Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : बदलांकडे गांभिर्याने पाहा...

Team Agrowon

Agriculture Weather : हवामान बदल ही संज्ञा प्रथम वालॅक स्मित ब्रोकर या अमेरिकन शास्त्रज्ञाने ८ ऑगस्ट १९७५ रोजी वापरली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाचा हवामान प्रकल्प आणि जागतिक हवामान संघटना यांनी एकत्र येत जिनिव्हा येथे १९८८ मध्ये १९५ देशांना सोबत घेत इंटर गव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) स्थापना केली. जागतिक पातळीवर हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचा समूह तयार केला.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकेचे उपराष्ट्रपती अल गोर आणि भारतीय शास्त्रज्ञ राजेंद्र पचौरी यांनी जागतिक तापमान वाढ आणि त्या अनुषंगाने हवामान बदल होत असल्याचे हवामान विषयक आकडेवारीचा अभ्यास करून सिद्ध केले. पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तापमान वाढत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढल्याने किनाऱ्यावरील वस्त्यांना धोका निर्माण होत असल्याबाबत सूचना दिली.

पाऊसमानातील बदल, हवामान बदलाने काही ठिकाणी चक्रीय वादळात वाढ, अतिवृष्टी, महापूर आणि बऱ्याच ठिकाणी दुष्काळी परिस्थिती ही स्थिती वारंवार येत आहे. जागतिक पर्यावरणात बदल दिसून येत आहेत. वातावरण अधिक उष्ण होत आहे. दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये पृथ्वी भोवतीच्या वातावरणाचे तापमान १.४६ अंश सेल्सिअसने वाढल्याचे जाहीर करण्यात आले. २०११ ते २०२० हे शतक अति उष्ण ठरले. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील डेथव्हॅली परिसरात २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ५६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

हवामान बदलाची कारणे

औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. वाहतुकीसाठी ट्रक, बस, रेल्वे, कार आणि इतर अनेक वाहनातील पेट्रोल, डिझेलच्या वापरातून देखील कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे. १९१३ मध्ये रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामध्ये जर्मन शास्त्रज्ञ फ्रिक्झ हवर यांनी अमोनियाचा शोध लावला.

त्यानंतर अमोनिअम सल्फेट व युरियाचा जगभर वापर वाढला. त्यामुळे हवेत नायट्रस ऑक्साइडचे प्रमाण वाढले. भात खाचरे तसेच जनावरांच्या रवंथ प्रक्रियेतून मिथेन उत्सर्जन वाढत आहे. कोळशाची खाण, तेलविहिरींची खोदाई तसेच एअर कंडिशन यंत्रणेतून हरितगृह वायू उत्सर्जन उत्सर्जन वाढीला गती मिळाली आहे. भात, गहू काढणीनंतर धस्कटे तसेच उसाचे पाचट जाळले जाते, त्यातून कार्बन उत्सर्जन वाढत आहे. जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये दारूगोळा वापराने कार्बन उत्सर्जनात वाढ होत आहे.

घातक वायूचे उत्सर्जन

गेल्या काही वर्षांत हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ०.०३ टक्क्यावरून ०.०४ टक्यापर्यंत वाढले आहे. मिथेन व नायट्रस ऑक्साइडचे प्रमाण ०.०६ टक्क्यापर्यंत वाढले आहे. ऑरगॅनवायूचे प्रमाण ०.९३ टक्क्यापर्यंत वाढले आहे. ओझोनचे प्रमाण ०.०६ टक्का आहे. मात्र ओझोन थरास मोठी भगदाडे पडल्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येत आहे. हे लक्षात घेऊन २०१५ मध्ये पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसवर रोखण्याचे धोरण निचित केले गेले.

जंगलतोडीचे परिणाम

हवामान बदलाच्या काळात जंगलाचे प्रमाण आणि वृक्षतोड महत्त्वाचा विषय आहे. एकूण जगातील भूमीपैकी ३३ टक्के क्षेत्रावर वन क्षेत्र असावयास हवे. मात्र ते ३१ टक्के एवढेच शिल्लक आहे. भारतात २४ टक्के आणि महाराष्ट्रात १७ टक्के जंगल क्षेत्र उरले आहे. वनस्पतीची पाने हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषण करून प्रकाशसंश्‍लेषण क्रियेद्वारे खोड, फांद्यामध्ये साठवतात. दरवर्षी जगभरात १० दशलक्ष हेक्टरवर जंगल तोड होते. आतापर्यंत अशिया खंडात पाच कोटी, आफ्रिका खंडात साडेसहा कोटी आणि लॅटिन अमेरिकेतील साडेआठ कोटी हेक्टर क्षेत्रावर जंगलतोड झाली आहे. यातून कार्बन डायऑक्साइड शोषण करणारी यंत्रणा कमकुवत झाली आहे. त्यामुळे हवेत अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड शिल्लक राहत आहे.

वादळांच्या संख्येत वाढ

अधिकचा कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड वायू सूर्याकडून येणारी उष्णता साठवत आहेत. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरण, पृथ्वी तसेच समुद्री भागातील पाण्याचे तापमान वाढ होत आहे. जेथे तापमान वाढते तेथे हवेचा दाब कमी होतो. हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या दिशेने जास्त हवेच्या दाबाकडून वारे वाहतात. मोठ्या प्रमाणात तेथे बाष्प आल्याने ढग निर्मिती होऊन नैसर्गिक आपत्तीत वाढ होते. ढगफुटी, अतिवृष्टी, महापुरामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.

काही ठिकाणी भूस्खलन होऊन दळणवळणावर परिणाम होतो, काही ठिकाणी डोंगर उतार खचून मानवी वस्त्या नामशेष होत आहेत. २००५ मध्ये मुंबई, २०१३ मध्ये केदारनाथ, २०१४ मध्ये माळीण, २०१९ मध्ये केरळ, २०२३ मध्ये तमिळनाडू येथे ढगफुटी आणि अतिवृष्टी होऊन वित्त, मनुष्यहानी झाली. अनेक चक्रीय वादळापैकी अमफन, फनी, बीपरजॉय, निसर्ग, मिचँग या वादळामुळे मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबवावी लागली. हवामान बदलाने मॉन्सून आगमन आणि वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्राने १९७२, १९८६, २००३, २००८, २०१२, २०१५, २०१८ व २०२३ ही भीषण दुष्काळी वर्षे अनुभवली आहेत. या काळात टँकर, रेल्वेने पाणीपुरवठा करणे भाग पडले होते.

तीव्र पाणीटंचाई

जगभरात तीव्र पाणीटंचाई असणारी शहरे वाढत आहेत. २०२४ मध्ये भारतातील बंगळूर, दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन, इजिप्तमधील कैरो, तुर्कीमधील इस्तंबूल, मेक्सिको शहर, लंडन येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. २०४० पर्यंत जगभर पाणीटंचाई हा मुद्दा गंभीर होणार आहे. दुसऱ्या बाजुला जगाची लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे अभ्यासकांच्या मते २०८० मध्ये पाणीटंचाईमुळे जगभरात मानवी स्थलांतर वाढण्याची मोठी शक्यता आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता आजच जागरूक होण्याची आवश्‍यकता आहे.

हवामान बदल रोखण्यासाठी उपाययोजना

कार्बन उत्सर्जन, मिथेन व नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन रोखणे, अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड शोषण करण्यासाठी वनसंवर्धन आणि वृक्ष लागवड वाढवणे आवश्यक आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार डिझेल, पेट्रोल वापराचा हा शेवटचा काळ सुरू आहे. हरित ऊर्जेसाठी सौरऊर्जा, पवन ऊर्जेचा वापर वाढवावा लागणार आहे.

इथेनॉलचा वापर वाढवणे, इलेक्ट्रिक कार, बस, ट्रक, स्कूटरची निर्मितीची गरज आहे.

शेती व्यवस्थापनात बदलाची गरज

एकात्मिक शेती व्यवस्थापनाची गरज. काही क्षेत्रावर तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, फळपिके, भाजीपाला पिके, फुलशेतीला पशुपालनाची जोड.

संरक्षित शेती तसेच सूक्ष्म सिंचनाचा वापर आवश्यक.

संरक्षित शेतीसाठी शासकीय योजनांची आवश्यकता

शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना.

नुकसान भरपाई योजना आवश्यक असून, त्यासाठी स्वतंत्र खात्याची गरज आहे.

कोरडवाहू कपाशीचे क्षेत्र कमी करून मका, सोयाबीन पिके घेणे.

शेती उत्पादनास हवी भाव. शेतीपूरक उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता.

जागतिक स्तरावरील परिणाम

जग हे एकूण सहा खंडात विभागले गेले आहे. यामध्ये आशिया खंडात ४६ देश, उत्तर अमेरिका खंडात ३१ देश, दक्षिण अमेरिका खंडात १३ देश, आफ्रिका खंडामध्ये ५३ देश, युरोप खंडामध्ये ५१ देश आणि समुद्रातील बेटावर वसलेले १९ देश आहेत. या खंडांमध्ये हवामान बदलाचे वेगवेगळे परिणाम समोर येत आहेत.

आशिया खंड : उष्ण तापमान, जोरदार चक्रीवादळ, महापूर, दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ, अन्न धान्य उत्पादनावर परिणाम. गरिबी आणि स्थलांतरामध्ये वाढ.

उत्तर अमेरिका खंड : अधूनमधून दुष्काळ, हरिकेन चक्रीय वादळामुळे महापूर, बर्फ अच्छादित प्रदेशावर परिणाम.

दक्षिण अमेरिका खंड : तापमानात वाढ, पावसामध्ये घट. समुद्र पातळीत वाढ, बर्फ वितळण्याच्या प्रमाणात वाढ.

आफ्रिका खंड : उष्णतेच्या लाटा, दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ. वार्षिक पर्जन्यमानात घट.सोमालियात कायम दुष्काळी स्थिती.

युरोप : बर्फवृष्टीमध्ये घट, समुद्रातील पाण्याच्या तापमान वाढ, आम्लतेत वाढ.

बेटांचा प्रदेश : समुद्र पातळीत वाढ झाल्यामुळे काही बेटे पाण्याखाली जात आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई.

डॉ. रामचंद्र साबळे, ९८९००४१९२९

(लेखक ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया या संस्थेचे सदस्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT