Rural Story Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : पानाची चंची, पानशौकिन आणि पानवेळा

Team Agrowon

- समीर गायकवाड

जीवन सुलभ, सुखकर वाटावं यासाठी विरंगुळा गरजेचा आहे. छंद, आवड यातूनही विरंगुळा मिळवता येतो. याही पलीकडे जाऊन सामान्यतः लोक लहान सहान व्यसनातून विरंगुळा धुंडाळतात. ही व्यसनं कालानुगतिक बदलत गेलीत. काही अजून टिकून आहेत तर काही नामशेष झालेत तर काही लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. यातील काही नाद, व्यसनं गावगाड्याची ओळख बनून गेले. पैकी एक व्यसन पानविड्याचं होतं. शहरातही पान खाल्लं जातं पण गावाकडची बातच न्यारी होती. पानशौकिनांकडे पानाची चंची असायची तिची ही गोष्ट.

पानाची चंची! हवे तर बटवा म्हणा. या चंचीचे अनेक रंग होते, आता काही थोडेच शिल्लक उरलेत. चंचीच्या आठवणी अजूनही अगदी रंगतदार आहेत. दुपारच्या वेळी बांधाच्या कडेलगतच्या आंब्याच्या डेरेदार सावलीत बसून काका हळूच चंची उघडायचे. त्यासरशी त्यातली सामग्री एकेक करत बाहेर यायची. घड्या घालून दुमडून ठेवलेली पानांची सुरळी आधी बाहेर येऊन त्यांच्या मांडीवर स्थिरावायची. मग ती पाने एकेक करून आधी उताणी व्हायची मग सवाशी व्हायची. ती फटाफट झटकली जायची. त्यावर शेजारी ठेवलेल्या पितळी तांब्यातले पाणी शिंपडले जायचे. ती जेमतेम बऱ्यापैकी ओली झाली की अधिकच हिरवीगार, ताजी तरतरीत वाटायची. एकीकडे काकांच्या तोंडाची टकळी सुरू असे. दुसरीकडे काकांच्या मातकटलेल्या धोतरावर पानं हवा खात आरामात पहुडलेली असत.

पानापाठोपाठ चुन्याची प्लास्टिकची हिरवी डबी हातघाईला आल्यागत बाहेर यायची. अलगद निघणाऱ्या त्या झाकणाला उघडण्याची कोण घाई असायची. आतील चुना किंचित सुकलेला असला की त्यालाही जलाभिषेक व्हायचा पण तो थेंबमात्रच असायचा. ते थेंबभर पाणी चुन्याचे रूपांतर लोण्यात करून जायचे. अगदी नजाकतीने उजव्या हाताच्या अंगठ्याने नखाकडच्या बाजूने चुना अलगद काढला जायचा. मग त्या चुन्याची हिरव्यागार पानावर मन लावून पट्टेदार आखणी व्हायची. लोक एकमेकाला फसवतात अन् चुन्याचे नाव बदनाम करतात.

अमक्याने तमक्याला चुना लावला असं गावभर सांगत फिरतात. चुन्याचा फसवाफसवीशी दुरान्वयानेही संबंध नाहीये. पांढरा शुभ्र, लोण्यासारखा मऊ असणारा चुना नुसता खाल्ला तर तोंड भाजते. मग लोणी-साखर खात बसावे लागते. तर असा हा चुना लावून झाला की पानांचे देठ खुडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. पानाच्या देहावरची एकही शिर न दुखावता, पानाचा इतर भाग फाटू न देता एका हळुवार हिसक्यात पानाचे देठ धडावेगळे होताना पानांची तक्रार नसायची, कारण काकांच्या मांडीवर बसल्या बसल्या त्यांच्या तलम हिरव्या कायेवर चुन्याचे लेपन अगदी झोकात व्हायचे.

नंतर येई काताची डबी. बहुतांशी छोटेखानी डबी स्टीलचीच असायची. तिला वर एक मस्त आरसा लावलेला असायचा, सतत वापर असूनही या डबीचे झाकण थोडे घट्टच. मग किंचित दातओठ चावून, नखे घुसवून तिचे झाकण उघडले जायचे. डबीत काताची बारीक पूड असली तर उत्तमच नाहीतर मग त्यातल्या त्यात मोठ्या अंगाचे दोन तीन तुकडे बाहेर काढले जायचे. त्या तुकड्यांच्या पोटात अंगठा आणि आणि तर्जनीची वाघनखे घुसत अन त्याची शकले होत. लालसर करड्या रंगाचे बारीक दोन, चार तुकडे चुना लावलेल्या भागावर येऊन विराजमान होत असत. बाकीची ‘कात’करी मंडळी पुन्हा डबीबंद!

मग बारी असे सुपारीच्या डबीची. ती नानाविध आकाराची अन धातूंची असे. पितळी, स्टील, जर्मन, प्लॅस्टिक अशा रूपात ती दिसे. खाणाऱ्याची क्षमता, आवड यानुसार तिचं आकारमान राही. गडी ‘पान’दार असेल तर चंचीही मोठी अन् ह्या डब्यादेखील मोठ्या असत. तर ही डबी बाहेर आली की त्यातल्या सुपाऱ्या बाहेर काढल्या जात. सुपारी अनेक तऱ्हेची असे. लाल, भाजकी, चिकणी, गोल, चपटी असे बरेच प्रकार असत. दरवेळेस सगळ्या सुपाऱ्या बाहेर यायच्या, त्यांना झटकले जायचे, फुंकर मारून त्यांची साफसफाई व्हायची. मग त्यातल्याच एका सुबक सुपारीला निवडून वेगळं केलं जायचं, बाकी साळकाया माळकायांची रवानगी पुन्हा डबीत व्हायची. कात, सुपारी असे आजन्म कारावासात असायचे, थोड्या वेळासाठी पॅरोलवर बाहेर येऊन बिचारे पुन्हा काळकोठडीत जायचे. पण बिचारे कधी ‘एका तुकड्याने’ तक्रार करत नसत.

हे सर्व सुरू असताना सर्वांत वजनदार ऐवज पानाच्या चंचीत अंगाला आळोखे पिळोखे देत पहुडलेला असायचा, तो म्हणजे अडकित्ता! याचे नावच कसे भरभक्कम आहे. पानावर चुना-काताची नक्षी काढून होताच मांडीवरनं हात झटकवत अडकित्ता बाहेर काढला जायचा. हा कधी कधी खूपच वजनदार असायचा, इतका की रागाने कोणाला फेकून मारला तर डोक्याला मजबूत खोकच पडावी. ह्या अडकित्त्याच्या धारेवरून हात फिरवून आधी तिला साफ केले जायचे. मग निवडलेल्या सुपारीची रवानगी अडकित्त्याच्या मधोमध. कधी कधी समोरच्या माणसाशी काका बोलत बसले की ती सुपारी बिचारी अडकित्त्याच्या पात्यामध्ये ताटकळत बसून पाऊसपाण्याच्या गप्पा ऐकत राहायची.

बोलताबोलता अचानकच तिच्यावर पाती दाबली जायची अन् तिचे बारीक काप केले जायचे. शार्पनरमध्ये शिसपेन्सिलला खूर करताना पेन्सिलचे जसे गोलाकार काप वर येतात तसे अडकित्त्यातून सुपारीचे गोलाकार काप बाहेर यायचे. अडकित्ता नेमका पकडल्याने सुपारीचे ‘कात्रण’ अलगद तळहातात साठायचे. कधीकधी लहर फिरली की मग गोलाकार कापाऐवजी नुसते फटाफट तुकडे पाडून सुपारीला अडकित्त्याच्या फाट्यावर मारले जायचे. सुपारीची अशी मुक्तछंदीय कापणी केल्यावर त्या बुकण्याची रवानगी पानावर होई. एखादी दुसरी लवंग त्यावर नैवेद्य ठेवावा तशी ठेवली जायची. पूर्वी काका तंबाखूही खायचे. किसान जर्दा ते गाय छाप असे वाण पूर्वी चंचीत असत. तर्जनीने तंबाखू चोळून चोळून त्यांच्या तळहाताचा रंग बदलला होता. शेतातल्या एका गड्याला तंबाखूने जीव गमवावा लागला तेव्हापासून त्यांच्या चंचीतून तंबाखू हद्दपार झालेली.

तर पानाचा सगळा जामानिमा नीट जमल्यावर हळुवार घडी घातली जायची. ते दुमडले जायचे. पान तोंडात घालण्याआधी काका चूळ भरायचे. अगदी खळाळा आवाज करून. मग ते पान गालाच्या या कोपऱ्यातून ते त्या कोपऱ्यात सावकाशपणे घोळवले जायचे. चंची उघडली जाताच त्यातल्या ‘अस्त्रांचा’ दरवळ बहुधा लांबपर्यंत जात असावा. कारण थोड्याच वेळातच काही कष्टकरी तिथं गोळा व्हायचे. मग ह्या ‘पानवेळा’ लांबत जायच्या. या दरम्यानच्या गप्पांना कोणतेही क्षितिजबंधन नसे. ‘वारी ते बारी’ अन् ‘संकटाचा कैवारी ते चुलीम्होरची फुकारी’ असा मोठा आकृतिबंध ह्या गप्पाष्टकात असायचा.

पूर्वी चंची कॉटनच्या मळकट कापडातली वा मांजरपाटाच्या तुकड्यातली असायची, आता ती भरजरी सुद्धा मिळते. काकांकडे मागच्या काही काळापर्यंत मांजरपाटाच्या तुकड्यातली अन् नाडीने बांधलेली अशा अवतारातली चंची होती. त्यांच्या कंबरेवर ती रुळत राही, अनेक सुख दुःखाच्या आठवणीत त्यांच्या मनाचा भार हलका करे. कधी कधी तिच्यावर पडलेले अश्रू ती आनंदाने शोषून घेई. काका कधीही कोठेही गेलेले असोत ही चंची त्यांच्या बरोबर असेच. त्यांना निवांत बसलेलं पाहताच इतर मंडळी पुढे होऊन चंची उघडण्याचा लडिवाळ आग्रह पुन्हा पुन्हा होई. जादुई पोतडी उघडावी तशी चंची उघडली जाताच मायेच्या शब्दांचा सोनेरी मुलामा असलेल्या गप्पांना प्रारंभ होई.

आता ती चंची घराच्या सांदाडीत पडून असते, तिच्यावर धुळीची पुटे चढलीत. काकांना दात राहिले नाहीत त्यामुळे पानही बंद झाले अन् पानाबरोबरच्या पानगप्पाही अबोल झाल्या. लोकांना आता एकेमेकांकडे जायला वेळ नाही. गप्पा कोण कुणाबरोबर व कशासाठी मारेल बरे? काका ओसरीवर बसून असतात. कधी काळी पानाच्या लालीने रंगलेले त्यांचे लालबुंद ओठ आता जागोजागी चिरलेत, सुकलेत. वय वाढले की सवयी बदलाव्या लागतात, कधी इच्छेखातर तर कधी शरीराखातर. गावागावांतही आता गुटख्याच्या पुड्या सरकारकृपेने पोहोचल्या आहेत; त्यामुळे चंची अनेक घरांतून हद्दपार झालीय.

बायाबापड्यांच्या कमरेची ही पिढ्यान् पिढ्यांची साथीदार हळूहळू इतिहासात जाऊ पाहतेय. पानाच्या चंचीत जी बात होती ती नंतर आलेल्या कुठल्याच गोष्टीत नाही, कारण त्यात मायेचा ओलावा असणाऱ्या गप्पा झडाव्यात इतकी ताकद नाही. त्यात आहे तो फक्त बाजारू फसवेपणा, जो अनेकांचे प्राण घेऊन गेलाय. चंचीची उणीव येणाऱ्या पिढीला जाणवेल का नाही हे माहिती नाही, पण कलत्या सूर्याकडे ओलेते डोळे लावून बसलेल्या, दिगंतात हरवून चाललेल्या गावाकडल्या पिकल्या पानांना मात्र तिची रुखरुख लागून राहिली आहे हे मात्र नक्की. त्या पानवेळा आता सरल्यात, त्यांचा रंग मात्र अजूनही उतरलेला नाही. भूतकाळात उतरायचा अवकाश त्यांचा दरवळ भवताली घुमतोच!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT