Sugarcane Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sugarcane Disease: ऊस पिकावर उन्हाळ्यातील रोगांचा कहर: नियंत्रणासाठी हे उपाय महत्त्वाचे!

Summer Crop Protection: उन्हाळी हंगामात ऊस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मर, यलो लीफ डिसीज, रेड रॉट यांसारख्या रोगांमुळे उसाचे उत्पादन घटण्याचा धोका आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Team Agrowon

Agriculture Tips: अलीकडे उसावर आढळणाऱ्या रोगांच्या संख्येत तसेच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामागे एकाच भागात ऊस पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, ऊस बेण्याची कमतरता, अशुद्ध व निकृष्ट बेण्याचा वापर, शिफारशीत नसलेल्या ऊस जातींची लागवड, ऊस बेण्यांची अनिर्बंध ने-आण, समस्यायुक्त जमिनी, सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा असंतुलित व अवेळी वापर, किडींचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव, पाण्याचा ताण, अति पाण्याचा वापर, अतिवृष्टी व पूर परिस्थिती, पीक संरक्षणाचा अभाव अशा कारणांचा समावेश होतो.

याविषयी पुरेशी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांची उदासीनता, रोग नियंत्रण उपायांचा कमी प्रमाणात अवलंब, हवामानातील बदल अशा विविध कारणांमुळे रोगाच्या वाढीस व प्रसारास योग्य वातावरण तयार झाल्याने उसावरील रोगांचा प्रसार व प्रादुर्भाव वाढत आहे.

ऊस पिकात बुरशी, सूक्ष्मजंतू, विषाणू, फायटोप्लाझ्मा, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, परोपजीवी वनस्पती आणि हवामानातील बदल यामुळे रोग तसेच विकृती तयार होतात. रोगामुळे उसाच्या व साखरेच्या उत्पादनात रोगाच्या प्रसार आणि तीव्रतेनुसार कमी-अधिक प्रमाणात घट येते. हंगामनिहाय ऊस रोग परिस्थिती वेगवेगळी असते. तसेच वेगवेगळ्या रोगांची लागण आणि प्रमाणदेखील कमीअधिक असते.

उन्हाळ्यात ऊस पिकावर चाबूक काणी, गवताळ वाढ, मर, रेड रॉट (ऊस रंगणे), मोझॅक, यलो लीफ सिंड्रोम किंवा यलो लीफ डिसीज, लीफ स्काल्ड (पांगशा फुटणे), रटून स्टंटींग (वाढ खुंटणे) हे प्रमुख रोग आढळतात. उन्हाळ्यात लागवड केलेले पीक ताणग्रस्त राहिल्याने पावसाळा हंगामात या पिकात पोक्का बोंग आणि तांबेरा रोग वाढल्याचे आढळून आलेले आहे.

मर रोग

हा राेग फ्युजॅरियम सॅकॅराय या जमिनीद्वारे आणि बेण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे हाेताे.

जमिनीतील कांड्या पाेखरणाऱ्या अळीचा (रूट बाेरर) प्रादुर्भाव झाल्यास किंवा अन्य काही कारणाने उसाच्या जमिनीतील कांड्यास इजा झाल्यास राेगास कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा शिरकाव जास्त हाेऊन राेगाची लागण हाेते.

काेसी ६७१ आणि काेे ८६०३२ या ऊस जातींमध्ये महाराष्ट्रात रोगाचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे. एकेकाळी गुजरात राज्यात या राेगाने काेसी ६७१ या जास्त साखर उतारा जातीच्या पिकाचे माेठे नुकसान झाले हाेते. त्यामुळे तिथे या जातीच्या लागवडीस प्रतिबंध केला हाेता.

प्रसार :

राेगाचा प्रसार प्रामुख्याने जमिनीद्वारे तसेच राेगट बेणे, वारा व पाणी यामुळे प्रसार हाेताे.

लक्षणे :

दुर्लक्षित पिकात मर राेगाचा प्रादुर्भाव जमिनीतील कांड्यामध्ये प्रथमत: हाेताे. राेगग्रस्त उसाच्या बेटातील उसाची शेंड्याकडील पाने निस्तेज दिसतात व हळूहळू पिवळी पडण्यास सुरुवात हाेते.

सुरुवातीला पानांच्या कडा करपतात व नंतर राेगाची तीव्रता वाढल्यानंतर राेगट बेटातील पाने व ऊस वाळतात.

ऊस शेंड्याकडून वाळत जातो. शेतात जागाेजागी बेटे सुकलेली व वाळलेली दिसून येतात.

वाळलेल्या उसाचा काप घेतल्यास पाेकळ कांड्यात बुरशीची पांढरी वाढ आढळते.

राेगाच्या प्रादुर्भावामुळे ऊस पाेकळ हाेऊन रसहीन बनतो. त्यामुळे उसाच्या व साखरेच्या उत्पादनात घट येते.

नियंत्रण :

बेणे मळ्यातील बेणे लागणीकरिता वापरावे. नवीन लागण करताना ऊस बेण्यास लागणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

लागण केलेल्या जमिनीचा पाण्याचा निचरा हाेण्यासाठी व्यवस्था असावी.

जमिनीतील कांड्या पाेखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,

क्लाेरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) प्रति एकरी २ लिटर प्रमाणे ४०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण करून जमिनीत आळवणी करावी.

रोगट बेटे खणून काढावीत. त्या ठिकाणी कार्बेन्डाझिम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावणाचा वापर करावा.

मर राेग झालेल्या उसाचा खाेडवा न घेता त्या शेतात द्विदल पीक घेऊन फेरपालट करावी.

येलाे लीफ डिसीज (येलाे लीफ सिंड्राेम)

हा राेग विषाणूजन्य असून येलाे लीफ व्हायरसमुळे हाेताे. हा विषाणू मावा किडीद्वारे पसरताे. तसेच बेण्याद्वारे देखील पसरताे.

या राेगामुळे ४ ते १० टक्क्यांपर्यंत उसाचे आणि साखरेचे उत्पादन घटल्याची उदाहरणे आहेत.

लागण पिकापेक्षा खाेडवा पिकात या राेगाचे प्रमाण जास्त आढळते. दक्षिण भारतात या राेगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून काे ८६०३२ ही उसाची प्रमुख जात धोक्यात येणाची शक्यता आहे.

लक्षणे :

पीक ७ ते ८ महिन्यांचे झाल्यानंतर राेगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.

राेगाची लागण झाल्यानंतर सुरूवातीस पानाची मध्यशीर खालच्या बाजूने पिवळी पडते. प्रथमत: ३ ते ६ नंबरच्या पानांवर राेगाची लक्षणे आढळतात. कालांतराने पिवळेपणा मध्यशिरेपासून बाजूस वाढत जाऊन पूर्ण पान पिवळे पडते. हळूहळू उसाची सर्व पाने पिवळी पडतात व शेंड्याकडून वाळत जातात. काही वेळेस राेगग्रस्त पाने शिरेेलगत लालसर दिसतात.

किडींचा प्रादुर्भाव, अतिथंडी तसेच अन्नद्रव्यांचा ताण या बाबींमुळे राेगाची तीव्रता वाढते.

नियंत्रणाचे उपाय :

उती संवर्धित राेपापासून बेण्याची वाढ केलेेल्या बेणेमळ्यात राेेगाचे नियंत्रण हाेते, म्हणून अश्या बेणेमळ्यातून लागणीसाठी बेणे घ्यावे.

पीक ताणग्रस्त राहणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीच्या नियंत्रणासाठी,

इमिडाक्लोप्रिड ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळा हंगामात राेग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय

ऊस लागवडीकरिता निचरायुक्त जमिनी असाव्यात. ऊस पिकाचा कालावधी माेठा असल्याने जमिनीच्या समस्या टाळण्यासाठी जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी.

जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे इतर फायद्याव्यतिरिक्त जमिनीची पाणीधारण क्षमता वाढविणे शक्य हाेते.

पाण्याची उपलब्धतत लक्षात घेऊन पीक क्षेत्राचे नियाेजन करावे.

ऊस लागवडीकरिता रूंद सरी किंवा पट्टा पद्धतीची रानबांधणी करावी.

ऊस बेण्यास लागणीपूर्वी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर व इमिडाक्लाप्रिड (७० टक्के) कीटकनाशकाची ३६ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिटे प्रक्रिया करावी.

माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा वापर वेळेवर करावा.

पाण्याची कमतरता असल्यास, पाेटॅश या अन्नद्रव्याची मात्रा जास्त द्यावी. तसेच पाेटॅश अधिक केओलीन या प्रतिबाष्पराेधकांचा फवारणीद्वारे वापर करावा.

तणनिर्मूलन, बाळबांधणी व माेठी बांधणी ही आंतरमशागतीची कामे वेळेवर करावीत.

खाेडवा पिकाचे शास्त्रीय पद्धतीने नियाेजन करावे.

ऊस पिकावरील किडींचे वेळीच नियंत्रण करावे. जेणेकरून राेगांच्या प्रसारास आळा बसेल.

पिकास जैविक तसेच अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कायटाेसानयुक्त तसेच सिलिकाॅनयुक्त घटकांचा वापर करावा.*

०२०२६०९०२२६८

- डाॅ. गणेश काेटगिरे, ९९६०८३३३०१, ८७८८१५३३३२

(ऊसराेग शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Disease : ऊस पिकावर तांबेरा, करपा रोग

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

Agriculture Scheme: शेततळ्यासाठी २ लाखांपर्यंत मिळणार अनुदान; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

SCROLL FOR NEXT