, सुपारीची पाने आदींचा खत म्हणून वापर. पीक अवशेषांचा भुगा होण्यासाठी तमिळनाडूतून यंत्र आणले आहे.

-या सेंद्रिय खताच्या वर्षानुवर्षांपासूनच्या वापरामुळे जमिनीची प्रत सुधारून तिचा रंग काळसर बनला आहे.

नदीतील गाळाचा वापर

बागेच्या बाजूने छोटी नदी वाहते. ती डोंगरदऱ्यांतून येते. नदीला पूर येतो त्या वेळी वाहून आलेला गाळ बागेलगत येऊन साचतो. एप्रिलमध्ये नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर गाळ काढून तो झाडांना घातला जातो. १५ ते १६ डंपर गाळ दरवर्षी मिळतो. गाळ काढल्याने नदीत पाण्याची साठवणही मोठ्या प्रमाणात होते.

लाखी बागेचा उत्कृष्ट नमुना

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने (दापोली) विकसित केलेल्या लाखी बागेचा उत्कृष्ट नमुना तेंडोलकर यांच्याकडे पाहायला मिळतो. नारळ, सुपारी, काजू या मुख्य पिकांसह जायफळ, दालचिनी, मिरी आदींची नियोजनबद्ध लागवड येथे पाहण्यास मिळते. विद्यापीठ, कृषी विभाग, शेतकरी आदी सर्वजण अभ्यास सहलीसाठी तेंडोलकर यांच्या बागेची निवड करतात. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही बागेला भेट देऊन प्रयोगांचे कौतुक केले आहे.

बागेतील ठळक बाबी

-शेतीतील ४० वर्षांचा अनुभव.

-२० ते २५ एकरांत नारळ. सुमारे ७०० झाडे. १५ एकरांत काजूची १२०० झाडे.

-पाच हजार सुपारी, १५० जायफळ, मिरी १०००, लवंग-५० अशी समृद्धी.

-दोन सिंचन विहीरी. तुषार व ठिबक सिंचनाद्वारे पाणी.

उत्पादन, उत्पन्न व जागेवरच विक्री

-१५ ते २० वर्षे वयाचे नारळ झाड प्रति झाड ७० ते ८० नग उत्पादन देते. प्रति नग सरासरी १५ ते २५ रुपये दर मिळतो.

-सुपारीचे एकूण सहा टन उत्पादन. ३६० ते ४०० रुपये दर.

-काजूचे एकूण ८ टन उत्पादन. १०० रुपयांपासून १३४ रुपयांपर्यंत (काजू बी) दर. (कमाल दर ३६० रुपये कोरोना काळात मिळाला). जायफळातून दीड लाखांचे उत्पन्न मिळते.

-मिरीचे १०० किलो उत्पादन. प्रति किलो ५०० रुपये दर. जायफळाच्या लालसर पातीला प्रति किलो २ हजार रुपये, बीला प्रति किलो ६०० रुपये दर मिळतो.

-सेंद्रिय पद्धतीवर भर दिलेला माल असल्याने व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. विक्रीसाठी कुठे जावे लागत नाही.

बहीण-भावाच्या नात्यातला जपला ओलावा

सन १९६१ मध्ये जिल्ह्यात मोठे वादळ झाले. यात अच्युत यांची दोनशेहून अधिक नारळ झाडे उन्मळून पडली. या धक्क्यातून वडील मधुसूदन सावरले नाहीत. दोन मोठ्या, एक लहान बहीण व दोन लहान भाऊ होते. कुटुंबापुढे आर्थिक संकटही तयार झाले. दोन वेळच्या जेवणासाठी कष्ट करावे लागले. अशावेळी मोठी बहीण लीला शेती सावरण्यासाठी खंबीरपणे उभी राहिली. खांद्याला खांदा लावून तिने काम केले. त्यामुळेच पुढे कुटुंबाला शेती विकसित करणे शक्य झाले. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने ६० वर्षांपूर्वीच्या आठवणी कुटुंबात ताज्या झाल्या. रक्षाबंधनाला सर्व भावंडे एकत्र येतात. बहीण-भावाच्या नात्यातील ओलावा कुटुंबाने आजही जपला आहे.

घरच्यांचीही भक्कम साथ

लग्नापूर्वी अच्युत यांच्या पत्नी अर्चना यांना शेतीची फारशी माहिती नव्हती. लग्नानंतर त्यांनी शेतीतील बारकावे आत्मसात केले. नारळाची बाग ज्या ठिकाणी आहे तेथे लोकवस्ती नाही. तरीही अर्चना डगमगल्या नाहीत. पती कामानिमित्त बाहेरगावी असताना संपूर्ण बागेचे व्यवस्थापन त्या सांभाळतात. मुलगा राजू याने संगणक क्षेत्रातील पदवी घेतली आहे. कृषी अवजारे- यंत्राचे विक्री केंद्रही सुरू केले आहे. एकमेकांच्या भक्कम साथीमुळेच कुटुंबाने प्रगती केली आहे.

अच्युत तेंडोलकर, ९४२१९९०२९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT