Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये १.५५ हेक्टर क्षेत्रावर मधमाशी प्रकल्प उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांमध्ये भारतीय मधमाशीबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच मधमाश्यांची संख्या वाढविणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
उच्च प्रतीच्या मधमाशींच्या बीजांची निर्मिती व नवीन राणीमाशीचे उत्पादन तंत्रज्ञान आत्मसात केले, तरच आपण शाश्वत मधमाशीपालन करू शकतो, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मधमाशी मंडळ, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, यांच्यातर्फे शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशीपालन, उच्च प्रतीचे मधमाशी बीज केंद्राचा विकास आणि मधू वनस्पतींची फुलोरा यांची लागवड या प्रकल्पांतर्गत कृषी कीटकशास्त्र विभागाच्या वतीने दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली. डॉ. सी. एस. पाटील, महाबळेश्वर येथील खादी आणि व्हिजेल इंडस्ट्रीज बोर्डाचे संचालक डॉ. डी. आर. पाटील ऑनलाइन उपस्थित होते.
पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माजी प्रकल्प उपसंचालक डॉ. डेझी थॉमस, बंगलोर येथील हनी डे बी फार्मचे संचालक बी. व्ही. अपूर्वा, उटी (केरळ), येथील तांत्रिक मार्गदर्शक जस्टीन राज व ज्वारी सुधार प्रकल्पाचे ज्वारी कीटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम कदम उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, की मधमाशीपालन ही एक कला असून राणी माशीचे उत्पादन तंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. चांगल्या प्रतीच्या मधमाशींच्या वसाहती मधमाशी पालकांना पुरविणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे जास्तीत जास्त मधपालक तयार झाल्यामुळे मधमाशीच्या व मधाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर बनेल. मधमाश्यांची संख्या वाढल्यामुळे फळे, भाजीपाला व तेल बियांच्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होण्यास मदत होणार आहे.
दोन दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. डेझी थॉमस, बी. व्ही. अपूर्वा व जस्टीन राज यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. आर. व्ही. कडू यांनी केले. तर डॉ. संदीप लांडगे यांनी आभार मानले. कार्यशाळेला कीटकशास्त्रज्ञ विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक तसेच आचार्य व पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.