Sameer Gaikwad : गोकुळनाथ

Village Story : वीसेक वर्षं हा खाकी कपड्यातला माणूस न चुकता गावात येत राहिला, नंतर नंतर तर त्यानं अनेक थकली झाडं केवळ खोट्या पत्रवाचनातून जिवंत ठेवली होती.
Postman Story
Postman StoryAgrowon
Published on
Updated on

Village Postman Story : सुरुवातीच्या काळात गावात पत्रपेटीही नव्हती. फारसा पत्रव्यवहार नव्हता. भानुदास शेळक्याचा पोरगा दरमहा पगार पाठवायचा, इतकाच मनिऑर्डरचा संबंध होता. तारेचं प्रकरण वेगळं होतं, वर्षाकाठी कुणाच्या न कुणाच्या घरी तार यायचीच. अमक्याकडं तार आली म्हटलं, तरी त्या घरी रडारड सुरू व्हायची,

कारण ‘कुणाच्या तरी जाण्याचेच’ संदेश घेऊन येणाऱ्या तारेचे प्रमाणच अधिक होते. तार येताच मजकूर वाचून होण्याआधीच गंभीर आजारी असलेल्या, वार्धक्याकडे झुकलेल्या एखाद्या वृद्धाच्या नावाने धोषा सुरू व्हायचा! सुरुवातीची बरीच वर्षे बदली पोस्टमनच येई. नंतर बऱ्याच काळाने गावाला पोस्टमन मिळाला.

गोकुळ तावरे त्यांचं नाव. सुरुवातीला त्याला पत्रवाला बाबा म्हणणारं गाव काही काळानंतर ‘आबा’ कधी संबोधू लागलं हे त्यालाही आठवत नसावं. गावात कुणाचंही पत्र आलं, तर अपवाद वगळता पत्र वाचून दाखवायची जबाबदारी त्यांचीच असायची. मनिऑर्डर आली की पैशाची गणती करून द्यावी लागे. पैसे कुठे ठेवायला हवेत, त्यांचा वापर कसा करायला हवा याचे सल्ले देण्याचं काम तो करायचा. पत्रांचं प्रमाण वाढलं तसं पाराजवळच्या लिंबाच्या बुंध्याला पत्र्याची लाल रंगाची उभट पत्रपेटी चिकटली.

शिडशिडीत बांध्याचा गोऱ्यापान रंगाचा गोकुळ दोनेक दिवसाआड गावात यायचा. गावातलं टपाल वाटून झालं की पत्रपेटीत जमा झालेलं टपाल न्यायचा. ऊन उतरायच्या सुमारास गावात यायचा. काही मंडळी खास त्याची वाट बघत बसलेली असायची. काहींना कागदपत्रावरचा मजकूर वाचून हवा असे, काहींना सल्ला हवा असे.

तर काही खास जगभराची खबरबात ऐकण्यासाठी जमत. शहरातून येणारा चार बुकं शिकलेला समजूतदार माणूस म्हणून त्याची ख्याती झालेली. जसा गावाचा लोभ त्याच्यावर जडलेला होता तसंच त्याचंही झालं होतं. त्यांच्यात एक ऋणानुबंध तयार झाला होता. अकाली वैधव्य भोगणाऱ्या गुणाबाईचा पाच पोरींच्या पाठीवर झालेला पोरगा प्रौढत्वात बैलाचं शिंग खुपसून मरण पावलेला.

त्याच्या दवाखान्यापायी आणि पोरींच्या लग्नांपायी, संसाराच्या रहाटगाडग्यापायी तिला कर्ज झालेलं. तिचा नातू मोहन नेटाने शिकून परगावी नोकरीस लागला होता. गुणाआज्जीला तो कितीदा तरी सांगायचा, की गाव सोडून त्याच्यासोबत राहायला चल. पण ती ऐकत नसायची. तिचा जीव इथंच रमायचा.

गोकुळशी तिचं नातं इतकं घट्ट झालं, की अनेकदा तो गावात आला की तिच्या घरी जेवायला असायचा. तिला त्याच्यात लेक दिसायचा. तो तिला नातवाचं टपाल द्यायचा, कधी पैसा अडका आल्यास त्याची वहिवाट लावून द्यायचा. सगळीकडची पत्रं देऊन झाल्यावर तिच्या ओसरीवर बसून असायचा, थेट सूर्य मावळल्यावरच सायकलचं पायंडल हाणायचा.

Postman Story
Nagpur Krushi Bhawan : नागपुरातील कृषी भवनासाठी ३५ कोटी रुपयांचा आराखडा

सोन्याबाईच्या पोरीला खूप जाच असायचा. डोळ्यात जीव आणून ती लेकीच्या पत्राची वाट बघायची. ‘आबा, पत्र आलंय का?’ इतकंच रोज विचारायची, त्यानं मानेनंच नकार दर्शवताच डोळ्याला पदर लावायची. जालूआबाचा धाकटा पोरगा, सून दूरगावी होते, त्याची धाकधुक सुरू असायची.

‘काही टपाल हाय का आबा?’ खर्जातल्या आवाजात डोकं खाजवत त्याचा सवाल असे. मीनावहिनीची निराळीच तऱ्हा होती, गोकुळच्या सायकलीच्या आवाजाच्या मागावर राहून दारात उभी राहून बारीक आवाजात हटकायची, ‘आबा, आमच्या दिराचं काही पत्र बित्र?’ घरातल्या लोकांना बातमी कळण्याआधी आपल्याला माहिती मिळावी हा तिचा सुप्त हेतू.

ब्रह्मदेव सोनक्याची लवलवती मान गोकुळच्या प्रतीक्षेत आणखीनच हले, ‘आबा, काही सांगावा हाय का रे पोरा?’ त्याला नाही म्हणताना गोकुळचा कंठ दाटून येई, बऱ्याचदा तो सोनक्याच्या गल्लीवरून जायचं टाळायचा. म्हाताऱ्याची दोन्ही पोरं, सगळं बिऱ्हाड पुण्यात होतं. हे पिकलं पान गावात असायचं.

मनिऑर्डर न चुकता यायची, पण बोलवणं नसायचं. म्हातारा ब्रह्मदेव नातवांच्या आठवणीने खंगत होता. सदू पाटलाचा नातू शिकायला थेट शहरात गेलेला, तिथल्या वसतिगृहातनं त्याचं पत्र आलं की त्याचा ऊर फुलून यायचा. अशी डझनभर माणसं रोज गोकुळची वाट बघत.

वीसेक वर्षं हा खाकी कपड्यातला माणूस न चुकता गावात येत राहिला, नंतर नंतर तर त्यानं अनेक थकली झाडं केवळ खोट्या पत्रवाचनातून जिवंत ठेवली होती. ब्रह्मदेवाला त्याच्या मनाचं समाधान होईल असं पत्र वाचून दाखवायचा, सोन्याबाईला अधून मधून खुश करायचा, जालूआबाचं मन राखायचा.

वाईट बातमी पत्रात असली, की आधी त्यांची मानसिक तयारी करून घ्यायचा. मन घट्ट झाल्यावर दुसऱ्या दिवशी येऊन खरी माहिती द्यायचा. पारावार बसून रिकामटेकड्यांसाठी तो जणू रेडिओच होता. गावातला हरेक उंबरा त्याला ओळखायचा, त्यालाही सगळी माणसं ठाऊक झाली होती.

गोकुळचं वय निवृत्तीकडे झुकल्यावर एकदा त्यानं गुणाआज्जीकडं विषय काढला आणि तिच्या वाड्यातली एक खोली मिळंल का असं विचारलं. गोकुळ बिनलग्नाचा होता. आपले नातलग लांबच्या गावी आहेत, आता उतारवयी कुणाच्या दारी जाऊन राहण्यापेक्षा इथंच राहावं असं म्हणत त्यानं आर्जवं केली. गुणानं खुशीनं होकार दिला.

त्या दिवसापासून गोकुळआबा गावच्या मातीशी एकरूप झाला. गुणाच्या नातवाचीही फिकीर मिटली. दरम्यान, बदलत्या काळात पोस्टमनचं अप्रूप कमी झालं. पत्र येण्यातली मजा संपली, तार आल्यानंतरची धास्ती सरली, आंतर्देशीय पाठवावं इतकं लिहिण्याची उसंत विरली. निरोपानिरोपी सोपी झाली. असं असूनही गोकुळबद्दलची आत्मीयता किंचितही कमी झाली नव्हती.

तांबडफुटीच्या काकड्याला हजर राहण्यापासून सांजेला ज्ञानबाच्या पारावर जुन्या आठवणींचे पक्षी गप्पांत जागवताना तो रंगायचा. गुणाची सगळी कामं तो आवडीनं करायचा. दुखण्यानं डोकं वर काढलं तर उशाशी बसून राहायचा, मिसरी भाजून देण्यापासून ते लुगडं धुऊन देण्यापर्यंत सगळी कामं करायचा.

शाडूनं घर लिंपताना तिच्या डोळ्यात पाझरायचा, अंगण सारवताना रांगोळीचे ठिपके व्हायचा, देव्हाऱ्यात निरंजन लावताना ज्योत व्हायचा, तिचे भेगाळलेले पाय चेपताना श्रावणबाळ व्हायचा. गुणाच्या कुशीतून जन्म घेतला नसला तरी पूर्वजन्मीचं नातं असल्यागत तो वागायचा. दर महिन्याला पेन्शन घेऊन येताच गुणाच्या घरचा किराणा भरायचा, गावातल्या अडल्या नडल्या माणसांना जमेल तशी मदत करायचा. त्यानं किती हातांना मदत केली होती हे त्या विश्‍वनियंत्यास देखील ठाऊक नसावं.

Postman Story
Canal Damage : पेनटाकळी कालव्याची होणार दुरुस्ती

मात्र आक्रीत झालं. एका रात्री झोपेतच गोकुळचे श्‍वास खुंटले. दृष्टी अंधुक झालेल्या गुणाला काही कळालेच नाही. रोज ‘रामपारी’ उठणारा आपला गोकुळ अजून कसा उठंना हे बघायला गेलेल्या गुणाच्या काळजाचं पाणीपाणी झालं. म्हातारी झीट येऊन जागेवर कोसळली. गलक्यानं गाव गोळा झालं. सर्वांचे श्‍वास चुकले. बराच आचारविचार झाल्यावर गावकऱ्यांनीच गोकुळचे अंतिम संस्कार केले.

निर्विकारपणे सगळ्या गावाच्या मौती करणारा भानातात्या त्या दिवशी सरण रचताना ढसाढसा रडला. पाणक्या दत्तूने हट्ट करून अग्नी दिला. जगन्नाथ वाण्यानं आपण होऊन तेरा दिवस शिधा देण्याचं जाहीर केलं. मोहन गावात आल्यावर गावकऱ्यांनी ठरवलं, की गोकुळनं दिलेल्या पत्त्यावर त्याच्या निधनाची माहिती दशक्रियेआधी तरी कळवली जावी.

शहाणा माणूस म्हणून आत्माराम शिंदे या कामगिरीवर रवाना झाला. दुसऱ्याच दिवशी पहिल्या एसटीनं आत्माराम गावात परतला. थेट गुणाच्या घराकडं झपाझापा ढांगा टाकत रवाना झाला. दारावरची कडी वाजवायची तसदीदेखील घेतली नाही थेट आत शिरला, म्हातारीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागला. त्यानं सांगितलेली माहिती ऐकून गाव अवाक झालं.

गोकुळ जन्मतःच अनाथ होता. त्याचं पालनपोषण अनाथाश्रमात झालं होतं. मिळेल ते काम करत तो जेमतेम शिकला होता, त्यातूनच त्याला पोस्टमनची नोकरी लागली होती. त्याचं जिच्यावर प्रेम होतं तिला अनाथ असल्याची माहिती तो सांगणारच होता; पण त्याआधीच तिला त्याचा पत्ता लागला आणि सर्व संपलं. तिनं गोकुळशी संबंध तोडले.

तिशी गाठल्यानंतर तो एकटाच खोली करून राहायचा, तेच त्याचं विश्‍व होतं. पण जसा तो गावाकडं आला तसं त्या विश्‍वाचा संबंध पेन्शन घेण्यापुरता उरला होता. आपण अनाथ असल्याचं गावापासून लपवून ठेवणारा गोकुळ खऱ्या अर्थाने अनाथांचा नाथ होता.

त्या दिवशी गुणाचा मुलगा पुन्हा एकदा मरण पावला. काही वर्षांनी मोहनचं लग्न झाल्यावर त्याला पहिला मुलगा झाला. शंभरी गाठलेल्या गुणानं त्याचं नाव गोकुळनाथ ठेवलं. अनाथांचा नाथ गोकुळनाथ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com